मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक अमर्याद होणार, हे ठरवणाऱ्या अमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुकीच्या मतदानाला आज संध्याकाळी सुरूवात होणार आहे. चार दिवसांपूर्वीच यातल्या अर्ली व्होटिंग म्हणजेच लवकरच्या मतदानाला सुरूवात झाली असून विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ट्रम्प यांना या निवडणुकीत जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतल्या या मध्यावधी निवडणुकीच्या मतदानाच्या अर्ली व्होटिंगला चार दिवसांपासूनच सुरूवात झाली असून आतापर्यंत साडेपाच कोटी मतदारांनी त्याद्वारे मतदान केले आहे. संपूर्ण अमेरिकेत हे मतदान होत आहे. अमेरिकी संसदेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच ४३५ जागांसाठी तसेच सिनेटच्या एकतृतियांश म्हणजेच ३५ जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष तसेच त्याविरोधात डेमॉक्रेटिक पार्टी, यांच्यात थेट लढत आहे. सध्या अमेरिकेच्या संसदेत ४३५ जागांमध्ये रिपब्लिकन पार्टीकडे २१९ तर डेमॉक्रेटिक पार्टीकडे २१४ सदस्यांचे पाठबळ आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये रिपब्लिकन पार्टीकडे ५३ जागा आहेत तर विरोधातल्या डेमॉक्रेटिक पार्टीकडे ४७ जागा आहेत. या निवडणुकीच्या मुख्य मतदानाला सुरूवात होण्याआधीच ट्रम्प यांना न्यायालयाचा झटका लागला आहे. त्यांच्या पक्षाकडून कॅलिफोर्नियाच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेली वादग्रस्त मतदारांवरची याचिका फेटाळून लावली आहे.
दर दोन वर्षांनी अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होतात. या निवडणुकांच्या निकालाने सत्ताधारी अध्यक्षांना एकतर बळ मिळते किंवा त्यांच्या ध्येयधोरणांना लगाम लागतो. सत्ताधारी पक्षाच्या बाजूने निकाल लागला तर पुढे होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला परत निवडून येणे सोपे असल्याचे मानले जाते. पण, जर का मध्यावधीचा निकाल विरोधात गेला तर त्यापुढची अध्यक्षीय निवडणूक सत्ताधारी पक्षाला जड जाणार, असे मानले जाते. आज होत असलेल्या मतदानात सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाला ४० ते ४५ टक्के आणि विरोधातल्या डेमॉक्रेटिक पक्षाला ५० ते ५३ टक्के मते मिळतील, असा अंदाज इमर्सन कॉलेज, एमबीसी, बिग डेटा फोन, इकॉनॉमिक्स्ट, रॉयटर आदी संस्थांनी आपल्या ताज्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला आहे.
आताच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाल्यास त्यांच्या इराणनीतीवर दबाव येईल. याला लगाम लागू शकतो. अमेरिकेतल्या वरच्या पदांच्या नवीन नियुक्त्यांमध्ये अडचण होईल. युद्धासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवर निर्बंध येतील. ट्रम्प यांचे अध्यक्षपद सुरक्षित राहिले तरी त्यांच्याविरोधात महाभियोग चालवला जाऊ शकतो. ट्रम्प यांची त्यांच्या पक्षावरची पकड ढिली पडू शकते. पक्षाची प्रतिमा मलीन होऊ शकते. युक्रेनला पूर्वीप्रमाणे मदत मिळू शकते. रशियाबरोबरचा डिझेल करार रद्द होऊ शकतो. दरम्यान, काल रात्री उशिरा अमेरिकेकडून इराणच्या पाच ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. मतदारांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी ट्रम्पकडून झालेला हा एक प्रयत्न मानला जातो. समजामाध्यमावरही ट्रम्पने या निवडणुकीवर भाष्य केले असून या निवणुकीत आपला पराभव झाल्यास अमेरिका संपेल, असा दावा करून मतदारांना खेचण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला आहे.

