महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अचानक प्राण कंठाशी आले आणि… मग त्यांच्या रागाचा जो पारा चढला तो तीन अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरच खाली उतरला, असे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात रेल्वेस्थानकाजवळच मोठ्या प्रमाणात नवरात्रौत्सव होतो. शिवससेनेकडून या उत्सवाचे आयोजन केले जाते. दसऱ्याला इथल्या देवीच्या मूर्तीचे इतर मूर्तींप्रमाणे तलावपाळी इथे मासुंदा तलावावरच्या दत्तमंदिर घाट तसंच अहिल्यादेवी घाटावर विसर्जन होतं. दरवर्षीची ही प्रथा आहे. अगदी आनंद दिघे यांच्या काळातही हीच प्रथा होती. विसर्जनाला ते स्वतः जायचे. त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रथा आजपर्यंत जोपासली आहे.
यंदा २० ऑक्टोबरला दसऱ्याच्या रात्री देवीच्या मूर्तीचे मासुंदा तलावावर विसर्जन होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीप्रमाणे विसर्जनासाठी गेले होते. दत्तमंदिर घाटावरच्या विसर्जनाची सारी व्यवस्था ठाणे महापालिकेच्या अग्नीशामक दलाकडून केली जाते. यावेळीही ही व्यवस्था हीच यंत्रणा पाहत होती. उपमुख्यमंत्री शिंदे पोहोचताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. देवीची मूर्ती विसर्जनासाठी एका तराफ्यावरून विसर्जनासाठी नेली जाते. तशी व्यवस्था झाली. हा तराफा (बोट) पाण्यात होता. उपमुख्यमंत्री शिंदे त्यावर चढले. त्यापाठोपाठ त्यांचे अनेक कार्यकर्ते तराफ्यावर चढले. कोणाला थांबवायचं तर पुन्हा साहेबांची नाराजी… त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनीही या कार्यकर्त्यांबाबत सैल धोरण स्वीकारले, असे कळते.
तराफा जसजसा पुढे जाऊ लागला तसतसे कार्यकर्तेही शिंदे यांच्याभोवती गोळा होऊ लागले. त्याबरोबर मग तराफ्याचा बॅलन्स जाऊ लागला. तराफा हेलकावे खाऊ लागला तसतसे शिंदे कासावीस होऊ लागले. तराफा बुडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. शिंदे यांचे प्राण कंठाशी आले. परंतु त्यावेळेत तराफ्यावरील स्टाफने सारी परिस्थिती हाताळली. कसेबसे विसर्जन करून एकनाथ शिंदे परतले. पण, तोपर्यंत त्यांच्या रागाचा पारा प्रचंड चढला होता. पाय जमिनीवर लागताच त्यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि तातडीने त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातेही आहे. त्यामुळे ताबडतोब त्याची अंमलबजावणीही झाली व ठाणे महापालिकेचे तीन अधिकारी निलंबित झाले, असे सूत्रांनी सांगितले
नवरात्रोत्सवातील देवीमूर्ती विसर्जनव्यवस्थेतील ढिसाळ नियोजन आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ठाणे महापालिकेने ही कारवाई केली. प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी व बाळकुम अग्निशमन केंद्रप्रमुख गिरीश झळके, नौपाडा-कोपरी प्रभागाचे सहाय्यक आयुक्त महेशकुमार जामनोर आणि कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर निलंबित झाले, तर आपत्ती व्यवस्थापनप्रमुख यासिन तडवी आणि सुरक्षाप्रमुख घनश्याम फर्डे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. २० ऑक्टोबरला मासुंदा तलाव येथील दत्तमंदिर घाट आणि अहिल्यादेवी घाटावर विसर्जनाच्या व्यवस्थेत लाईफ जॅकेट आणि इतर सुरक्षा साहित्याची कमतरता आढळली. अधिकारी वेळेवर घाटावर हजर नव्हते, असा ठपका ठेवत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी महाराष्ट्र नागरी सेवांतर्गत निलंबनाचे आदेश काढले. निलंबनाच्या काळात तिघेही अधिकारी पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयात हजर राहणार असतील. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही आणि खाजगी नोकरी/व्यवसाय करता येणार नाही.
(लेखक किरण हेगडे ज्येष्ठ पत्रकार आणि किरण हेगडे लाईव्हचे संपादक आहेत.)

