मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक आयुक्त महिन्यातून किमान एकदा तरी पत्रकारांशी सवांद साधत असत. एखादा सनसनाटी गुन्हा किंवा प्रकरण झाले की आयुक्त वा सह पोलीस आयुक्त माहिती देण्यासाठी पत्रकारांना भेटतात, ही गोष्ट वेगळी. परंतु ठराविक अंतराने शहराच्या पोलीस प्रमुखांनी संवाद साधायलाच हवा. “In any moment of decision the best thing you can do the right thing, the next best thing is the wrong thing and the worst thing you can do nothing” असं पोलिसांबाबत नेहमीच बोललं जात. हे अर्धसत्य आहे.
गुन्ह्यांची उकल चांगलीच!
या वर्षातील पहिल्या सात महिन्यांत मुंबई पोलिसांनी सुमारे 85 टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांची उकल केली आहे, हे निश्चितच भूषणावह आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या या यशात अधिकाऱ्यांपासून शेवटच्या हवालदारापर्यंत सर्वांचेच कष्ट सामील आहेत. पोलीस आयुक्तांनी गुन्ह्यांचे विविध प्रकार सांगून आरोपींना पकडल्याचे सांगितले आहेच. यामागची पोलीस खात्याची मेहनत जनतेला तशी दिसत नाही, म्हणूनच हे वृत्त महत्त्वाचे आहे. इतर राज्यांत सत्ताश्रयाने कशी गुन्हेगारी केली जाते ते काही दिवसांपूर्वी एका गुंडाने दिल्ली पोलिसांच्या कारभाराचा भांडाफोड करत दाखवले होते. ते उदाहरण समोर असताना मुंबईच्या पोलिसांनी चांगली कामगिरी केली हे डोळ्यात भरण्याजोगेच आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या वेळीस मुंबईत एक हिडीस प्रकार घडला होता. त्याला वरून आदेश येण्याआधीच कारवाई करून आयुक्तांनी धाडसच दाखवले होते, हे मान्यच केले पाहिजे.
गुन्ह्यांची उकल ठीक पण…
मुंबई शहरातील गुन्ह्यांची उकल किंवा गुन्हेगार शोधमोहीम चांगलीच आहे. पण आयुक्त महोदय शिक्षेचं काय? हाच तर कळीचा मुद्दा आहे. पोलीस अधिकारी व हवालदारांच्या मेहनतीमुळे जेरबंद झालेले आरोपी वा संशयित न्यायालयात मात्र चुटकीसरशी सुटतातच कसे? याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. हाणामारी सोडून द्या, तलवार वा घोडा बाळगणारे गुन्हेगारही 15/20 दिवसांत बाहेर उजळ माथ्याने कसे बाहेर येतात? अशा 10/12 प्रकारणांची सीआयडी चौकशी केल्यास अनेक लुपहोल्स आपल्या चणाक्ष नजरेतून सुटणार नाहीत. अगदी पंचनाम्यापासून, डायरीपासून तो चार्जशीट्स तयार करणे, विविध कलमे लावणे व याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुमचे ‘सरकारी वकील’ कशी बाजू मांडतात यांचे प्रत्यक्ष दर्शन एकदा नजरेखालून घालाच. हादरून जाल. (आपल्यासारखे ज्येष्ठ अधिकारी हादरून जाणार नाहीत हे मान्य!) खालची कोर्टे सोडून द्या. उच्च न्यायालयातही बऱ्यापैकी सेटिंग चालते, साहेब! त्याशिवाय का एका प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्याचा जामीनाच अर्ज सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायमूर्तींसमोर आऊट ऑफ टर्न आला! अनेक कच्च्या कैद्यांचे जामीनअर्ज प्रतीक्षेत असताना हा अभिनेता काय ब्राह्मदेवाचा बाप लागून गेला होता? आपल्यासारख्या ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही बाब सरकारच्या ध्यानात आणून द्यायला नको का? माहित असलेले हे एक प्रकरण फक्त सांगू शकलो. माहित नसलेली किमान 200 प्रकरणे निश्चितच असणार याबाबत खात्री आहे.

अंमली पदार्थ… अजून बरेच बाहेरच
गेल्या दोनचार वर्षांपासून अंमली पदार्थ शोधमोहीम चांगली राबवली जात आहे. पण तेथेही गुन्हेगारांना सजा सुनावली जात नाही, अशी तक्राद आहेच. मध्यंतरी आग्रीपाडा पोलीसठाण्यासमोरील घास गल्लीत एका इमारतीत बंदी असलेल्या अंमली पदार्थाची गोळी बनवणारा कारखाना अंमली पदार्थविरोधी पथकाने उद्ध्वस्त केला, ही चांगली गोष्ट झाली. येथे जी मंडळी राहत होती ती भाड्याने राहत होती. भाड्याने राहण्याआधी स्थानिक पोलिसांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ असावे लागते. हा नियम जुनाच आहे. असे असतानासुद्धा त्या पोलीसठाण्याला जाब विचारला गेला नाही. विशेष म्हणजे कारखाना असलेली इमारत पोलीसठाण्यापासून अवघ्या 50 पावलांवर आहे. अशाप्रकारची मरगळ काय कामाची? तसेच उपगरात अंधेरी, पार्ले, जोगेश्वरी, ओशिवरा, कांदिवली, ठाकूर व्हिलेज, ठाकूर संकुल, फिल्म सिटी, आरे कॉलनी, फिल्टर पाडा आदी भागात आजही खुलेआम चरस, मेफाड्रीन गोळ्या खुलेआम व पाहिजे तितक्या प्रमाणात मिळते. हीच गोष्ट दक्षिण मुंबईतील सर्व पब्स, बार, पांचतारांकित हॉटेल्स इतकेच नाही तर जीपीओनजिकच्या बकवास गल्ल्यांमध्येही बिनधास्त मिळते.
पोलीस काय पकडतील, पण…
अंमली पदार्थांबाबत पकडले जाण्याची भीतीच गुन्हेगारांना नाही, कारण या प्रकरणात ‘बॉस’ कधीच पोलिसांना सापडत नाहीत. त्याचे पंटर काही ग्राम मालासहित पकडले जातात व ही मंडळी काही महिन्यांतच तर काही अवघ्या दिवसांतच बाहेर येतात. यांच्या डोळ्यासमोर गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या लोकप्रतिनिधींचा आदर्श असतो (मुंबई विभाग- आता उरणपर्यंत राहणाऱ्या काही लोकप्रतिनिधींवरील गुन्हेगारी स्वरूपाचे खटले तब्ब्ल 25/30 वर्षे प्रलंबित आहेत. जय हो लोकशाही) आपल्याला अलीकडेच घडलेल्या काही राजकीय हत्त्यांबाबत विचारले असता आपण तपास सुरु असल्याचे सांगून परदेशातून काहीजण ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे व काही प्रकरणी काहीजण ताब्यात आल्याचे स्पष्ट केलेत. आतील माहिती अशी आहे की, राजकीय कृपाछत्राखाली ही मंडळी 50 टक्के गुन्हेगारी जगताशी संबंध ठेवूनच होती. त्यांच्या व त्यांच्या निकटतम व्यक्तीचे CDR तपासलेत तर मी काय म्हणतो ते आपल्या लक्षात येईलच. पण सत्ताधाऱ्यांना दुखवायचे नाही हा जो आपला धर्म आहे, ते पाहता आपण माझ्याशी सहमत होणार नाहीत. संबंधित व्यक्तींना जे धमकीचे फोन येत असल्याचे सांगण्यात येते ते सर्व बकवास आहे. ज्यांचे आयुष्य सकाळपासून रात्रीपर्यंत अनेकाना धमकावण्यात गेले त्यांनी धमकीच्या फोनची तक्रार न केलेलीच बरी. चित्रपट अभिनेत्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांचे गुन्हेगारी जगताशी निकटचे संबंध असतात हे हल्ली शेंबड्या पोरांनाही माहित झाले आहे. त्यामुळे आपल्या राजकीय ‘बॉस’ना खडेबोल सुनावण्याबाबत विचार कराच.
अजून सुरक्षित वाटायला हवे!
इतर कुठल्याही शहरापेक्षा मुंबई, ठाणे ही शहरे महिलांसाठी सुरक्षित आहेत यात वाद नाही. काही चुटपूट घटना घडतातही. नाही असे नाही. दोन्ही उपनगरातील निर्जन ठिकाणी अजूनही काही उपद्रवी माणसे आहेत. मानखुर्द, गोवंडी, ओशिवरा, सर्व लिंकिंग रोड्स, मुलुंड, ठाणे सीमारेषा. महत्त्वाचे म्हणजे साहेब आपल्या कार्यालयासमोरील दोन्ही बाजूचे पदपथ पार्किंगवाले कसे लुटतात हे जवळून पाहिल्यास समजेल. बादशहा पदपथावर फेरीवाले महिलांशी कसे वर्तन करतात, याचे सीसीटीव्ही लावून निरीक्षण करा. रेल्वेस्थानकात महिलांचा डबा येतो, त्याठिकाणी अतिसंवेदनशील कॅमेरे लावून 15 दिवस टेहळणी करा आपोआप उत्तर मिळेल. तुमच्याकडून अपेक्षा आहेत. जाता जाता “Before you are leader success is about growing yourself. When you become leader success is all about growing others”.
छायाचित्र मांडणी- प्रवीण वराडकर
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार तसेच गुन्हेगारीविषयक अभ्यासक आहेत.)

