Homeमाय व्हॉईससोनियाजींच्या आत्मचरित्राने काँग्रेसमध्ये...

सोनियाजींच्या आत्मचरित्राने काँग्रेसमध्ये होणार तीन सत्ताकेंद्रे!

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. इंग्रजी पुस्तकांना मोठा ग्राहक आहे. वाचकदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. हा प्रकाशनव्यवहार अगाध आहे. चेतन भगतसारखा भारतीय लेखक जगातील प्रमुख लेखकांमध्ये गणला जातो. मोठी प्रसिद्धी मिळाली की पुस्तक विकले जाते. अगदी नारायण राणे, शिवकुमार यांची चरित्रे इंग्रजी भाषेत प्रकाशित झाली आहेत. चरित्र आणि आत्मचरित्र यात फरक आहे. चरित्र अन्य व्यक्ती लिहू शकते. सोनिया गांधी यांच्यासंदर्भात दोन पुस्तके माझ्या माहितीत आहेत. एक चरित्र आहे आणि एक काल्पनिक आहे. अनेक लेखकांनी सोनिया गांधी यांच्यासंदर्भात लिहिण्यासाठी विनंती केली होती. पण आता आत्मचरित्र येत आहे. हे पुस्तक म्हणजे प्रती मोठ्या प्रमाणात विकल्या जातील यात वाद नाही. कदाचित पुढच्या पिढीला मोठी रॉयल्टी मिळत राहील. यातील आर्थिक भाग बाजूला ठेवला तर याचे काय राजकीय परिणाम होतील याची चर्चा करायला हरकत नाही.

अपेक्षित वादग्रस्त मजकूर

सोनिया गांधी यांचे बालपण किंवा त्यांची जडणघडण यासंदर्भात जनतेत आकर्षण असेल, असे अपेक्षित असले तरी त्याचा फार मोठा प्रभाव नसावा. काँग्रेस किंवा गांधी घराण्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना हे आकर्षण असू शकते. पण भारतात जर काही आकर्षण असेल तर ज्या कंपनीने काही मजकूर वगळावा असे सुचविले होते तो नेमका कोणता याचे असेल. सोनिया गांधी कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हत्या. त्या दहा वर्षे राष्ट्रीय सल्लागार परिषद, या खास त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या रचनेत अध्यक्ष होत्या आणि ही परिषद डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारवर थेट नियंत्रण ठेवून होती. कायदे कसे करावेत, याची चर्चा या परिषदेत होत असे. याचा तपशील सर्वत्र उपलब्ध आहे. पण यासंदर्भात सोनिया गांधी पुस्तकात काही प्रकाशझोत टाकतील, हे अपेक्षित आहे किंवा कसे हा प्रश्न आहे. मुळात अशी परिषद असणे हा वादाचा मुद्दा ठरला आणि दहा वर्षे सत्तेवर असलेल्या यूपीए सरकारच्या पराभवात या विषयाने मोठी भूमिका बजावली.

सोनिया

आता सोनिया गांधी यांच्या पुस्तकात जे मुद्दे असतील आणि ते वादग्रस्त ठरतील असे वाटते, त्यात त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भात व्यक्त केलेली मते असू शकतात. पण ती मते त्या आतादेखील व्यक्त करीत आहेत. राहुल गांधी तर थेट या विषयावर भिडत आहेत. चीनने भारताची जमीन बळकावली, असा आरोप गांधी कुटूंब करीत आहे. पण समर्थन करणारे पुरावे काही त्यांनी पुढे आणलेले नाही. हा आरोप कंठारवाने सतत सुरु आहे. पण यासंदर्भात नेहरु यांच्यावर आधी टीका करण्यात आली आहे. सोनिया गांधींच्या पक्षाने चिनी कम्युनिस्ट पक्षाशी करार केला आहे. तेथील सत्ताधारी पक्षाने हे नाकारलेले नाही. काँग्रेस पक्षाला देणगीदेखील मिळाली आहे. अशा परिस्थितीत भाजप सरकारवर कोणताही ठपका ठेवणे हे सोनिया गांधी आणि काँग्रेस या दोघांना महागात पडू शकते.

२०१४च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष कोणत्याही आत्मविश्वासाने सामोरा गेला नाही. सोनिया गांधी यांना २००४मध्ये मिळालेले यश हंगामी होते. २००९मध्ये जनतेने डॉ. मनमोहन सिंग यांना पाठबळ दिले होते. पण त्यांना त्यांचे श्रेय मिळाले नाही. त्याचा अवमान करण्यात आला. एवढेच नरसिंह राव यांना काँग्रेस पक्षाने अवमानित केले होते. सोनिया गांधी यांना राजीव गांधी यांच्या हत्त्येनंतर लगेचच राजकारणात येण्याची गळ घालण्यात आली होती. पण त्यावेळी त्या गप्प बसल्या. एक संदर्भ असा आहे की, नरसिंह राव यांना सोनिया गांधी यांनी विचारले होते की, जर मी तुमची मुलगी असते तर तुम्ही मला राजकारणात येण्याच्या संदर्भात काय सल्ला दिला असता? यावर नरसिंह राव यांनी, सोनिया गांधी यांना राजकारणात येऊ नका असे सांगितले होते. मी राहुल आणि प्रियंका यांना पुढे तयार करतो. त्यांना माझ्याबरोबर नेत जाईन आणि तयार करीन असे नरसिंह राव म्हणाले होते. यासंदर्भात सोनिया गांधी पुस्तकात काय लिहित आहेत किंवा लिहिले आहे, याचे औत्सुक्य वाचकांना असणे स्वाभाविक आहे. ते कसे पूर्ण होणार हा मोठा प्रश्न.

सोनिया

नरसिंह राव यांनी सोनिया गांधी यांच्याशी सौहार्दाचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे तर, तुमच्या घरी हॉटलाईन फोन लावतो असे म्हणत होते. पण सोनिया गांधी यांनी फोन कट करून टाकला. राजीव गांधी यांच्या हत्त्येच्या संदर्भात तपास नीट होत नाही, असे सोनिया गांधी यांना वाटत होते. मात्र त्यांनी तसे स्पष्टपणे सांगितले नाही. १९९६मध्ये नरसिंह राव सरकारचा निवडणुकीत पराभव झाला तरी जागा अगदी कमी झाल्या नव्हत्या. पण पक्षाने सरकार स्थापन करण्याची तयारीदेखील दाखवली नाही. असे का हा मोठा प्रश्न. काँग्रेस पक्षात अन्य नेते असतानाही सोनिया गांधी यांनी पक्षाचे सदस्यत्व घेतल्यानंतर लगेचच त्यांना अध्यक्ष करण्यासाठी सीताराम केसरी यांना बाजूला करण्यात आले आणि तेदेखील त्यांना अवमानित करुन… हे संदर्भ आहेत. पण सोनिया गांधी यांनी या पुस्तकात त्यावर काही प्रकाश टाकला असेल की कसे, हे गुलदस्त्यात आहे की वास्तवात हा मोठा प्रश्न. शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा आणला आणि काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला. त्या विषयात सोनिया गांधी यांना नेमके काय वाटते आणि नंतर शरद पवार पुन्हा त्यांच्या गोटात गेले. ते सगळे कसे घडले हेही लोकांना वाचायला आवडेल.

तीन सत्ताकेंद्रे

सोनिया गांधी यांचे वय, प्रकृती आणि आगामी काळ यासंदर्भात त्यांनी स्वतः लिहिणे आवश्यक आहे. पण त्या स्वतः लेखन करु शकतात किंवा कसे हे स्पष्ट नाही. त्यांची भाषणे लिहिणे हा दिवसभर चालणारा कार्यक्रम असे. त्यातून त्यांचे पंधरा मिनिटांचे भाषण तयार होत असे. ते मोठ्या अक्षरात त्यांना दिले जात असे आणि त्या वाचून दाखवत असत. त्यांचे वास्तविक शिक्षण, अनुभव, वाचन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुस्तक आल्यानंतर त्याची चर्चा होणार आणि सोनिया गांधी अजूनही क्रियाशील असल्याने पक्षात एकूण तीन सत्ताकेंद्रे तयार होतील, हे लक्षात घ्यायला हवे. राहुल, प्रियंका यांना मानणारे अनेक नेते आहेत. काँग्रेस पक्षात निष्ठावंत म्हणजे नेत्यांच्या पुढेपुढे करणारे लोक ही परंपरा आहे. आता आगामी काळात असे लोक पक्षात असलेली पदे कशी मिळतील यावर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता सोनिया गांधी यांचे पुस्तक हे पक्षात स्पर्धा निर्माण करण्यासाठी एक कारण होईल असे दिसते.

सोनिया

२०१४च्या निवडणुकीच्या मागेपुढे जी पुस्तके आली त्यात नटवर सिंग यांचे ‘One life is not enough’ आणि संजय बारू यांचे ‘Accidental prime minister’ ही पुस्तके गाजली आणि काँग्रेस पक्षाला त्याचा बराच फटका बसला. उलट काँग्रेस पक्षाला फायदा होईल असे पुस्तक अभावाने बाजारात आले आहे. राहुल गांधी यांच्यासंदर्भात एक पुस्तक आहे असे दिसते. पण त्यासंदर्भात कोणाला फारसे काही वाटत नाही. उलट वरुण गांधी चांगले लेखक म्हणून पुढे येत आहेत. अर्थात त्यांचे राजकारणदेखील थबकले आहे. आता कदाचित सोनिया गांधी यांच्या पुस्तकानंतर मनेका गांधी यांची भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे आहे. मनेका गांधी यांना घराबाहेर पडावे लागण्यात सोनिया गांधी यांनी काही भूमिका बजावली होती का, हाही विषय आहे किंवा त्यांनी मनेका गांधी यांना रोखण्यासाठी काही प्रयत्न केले होते का हेही महत्त्वाचे आहे. जर तसे नसेल किंवा असेल तरी चर्चा होणारच.

थोडक्यात, हा सगळा प्रपंच काय साध्य करणार हे पुढे कळेलच… वाट बघूया.

(लेखक मनोहर सप्रे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आरक्षणाचा मुद्दा व्यावहारिक कमी तर भावनिक जास्त!

आरक्षण या विषयावर अनारक्षित लोकांनी काही लिहिणे म्हणजे अंगावर आग्यामोहोळ ओढवून घेणे आहे. इतिहासात गेलो तर आरक्षण दहा वर्षे असावे अशी सुरुवात झाली होती. आता आठ दशके होऊन गेली. यासंदर्भात कधीकधी कोणी आवाज उठवत असले तरी कोणताही सत्ताधारी किंवा...

पंतप्रधान मोदींनंतर आता अमित शाह, राहुल गांधींच्या रडारवर!

नवी दिल्लीत राहुल गांधी यांनी पेलेट गनच्या विषयावर दिवसभर आंदोलन केले आणि अखेर पोलिसांनी औपचारिक गुन्हा दाखल केला. यातून काय निष्पन्न होईल ते काळ ठरवील. पण हट्टीपणाचे राजकारण हा राहुल गांधी यांचा पाया झाला आहे एवढे नक्की. राहुल गांधी...

खाजगी व पूर्वायुष्याच्या फेऱ्यात सापडणार का तामिळनाडूचे मुख्यमंत्री?

तामिळनाडूत विरोधी पक्षनेते उदयनिधी यांना अटक करुन तीनशे किलोमीटर अंतरावर नेण्यात आले होते. अगदी कालपरवा घडलेली घटना आहे. सत्ता हाती आली आणि डोक्यात गेली की कसे व्यक्त व्हावे याचा काही परिपाठ नाही, निकष नाहीत, पण उदाहरणे आहेत. आपला प्रतिस्पर्धी...
Skip to content