घाबरून जाऊ नका. पारंपरिक एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर आणि आजच्या ग्लोबल युगातील मल्टीप्लेक्स कल्चरमध्ये कुठेही लक्ष वेधून घेईल असा फलक लावण्यात आलेला नाही की, चित्रपट सुरू असताना पादायचं नाही… वायूउत्सर्जन करायचं नाही. हे मी का सांगतोय? तर अशीच एक घटना घडली आणि अख्खं प्रेक्षागृह क्षणार्धात रिकामे झाले. नुकतेच कोलम्बिया देशातील कार्टाजेना शहरातील प्लाझा ब्रोकाग्रान्डे शाॅपिग सेंटरमधील सिने कोलंबिया मल्टीप्लेक्समध्ये असं खरंच घडलं आणि आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल चॅनेलवर ती बातमी आलीदेखील… समाजमाध्यमातून ती व्हायरल झाली. आजच्या जेन झी आणि जेन अल्फा पिढीचे समाजमाध्यमावर जगात कुठे कुठे काय काय चाललंय, कसं चाललंय याकडे लक्ष असतं. ते वेगळे वाटले, आवडलं तर लाईक करायचं.. लघु भाषेत (शाॅर्ट फाॅर्म) काॅमेन्ट्स करायच्या आणि आवडलं नाही तर ट्रोल करायचं असा सरळ साधा सोपा उपाय आहे.
स्पायडर मॅन – ब्रॅण्ड न्यू डे, हा चित्रपट तेथे पाहिला जात असतानाच एका चित्रपटरसिकाने शारीरिक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून वायू उत्सर्जन केले आणि क्षणात त्या प्रेक्षागृहात वास पसरला आणि सगळ्यांनाच नाकावर हात अथवा रूमाल लावायची वेळ आली. तरीही असह्य होत चाललंय म्हणून सगळेच पडद्यावरचा चित्रपट तसाच सोडून बाहेर पडले आणि त्याची बातमी झाली. जगभरातील कोणत्याही गोष्टीची, कशाचीही चोवीस तासात बातमी होऊ शकते, अशा युगात आपण वावरतोय. त्यामुळे या बातमीला मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांतूनही स्थान मिळाले. एवीतेवी त्याचत्याच बातम्यांचा कंटाळा येत असल्याने त्यात अशी बातमी वेगळी ठरली.

वायूउत्सर्जन ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. ती घरात, खेळात, प्रवासात, सुख-दुःखात कुठेही होऊ शकते. अर्थात असं करणं सभ्यतेचा भंग केला, असं मानलं जातं. पण तरीही एखाद्याला अतिखाण्यातून अशी समस्या उद्भवू शकते. भेसळीचे खाणार त्याला ढेकर येणार, कमीजास्त प्रमाणात वायूउत्सर्जन होणारच. तो आवरता आल्यास आनंदच आहे. पण ते आवरायच्या प्रयत्नात आणखी काही समस्या निर्माण झाली तर? बरं, जगभरातील अनेक देशांतील विविध भाषांतील चित्रपटसंस्कृतीचा विचार केला तर, पडद्यावर चित्रपट सुरू असताना असं करणारा हा पहिलाच चित्रपटरसिक आहे का? मूकपटाच्या काळापासून कधी ना कधी, कुठे ना कुठे ही सत्यघटना घडतेय. कृष्णधवल अर्थात ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटाच्या काळापासून हे कुठे ना कुठे कमीअधिक प्रमाणात घडलंय. तातडीने आजूबाजूच्या चित्रपटरसिकांनी नाक मुठीत धरलंय. फार पूर्वीच्या अतिशय जुन्या काळातील चित्रपटगृहात तर बाहेरच्या बाजूला असलेल्या टाॅयलेटचा वास काही प्रमाणात प्रेक्षागृहात येत असे. ती टाॅयलेट कुठे वेळेवर स्वच्छ धुऊन साफ केलेली असत.
ग्रामीण भागातील अतिशय जुन्या काळातील चित्रपटगृह, नाट्यगृह यांची अवस्था अशीच होती. अशाही परिस्थितीत त्या काळातील रसिकांनी चित्रपट डोक्यावर घेतले, डोक्यात ठेवले. आवडत्या हिरोच्या पडद्यावरील एन्ट्रीला, एखाद्या जोरदार डायलॉगला थिएटरचे छप्पर उडून जाईल की काय अशी भीती वाटावी, अशा टाळ्या-शिट्ट्यांनी जोरदार रिस्पॉन्स दिला. फार पूर्वी तर आवडलेल्या गाण्यावर पडद्यावर पैसे अर्थात चिल्लर उडवली जाई. फ्लाॅप चित्रपटाचा फायदा उठवणाराही चित्रपटरसिक आहे. अशा बरंचसं रिकाम्या असलेल्या प्रेक्षागृहात चक्क तिकीट काढून तीन तासांची झोप काढणारा प्रेक्षकवर्गही पूर्वापार आहे. विशेषतः चाळीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात दुपारी घरात झोपणं अडचणीचं ठरत असेल तर सरळ एकपडदा चित्रपटगृहात जाऊन झोपे. ते चित्रपटगृह वातानुकूलित असेल तर सुखाची झोप नक्कीच. चित्रपटाचे अभ्यासक, विश्लेषक, संग्राहक यांना चित्रपटसंस्कृतीतील ही गोष्ट बहुतेक माहिती नसावी अथवा माहीत असली तरी ती माहिती डाऊनमार्केट वाटत असेल. प्रेमीयुगुलांचे अड्डे म्हणजे असे अपयशी अर्थात फ्लाॅप चित्रपट होते आणि आहेत, हे तर दीर्घकालीन सत्य. अंधार आणि सहवास.. एकदम दोन्ही. आणि चित्रपट साडेतीन तासांचा असेल तर उत्तमच! सगळेच रसिक चित्रपट पाहयला थिएटरमध्ये अथवा मल्टीप्लेक्समध्ये जातात, असे अजिबात नाही. अशावेळी एखाद्या जेन्युअन रसिकाकडून नकळतपणे वायूउत्सर्जन झाले तर त्याचा इतका बाऊ कशासाठी?
(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

