Homeमाय व्हॉईसभाजपाला इशाराघंटा!

भाजपाला इशाराघंटा!

बिहारमधे गेली तीस वर्षे भाजपाचा गड असलेल्या आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांना चार टर्म निवडून देणाऱ्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक व राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा दणदणीत झालेला विजय ही शक्तिशाली भाजपाला इशाराघंटा आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असताना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या परंपरागत मतदारसंघात भाजपाचा झालेला पराभव ही राज्य व केंद्रीय नेतृत्त्वावर मोठी नामुष्की आहे. दिल्लीत जंतरमंतरवर झालेले जेन झी आंदोलन, अयोध्येतील राममंदिरात दानपेटीवर पडलेला दरोडा, देशभर वाढलेली प्रचंड बेरोजगारी व जनतेत खदखदत असलेला असंतोष, याचे प्रतिबिंब बिहारमधील बांकीपुरा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पडले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्षाने लढविलेल्या सर्व २३६ जागांवर दारूण पराभव झाल्यानंतर प्रशांत किशोर खचले नाहीत. त्यांनी पक्षाचे काम, संघटनबांधणी व जनसंपर्क थांबवला नाही. बकवास आश्वासने दिली नाहीत. जनतेला स्वप्नरंजनात गुंतवले नाही. बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने सर्व ताकद पणाला लावली असतानाही किशोर यांचा १९ हजारपेक्षा जास्त मतांनी विजय झाला व तीस दशकानंतर भाजपाला आपला भक्कम गड गमवावा लागला.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपा-जनता दल (यु) आघाडीचे सरकार स्थापन झाले. जदयुचे सर्वोच्च नेते नितिश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे करून भाजपाने विधानसभा निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर नितिश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. पण काही महिन्यांतच त्यांची केंद्रात गरज असल्याचे भाजपाने त्यांना पटवून दिले व सम्राट चौधरी यांनी भाजपाचे पहिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बिहारसारख्या मोठ्या राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री झाला म्हणून पक्षाचे नेतृत्त्व खूश झाले. तसेच चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या नितिन नवीन यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. केवळ बिहारपुरते मर्यादित असलेल्या नेत्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नेमल्याचे अनेकांना आश्चर्यही वाटले. नितीन नवीन केंद्रात येणार म्हणून त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवडही झाली. संसदेत खासदार म्हणून गेल्याने नितिन नवीन यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व त्यांच्या बांकीपूर मतदारसंघात भाजपाने पोटनिवडणूक ओढवून घेतली. निवडणुकीत जय-पराजय होत असतात. पण ज्यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली, त्यांच्या राज्यातील विधानसभा मतदारसंघात पक्षाला पराभव पत्करावा लागतो हे लाजिरवाणे ठरले.

भाजपा
Screenshot

नितिन नवीन यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करेपर्यंत त्यांचे नाव देशात कुणाला ठाऊक असण्याचे कारण नव्हते. आमदार असताना ते  प्रादेशिक नेते एवढीच त्यांची प्रतिमा होती. पश्चिम बंगालमधे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून हटवले व कोलकतामध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाले. बिहारपाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा प्रथमच मुख्यमंत्री झाला याचे श्रेय मोदी-शाहांबरोबरच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितिन नवीन यांना दिले गेले. मग बांकीपूर मतदारसंघातील पराभवाचे खापर कुणावर फोडले जाणार? प्रशांत किशोर यांची ख्याती निवडणूक प्रचाराचे आराखडातज्ञ अशी आहे. त्यांनी विविध राज्यात राजकीय पक्षांना निवडणूक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले आहे. अनेक राज्यात त्यांच्या रणनितीमुळे राजकीय पक्षाला सत्ता मिळाली व त्यांच्या बुद्धिमत्तेचा लाभ घेऊन अनेकजण मुख्यमंत्रीही झाले. गेल्या वर्षी जनसुराज्य पक्षाला विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के अपयश पदरी पडल्यावर किशोर यांची सर्वत्र टिंगलटवाळी झाली. तेव्हा स्वत: किशोर उमेदवार म्हणून मैदानात नव्हते. मात्र बांकीपूरच्या पोटनिवडणुकीत ते स्वत: उमेदवार म्हणून लढले व भाजपाचा पराभव करून विजयी झाले.   

बांकीपूर विधानसभा पोटनिवडणकीसाठी भाजपाने अगोदर अभिषेक कुमार सिन्हा यांना उमेदवारी जाहीर केली होती. गेल्या ९ जुलै रोजी त्यांनी भाजपाचे उमेदवार म्हणून अर्जही दाखल केला होता. दोनच दिवसात चक्रे फिरली. स्वत: अभिषेक यांनी आपण निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले. भाजपाने अभिषेक यांच्याऐवजी नीरज कुमार सिन्हा यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले. पक्षाने उमेदवार बदलला म्हणून कार्यकर्ते व मतदारही संभ्रमात पडले. बांकीपूर मतदारसंघातून प्रशांत किशोर यांच्याविरोधात भाजपाने एक सर्वसामान्य कार्यकर्ता उभा केला. तेव्हाच भाजपाच्या विजयाबद्दल धाकधूक वाटू लागली होती. प्रशांत किशोर भाजपाच्या उमेदवाराला भारी पडू शकतात, अशी चर्चा सुरू झाली. त्यातच दिल्लीत जेन झी आंदोलनाला धार चढली. देशभर जेन झी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. बिहारमध्येही जेन झी मोर्चावर पाण्याचे फवारे मारून त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. जेन झी आंदोलनातून भाजपाविरोधात रोष प्रकट होत राहिला. पण आपल्याला कोणी पराभूत करू शकत नाही, अशा अहंकारात भाजपाचा प्रचार चालू राहिला. किशोर यांना ६४ हजार १५१ मते मिळाली. भाजपाचे नीरज कुमार यांना ४४ हजार ८२७ तर राजदच्या रेखा कुमारी यांना १४ हजार २७३ मते मिळाली. निकालानंतर किशोर म्हणाले- बांकीपूरची निवडणूक ही केवळ आमदार निवडण्यासाठी नव्हती. निकालाने भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाला स्पष्ट संदेश दिला आहे. बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती असू  नये, ही जनतेची इच्छा आहे. राज्याल शिक्षण, रोजगार, आणि विकासाला प्राधान्य देणारा मुख्यमंत्री हवा आहे.

भाजपा

निवडणुककाळात प्रशांत किशोर यांच्याविरोधात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन आठ दिवस मतदारसंघात तळ ठोकून होते. मुख्यमंत्री सम्राट चौधरी, राज्याचे मंत्री, पक्षाचे १८ खासदार, २७ आमदार, भोजपुरी चित्रपटातील कलाकार अहोरात्र मतदारांना आकर्षित करीत होते. सत्ताधारी पक्षाचा बोलबाला व्हावा यासाठी साथीला गोदी मीडिया होताच. तरीही किशोर यांनी १९ हजारांचे मताधिक्य घेऊन भाजपावर मात केली. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या पदग्रहण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितिन नवीन यांचे अभिनंदन करताना मेरे बॉस हैं, नितीन जी.. असे उदगार काढले होते.  मोदींच्या बॉसच्या मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रशांत किशोर यांच्या विजयाने भाजपा स्तब्ध झाला आहेआणि राजदला भविष्याची चिंता भेडसावू लागली आहे. बांकीपूरवर गेली तीस वर्षे फडकत असलेल्या भगवा मतदारांनी खाली खेचला आहे व तिथे जनसुराज्य पक्षाचा पिवळा झेंडा फडकू लागला आहे. प्रशांत किशोर यांच्या विजयामुळे मुख्यमंत्री सम्राट चौधरी व राजदचे प्रमुख तेजस्वी यादव यांच्यापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. बिहारच्या विधानसभेत किशोर हे पक्षाचे एकमेव आमदार असतील पण भाजपा सरकारला हैराण करतील. भाजपाने बांकीपूरच्या पोटनिवडणुकीत सारी शक्ती व कल्पकता पणाला लावली होती. प्रचारात बजरंग बली हनुमानाच्या वेषात एका कलाकाराला नाचवत ठेवले. पण हनुमान भाजपावर प्रसन्न झाला नाही. बांकीपूर से कुत्ता-बिल्ली भी लढा देंगे तो भी बीजेपी जीत जायेगी, अशा भाषेत भाजपाचे बिहारचे नेते व माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुक्ताफळे उधळली होती. मतदारांना गृहित धरून चालणार नाही, हाच संदेश बांकीपूरने देशाला दिला आहे.

(लेखक डॉ. सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

जेन झीच्या सहानुभूतीसाठी अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी

राजधानी दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू असताना आणि कडक सुरक्षाव्यवस्था असताना संसद चलो.. म्हणून निघालेल्या विद्यार्थी आंदोलकांच्या जमावावर पॅलेट गन्स कोणाच्या आदेशाने चालवल्या? बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर एके-४७मधून पोलिसांनी केलेला गोळीबार कोणाच्या आदेशाने झाला, या प्रश्नावरून विरोधी पक्षांनी काहूर उठवले आहे....

झुरळांच्या झुंडीने पेटवला ‘जेन झी’चा वणवा!

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांनी बेरोजगार आणि अहोरात्र सोशल मीडियावर पडललेल्या तरूणांना झुरळ, म्हणून संबोधल्यावर अमेरिकेत बोस्टनमधे शिकत असलेल्या अभिजीत दीपकेने कॉक्रोच जनता पार्टीची घोषणा केली. इंस्टाग्रामवर अभिजीतच्या घोषणेला देशातून तरूणाईचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अडिच कोटी फॉलोअर्स भेटले. नीट परीक्षा पेपरफुटीची...

महाराष्ट्राचे सुप्रीम बॉस फडणवीस आणि दिल्ली!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सुप्रीम बॉस आहेत. महायुती सरकारमध्ये ते सर्वोच्च आहेत आणि महाराष्ट्र भाजपामध्येही त्यांचा शब्द अंतिम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जे महत्त्व आहे, तसेच फडणवीसांना महाराष्ट्रात आहे. फडणवीस यांची प्रशासावर...
Skip to content