दादा कोंडके द्वैअर्थी संवादासाठी ओळखले जात होते तरी कधीकधी ते एखादं सत्य सहज बोलून जात असत. दादा कोंडके यांच्या कामाची एक पद्धत होती. आपला चित्रपट पूर्ण झाल्यावर ते मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना गोव्याला फिरायला नेत. या प्रवासात ते जे काही अखंड प्रचंड बोलत, त्यात त्यांचे एक वाक्य ठरलेले.. सकाळी सकाळी उठल्याबरोबर कोणत्याही हिराॅईनच्या घरी जाऊ नका हो, तुम्ही तिला अजिबात ओळखणार नाही. मेकअपशिवाय हिरोईन? तुम्ही वार्ता सोडा. काय पाहाल?… दादांच्या उत्स्फूर्त बोलण्यात काही रोख असे आणि आपण तो समजून घ्यायचा असायचा. सलमान खानची ‘मेकअप’शिवायची बहुचर्चित अवस्था पाहून दादा कोंडके यांच्या बोलण्याची आठवण आली. सलमान खान एका सोहळ्यात मुद्दाम असा आपलं खरं रुपडे घेऊन आला की, मेकअप नसताना आपण कसे दिसतो हेही जगासमोर यावं म्हणून.. तसा तो का आला हे खुद्द सलमान जाणे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात अशा सलमान खानला पाहून अक्षरशः असंख्य उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. यात आश्चर्य नाही. सलमानने त्या वेळ काढून वाचाव्यात. हिंदी आणि इंग्रजीतील झालेच, मराठीतीलही प्रतिक्रिया जाणून घ्याव्यात. त्याची आई महाराष्ट्रीय आहे आणि सलमान खानला मराठी चांगलं येते (हवं तर महेश मांजरेकरला विचारा).

आज सलमान खान वयाच्या साठीत आहे. त्यातील अडतीस वर्षं तो कॅमेरासमोर आहे, सतत रंगवावा लागणारा चेहरा, त्यावर पडणारे लख्ख लाइट्स, उतरावा लागणारा मेकअप आणि या सगळ्यांतून त्वचेवर होणारा, न होणारा परिणाम हे सगळेच ‘जावे कलाकारांच्या वंशा अथवा जिवा..’ या प्रकारात मोडते. या जोडीला फिटनेस फंडा, आवश्यक आणि अनावश्यक पथ्ये हेही सगळं चेहऱ्यावर येते. एकीकडे सही फिटनेस फंडा आणि दुसरीकडे पौष्टिक आहार, अशी सपोर्ट सिस्टीम असली तरी सततचा मेकअप आणि प्रखर प्रकाश हे सगळं गणितच बिघडवू शकतात. त्यात कधी वेगळी व्यक्तिरेखा म्हणून दोन-तीन तास चालणारा मेकअप आणि तो सांभाळून अभिनय करण्याची कसरत हे ‘दिसतं तितकं सोपं’ अजिबात नसते. कधी काळी दिलीपकुमार आणि आता शाहरुख खान यांनी अगदी मोजक्याच चित्रपटात भूमिका साकारण्यामागे या मेकअपपासून दूर राहता यायला हवे, हेदेखील एक ‘अघोषित’ कारण आहे.
मुमताजने चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले तेव्हाची आठवण सांगतो. आता मुमताज म्हणताक्षणीच अस्सल चित्रपटरसिकांच्या डोळ्यासमोर ‘बिंदीया चमकेगी..’ आले आहेच. तिने उद्योगपती मयूर वाधवानी यांच्याशी लग्न करून चित्रपटसृष्टीपासून दूर जाणं पसंत केले. त्यानंतर पंधरा वर्षांनी म्हणजे १९९० साली तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले. एके दिवशी निर्माते पहलाज निहलानी यांच्याकडून ‘आन्धियाँ’ या चित्रपटाच्या मुहूर्ताचे आमंत्रण हाती येताच त्यावरचे मुमताजचे नाव वाचताना तिचं दो रास्ते, खिलौना, प्रेम कहानी, लोफर वगैरे वगैरे चित्रपटातील रुपडे डोळ्यात घेऊनच जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील या चित्रपटाच्या मुहूर्ताला गेलो आणि आताच्या मुमताजला पाहून मनात आले, तिनं राजकुमार कोहली दिग्दर्शित ‘नागिन’ (१९७६) चित्रपटानंतर थांबायचा घेतलेला निर्णय घट्ट धरून ठेवायला हवा होता. हा चित्रपट पडद्यावर आला आणि पहिल्याच खेळाला रसिकांनी नाकारला. कारण, मेकअपदेखील मुमताजचे वाढलेले वय झाकू शकले नव्हते.

अभिनयाच्या क्षेत्रात वावरायचे तर ‘चेहरा रंगवून’ घेणं आवश्यक आणि ते करताना वाढतं वय त्याच चेहऱ्यावर येणार नाही, दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेणेही आवश्यक. हेमा मालिनींना ते जमलंय. चित्रपटसृष्टीत साठ वर्षांची कारकीर्द होऊनही त्यांनी आपले व्यक्तिमत्व छान प्रसन्न ठेवले आहे. उपजत असलेल्या सौंदर्याला सकारात्मक दृष्टिकोनाची सपोर्ट सिस्टीम ही हेमा मालिनीची खुबी. वाढतं वय कोणालाही चुकलेले नाही. वय हा माझ्यासाठी एक आकडा आहे असं म्हणणं स्वतःचे समाधान करून घेण्यासाठी आणि सतत कार्यरत राहण्यासाठी चांगला गुण आहे. देव आनंदला तो जमला आणि झेपला. सगळेच देव आनंद कसे होतील? गॅन्गस्टर, सेन्सॉर या चित्रपटापासूनचा देव आनंद आपल्या पडद्यावरच्या प्रतिमेच्या प्रेमात असून प्रत्यक्षात तसा वावरतोय असं या चित्रपटाच्या वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओतील मुहूर्ताना लाईव्ह दिसलं.
मेहबूब त्याचा अतिशय आवडता स्टुडिओ आणि आपल्या चित्रपटाच्या मुहूर्ताला आम्हा सिनेपत्रकारांना आमंत्रित करणे त्याचा शौक. देव आनंदभक्तांना त्याचे गॅन्ग्सस्टर, सेन्सॉर या नावाचे चित्रपट होते हे माहित नसेल आणि त्याची माहिती करून घ्यावी, असेही वाटत नसेल. कारण त्यात “अभी तो मै जवान हूँ..” म्हणणारा देव आनंद दिसत नाही. कलाकाराला मेकअपही टाळता येत नाही (पण तो फार फार आवडतो) आणि वाढते वयही स्वीकारावेच लागते (ते अजिबात आवडत नाही) आणि मग ते कधी बेसावधपणे दिसते. सलमान खानचे तेच तर झाले आहे…
(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

