Homeमाय व्हॉईसदिल्लीत चर्चा फडणवीसांचीच!

दिल्लीत चर्चा फडणवीसांचीच!

मराठी माणसाला फार वर्षांपासून दिल्लीचे मोठे आकर्षण राहिले आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या दीडशे वर्षांच्या काळात असंख्य मराठी नेत्यांनी, क्रांतीकारकांनी देशाच्या राजकारणाला वेळोवेळी आकार दिला. त्याआधी पेशव्यांनी दिल्लीचे रक्षण केले आणि मुघल बादशहाला गादीवर बसवून राज्य चालवले. दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी पेशव्यांनी अन् त्यांच्या सरदारांनी सांभाळली. एक पानीपतचा पराभव आपण मनात कुरवाळत राहिलो. पण, त्याआधी व नंतर अनेकदा पानिपतात मराठ्यांनी गिलच्यांना, अफगाणांना पाणी पाजलेले आहे, हे विसरतो. आजही आपण दिल्लीत पाऊल ठेवतो तेव्हा हे सारे असंख्य जुनेनवे संदर्भ आठवतात आणि महाराष्ट्राची आणि दिल्लीची नाळ कधीचीच जुळलली आहे हे जाणवते!

राजकारणात एखादा प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच, “चलो दिल्ली”ची हाक दिली जाते. अशा आंदोलनातही मराठी माणसेच तळपलेली आहेत. अण्णा हजारेंनी केलेले आंदोलन आजही दिल्लीच्या स्मरणात आहे. खरेतर, “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री” असंख्य वेळा धाऊन गेला आहे. आचार्य अत्र्यांनी यंशवंतरावांच्या दिल्ली प्रवेशाच्या वेळी ती हेडलाईन झळकावली आणि तेव्हापासून दिल्लीच्या मदतीला निघणाऱ्या प्रत्येक मराठी नेत्यासाठी आपण सह्याद्रीची उपमा द्यायला लागलो! यशवंतराव चव्हाण यांच्या आधीही नेहरुंच्या त्या पहिल्या मंत्रीमडंळात मराठी नेते होतेच. पण आपल्या ध्यानी चव्हाण साहेबांनी 1962च्या चिनी आक्रमणानंतर हाती घेतलेले संरक्षणमंत्रीपद मात्र कायमचे कोरले गेले आहे. तोच पराक्रम साधारण तीस वर्षांनंतर त्यांचे शिष्योत्तम मानले जाणारे शरद पवार यांनी केला. पंतप्रधान नरसिंहराव यांच्या मंत्रीमंडळात 1991मध्ये पवार साहेबांनी संरक्षणमंत्रीपद स्वीकारले. त्याआधी काकासाहेब गाडगीळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सी. डी. देशमुख, वसंत साठे, विठ्ठलराव गाडगीळ अशा अनेक नेत्यांनी दिल्ली गाजवली होती.

दिल्ली

पवार साहेबांनंतर पुन्हा तीस वर्षांनी दुसरा एक जोरदार, जोमदार मराठी नेता दिल्लीत दाखल झाला. ते म्हणजे नितीन गडकरी. गेली बारा वर्षे ते केंद्रीय मंत्री म्हणून चमकदार कामगिरी करत आहेत. मध्यंतरी वाजपेयी सरकारच्या कालावधीत राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हेही दिल्लीत गेलेच होते. नजीकच्या भविष्यात आणखी एक मराठी नेते दिल्लीत चमकतील असे मानले जाते आहे. चव्हाण, पवार आणि जोशी यांच्यानंतरचे चौथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या संभाव्य दिल्ली प्रवेशाची जोरदार चर्चा राजधानीत ऐकू येते! त्यांच्याबरोबरीने सध्या दिल्लीच्या राजकीय क्षितिजावर आणखी एक मराठी नेते जोमदारपणाने तळपत आहेत. सत्तारूढ भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे. तावडेंनी परवाच्या भेटीत केंद्रीय मंत्रीमंडळात जाण्याची शक्यता मात्र साफ फेटाळून लावली. पाच राज्यांच्या पुढे येणाऱ्या निवडणुकीच्या कामातच मी राहीन, असे ते म्हणाले. पुढचे केंद्रीय स्तरावरील मराठी नेते फडणवीस ठरणार, याची खात्रीच दिल्लीतील नेते, पत्रकार, खासदार व्यक्त करत असतात. देशातील ज्या नेत्यांना पंतप्रधानपदाच्या भावी स्पर्धेत सध्या पाहिले जाते, त्यात फडणवीसांचे नाव हमखास येते! स्वतः फडणवीस मात्र अर्थातच याबाबतीत मौन बाळगूनच आहे व ते योग्यही आहे.

एका परिषदेच्या निमित्ताने अलिकडेच दिल्लीत जाण्याचा योग आला. तेव्हा या साऱ्या संदर्भांची उजळणी आपोआपच झाली. विविध अधिकाऱ्यांशी, पत्रकारांशी व सर्वसामान्य दिल्लीकर नागरिकांशी बोलताना हे संदर्भ सहजच येत राहिले. एकेकाळी आपण असे म्हणायचो की, महाराष्ट्राचा फारसा प्रभाव दिल्लीत पडत नाही. मराठी अधिकारी दिल्लीत फारसे जात नसत. दिल्लीत पोस्टींग मिळाली तरी ते नाकारत असत, असाही काळ मागे येऊन गेला. मुळात आयएएस, आयएफएस, आयपीएस, आयआरएस वगैरे ज्या 26 भारतीय सेवा आहेत, तिथे मराठी मुले-मुली मोठ्या प्रमाणात जाऊ शकत नाहीत. बिहारचे वर्चस्व या भारतीय सेवांमध्ये अधिक आहे. पण या दिल्ली दौऱ्यात काही थक्क करणारी माहिती मिळाली. महाराष्ट्राचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय दिल्लीत चांगले काम करत आहे. संचालक म्हणून हेमराज बागुल, हे वरिष्ठ अधिकारी सध्या दिल्लीत कार्यरत आहेत. गेल्या वर्षी दिल्लीत पार पडलेल्या 99व्या साहित्य संमेलनाच्या यशात बागुल यांच्या टीमचा मोठा वाटा राहिला हे दिल्लीकर पत्रकार सांगतात. कॅनॉट प्लेसमधील महाराष्ट्र परिचय केंद्रात बागुल यांची  भेट झाली. महाराष्ट्र परिचय केंद्रात जे ग्रंथसंग्रहालय आहे, तिथे पंचवीस हजारांच्या आसपास पुस्तके आहेत. त्याचा चांगला वापर अनेक मराठी खासदार नियमितपणे करतात. एक जुना किस्सा तिथे ऐकायला मिळाला. शरद पवार तिथली पुस्तके नियमित वाचत असत. कृषीमंत्री असताना त्यांना एक संदर्भ तातडीने हवा होता. सूर्यकांता पाटील तेव्हा राज्यमंत्री होत्या. पवार साहेबांनी त्यांना पुस्तकाच्या मागावर धाडले. रात्री दहाच्या सुमारास महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकाऱ्यांना फोन गेले. केंद्र उघडले गेले. सूर्यकांताताई स्वतः तिथे आल्या. पवार साहेबांनी ते पुस्तक नेमके कुठे आहे, कोणत्या कपाटात आहे, हेही सांगितले होते! त्यानुसार तो संदर्भग्रंथ घेऊन त्या तातडीने पवार साहेबांकडे गेल्या. साहेबांनी दुसऱ्या दिवशीच्या संसदेतील महत्त्वाच्या भाषणात तो संदर्भ वापरला. ही गोष्ट पवारांची थोरवी सांगते तशीच, ती महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या कर्तव्यपरायणतेची साक्ष देणारी आणि ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित करणारीही आहे.

दिल्ली

सध्या तिथे नूतनीकरणाचे काम सुरु आहे. नूतनीकरणानंतर वाचनालय, अन्य कार्यालये, तसेच एक छोटे सभागृह तिथे साकारेल. महाराष्ट्रातून आलेले पाहुणे दिल्लीकर मराठी लोकांशी तिथे संवाद साधू शकतील. दिल्लीत मराठी अधिकाऱ्यांची संख्या सध्या सहाशेच्या आसपास आहे! हे अधिकारी अर्थातच विविध केंद्रीय सेवांमध्ये वरिष्ठ स्तरावर कार्यरत आहेत. महाराष्ट्रासाठी ही बाबही लक्षणीय आहे. इथे 54 मराठी मंडळे आहेत. ही बाबही आपल्याला परिचित नसते. दिल्ली आता फक्त नवी दिल्ली वा करोल बाग इतकीच मर्यादित नाही. पश्चिम विहार, यमुना पार, नोएडा, गुरुग्राम वगैरे लांब पसरलेल्या दिल्ली महानगर परिसरात सुमारे तीन-साडेतीन लाख मराठी लोक राहतात. या दूरदूर पसरलेल्या मराठी माणसांच्या विविध मंडळांना एका प्लॅटफॉर्मवर एकत्र आणण्याचे काम आता महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे केले जाते आहे. हा एक स्तुत्य उपक्रम आहे. दिल्लीत मराठी मंडळींची प्रिय वास्तू म्हणजे नवीन महाराष्ट्र सदन. जुने महाराष्ट्र सदन कोपर्निकस मार्गावर आहे. नवीन सदन हे त्याजवळच, कस्तुरबा गांधी मार्गावर आहे. नव्या सदनाची उभारणी, त्यातील वादविवाद हा एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा! या नव्या सदनात महाराष्ट्राच्या विशेष आयुक्त श्वेता सिंघल यांचे कार्यालय आहे. दिल्लीतील महाराष्ट्र राज्य सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्यांचे मुख्य काम संपर्क व समन्वयाचे असते. राज्यपाल, मुख्यमंत्री, अन्य वरिष्ठ मंत्री, आमदार खासदार यांच्या दिल्ली भेटीवेळी राजशिष्टाचारानुसार व्यवस्था करण्याचे काम आयुक्तांचे कार्यालय करते. मुख्यमंत्री व मुख्य सचिवांच्या अन्य मंत्री व विभागीय सचिवांच्या विविध खात्यांशी संबंधित बैठका दिल्लीत नित्यनेमाने होत असतात. त्यातही महाराष्ट्राच्या विशेष आयुक्तांची भूमिका महत्त्वाची असते. तर, असा आहे, सध्या दिल्लीतला मराठी बाणा!

(लेखक अनिकेत जोशी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

शिवसेना आणि शिव्यांच्या समीकरणात नवे ते काय?

शिवसेना आणि शिव्या हे काही नवे समीकरण नाही. मूळची ठाकरेंची सेना असेल वा आता एकनाथ शिंदेंची मान्यताप्राप्त खरी शिवसेना असेल, सेनेच्या आजी-माजी मंत्र्यांनी, नेत्यांनी जाहीरपणाने शिवीगाळ केल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता मंत्री असलेल्यांच्याही तोंडी पूर्वी अनेकदा शिव्या आल्याची असंख्य...

आभासी माध्यमाद्वारे अमेरिकेतून भारतात हिट केले गेलेले स्लोगन ‘कॉक्रोच’!

प्रत्येक कालखंडात एखादे वाक्य, एखादी चमकदार शब्दरचना जनमन मोहवते. लोक त्याच स्लोगनभोवती विचार करतात. त्यातून त्या वाक्यार्थाचे वलयही वाढते. “इंदिरा इज इंडिया”, असे तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष सत्तरच्या दशकात म्हणाले. तेव्हा त्याविरोधातील लोक, नेते, पक्ष एकत्र आले होते.  गरिबी हटाव,...

सत्तेपाठोपाठ ममतांची तृणमूलवरची पकडही गेली!

देशाच्या राजकारणात तब्बल पन्नास वर्षांनंतर अशी स्थिती आली आहे की, पश्चिम बंगाल आणि दिल्लीत एकाच पक्षाचे राज्य आले आहे. १९७७मध्ये पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे नेते सिद्धार्थ शंकर रे, हे मुख्यमंत्री होते तर दिल्लीत इंदिरा गांधींचे काँग्रेसचे राज्य सुरु होते. त्यानंतर...
Skip to content