आता ऐका रेल्वे पोलिसांच्या भ्रष्टाचाराची आणखी एक ‘सुरस’ कथा! आयुक्तांच्या जन्मदिनी बोटात सरकवली गेली सोन्याची अंगठी तर हातात टेकवले गेले सोन्याचेच बिस्कूट… लगे रहो भाय….
“करा रे खुश्शाल करा हवा तो राडा।
धम्माल करण्याचा जमाना आहे!
बिन्धास करा बलात्कार-भ्रष्टाचार-अत्याचार
भर सभेत, लोकसभेत…
हवामान चांगले आहे, फेस्टिव्हल-कार्निव्हलचा सिझन आहे!
सहनशील आहेत समजूतदार गांडू।
रडतात-ओरडतात, पण धोक्याची घंटा वाजवीत नाहीत” (कळावे – शांताराम)
ही त्यामानाने जुनी कविता आठवण्याचे कारण आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती.. अगदी कवितेत वर्णन केल्याप्रमाणेच असल्याने त्याच ओळी निवडण्याचे ठरवले. मुंबई पोलीस, राज्य पोलिसांचे गैरप्रकार तसे पाहिले तर दररोज कुठे ना कुठे तरी वाचायला मिळतातच! परंतु रेल्वे पोलिसांबाबत आतल्याआत बरेच गैरप्रकार बिनधास्त सुरूच असतात, त्याची वाच्यता इतकी होत नाही. कारण, ‘विना तिकिटा’शिवाय जनतेशी त्यांचा इतका संबंधच येत नाही. परंतु आता हाती आलेली माहिती इतकी संतापजनक आहे की लेखणीलाही राहवले नाही.

मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कलासागर यांचा वाढदिवस दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या सहकारी व कानिष्ठ सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. आता बॉसचा वाढदिवस म्हटला की, फुल्टू धमालच! केक व गोडघॊड याची तर लयलूटच होती. रंगीत द्रव्यही होते, असं समजते. पार्टी खासगी असल्याने याबाबत वाद नाही. (रंगीत द्रव्याबाबत मात्र नक्कीच वाद आहे, कारण पोलीस नियमानुसार पोलिसांनी दारू पिणेच बेकायदा असल्याचे ज्येष्ठ अधिकारी सांगतात. म्हणजे खासगी असो वा सार्वजनिक समारंभ, पोलिसांना दारू व्यर्जच!) यानंतर भेटवस्तूंचे आदानप्रदान झाले आणि नेमके येथेच वादाचा नवा बॉम्बस्फोट झाला. काही अतिशय जवळच्या सहकाऱ्यांनी दीड तोळ्याची सोन्याची अंगठी हळूच साहेबांच्या बोटात सरकवली! अंगठी बोटात सरकवली गेल्यावर एकाचे धाडस अजून वाढले व त्या पठ्ठ्याने तर 10/12 ग्रामचे सोन्याचं बिस्कूटच प्रदान केल्याचे उपस्थितांपैकी एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
दरम्यान, या वाढदिवस पार्टीच्या निमित्ताने माहिती जमवण्यासाठी बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) रेल्वेस्थानकात फेरफटका मारला असता आणखी काही संतापजनक माहिती हाती आली. वाढदिवशी किमती भेटवस्तू देणे ही तशी नेहमीचीच गोष्ट आहे. पण ही सोनेरी भेटवस्तू देण्यामागे रेल्वे पोलिसांची एक ‘सोनेरी’ टोळी असल्याचे स्थानक परिसरात बोलले जात आहे. सोन्याची वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या काही टोळ्या कार्यरत असून रेल्वे पोलिसांना हाताशी धरून सुरक्षित वाहतूक करण्याचा या व्यापाऱ्यांचा हेतू आहे. सोनेरी कवचाशिवाय तो पूर्ण होऊ शकत नाही, असे पोलिसांनीच मनावर बिंबवल्यामुळेच या ‘सोनेरी’ भेटवस्तू आल्या असाव्यात, असे एका माहितीगाराने सूचित केले. यासाठी आयुक्त साहेबांनी एका विशिष्ट बक्कल क्रमांकधाऱ्याला ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून नेमले आहे. हवालदार दर्जाच्या व्यक्तीला कुणी असा ‘जनसपंर्क अधिकारी’ नेमतो का?, असा सवाल पोलीसच करत आहेत.

सोने व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी झव्हेरी बाजार ते घाटकोपर अशा फेऱ्या मारण्यासाठी एकदोन पोलिसांचे पथक असून या पथकातही मतभेद असल्याचे माहितगाराने सांगितले. घाटकोपर मुक्कामी गेल्यावर स्थानकासमोर असलेल्या ‘हेडक्वार्टर’ नामक बारमध्ये व्यापारी व पोलीस मंडळींचे ‘श्रम परिहार’ कार्यक्रम तबियतीने केले जाते. किंबहुना अनेक रेल्वे पोलिसांचे या बारमध्ये खाते असल्याचे बोलले जात आहे. सोबत ‘आज की रात मोहब्बत आँखों से कर ले..’ असा उताराही दिला जातो म्हणे… हे पथक कामाला आहे रेल्वेस्थानकात. मात्र ही मंडळी नेहमीच झव्हेरी बाजारात कशाला जातात, जातात तर जातात ते संध्याकाळपर्यंत तेथेच काय करत असतात, याचा शोध पोलीस महासंचालकांनी लावावा, अशी मागणीही एका ‘जागल्या’ने केली. कॉल रेकॉर्ड मागवले असता या पथकाचा ठावठिकाणा नक्कीच हाती लागेल, असा भरवसा अनेकांनी व्यक्त केला. याहूनही संतापजनक बाब न्हणजे दोनतीन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या दिवशी स्वतः आयुक्त वसईत कामानिमित्त गेले होते तेव्हा हे हवालदार महाशय बोरीबंदर स्थनाक सोडून घाटकोपरच्या त्या नेहमीच्या बारमध्ये काय करत होते, हेही पोलीस खात्याला व पर्यायाने जनतेला समजले पाहिजे.
जाता जाता ‘नादा’च्या दोन ओळी…
“हो रही है फिर कहीं
वनवास की तैयारियाँ
तूटते रिश्तों में रावणकी
अना मौजुद है”…
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

