Homeमाय व्हॉईसठाकरेंच्या 'किचन कॅबिनेट'मध्येच...

ठाकरेंच्या ‘किचन कॅबिनेट’मध्येच होता अस्तनीतला निखारा!

सचिन अहिर ठाकरे कुटुंबियांना धडा शिकवून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत निघून गेले. खरे म्हणजे सचिन अहिर यांचे राजकारण बारा वर्षांपूर्वी सुनील शिंदे या निष्ठावान शिवसैनिकाने संपवले होते. सचिन अहिर राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री असताना सुनील शिंदे यांनी वरळी मतदारसंघात त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. सुनील शिंदे पंधरा वर्षे वरळीचे शाखाप्रमुख होते. त्यानंतर ते नगरसेवक झाले. बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. अतिशय मृदू स्वभावाचे व जमिनीवरचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यामुळेच वरळीच्या जनतेने त्यांना 2014 साली विधानसभेवर पाठवले. परंतु, आदित्य ठाकरे यांना विधानसभेवर पाठवण्यासाठी 2019 साली सुनील शिंदे यांचे तिकीट कापण्यात आले. आदित्य ठाकरे यांना निवडून येण्यासाठी कोणतीही रिस्क नको म्हणून पुढे सचिन अहिर यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला. 2022 साली अहिर यांना शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली. अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून अहिर यांना संधी देण्यात आली.

ठाकरे

फक्त परिषद नव्हे तर अहिर, आदित्य ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय झाले. त्यांना पुणे जिल्ह्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे संपर्क नेतेपद देण्यात आले. भारतीय कामगार सेना, या शिवसेनेच्या मोठ्या संघटनेचे सरचिटणीसपद देण्यात आले. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्षपद देण्यात आले. आशिष चेंबूरकर, सुनील शिंदे या निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून काल आलेल्या सचिन अहिर यांचे संघटनेतील महत्त्व वाढले. त्यामुळे वरळीमध्ये नाराजी होती. पण या नाराजीचे उट्टे शिवसैनिकांनी वरळीच्या विधानसभा निवडणुकीत काढले नाही. उलट त्यांनी प्रामाणिकपणे काम करून एकनाथ शिंदे यांचे मोठे आव्हान असताना आदित्य ठाकरे यांना 2024 साली मोठ्या फरकाने निवडून दिले. निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून सचिन अहिर यांना ठाकरे कुटुंबियांच्या किचन कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर त्यांच्या भावाला बेस्ट समितीचे बिगर नगरसेवक सदस्यपद देण्यात आले. त्याचबरोबर दुसऱ्या भावाला प्रभाग समितीचे सदस्यपद देण्यात आले. ही पदे निष्ठावंत शिवसैनिकांना देता आली असती. परंतु निष्ठावंतांना डावलून आयारामांना संधी दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सध्या ही अवस्था झाली आहे.

गिरणी कामगार संघटनांमध्ये गॅँगवॉरचा प्रवेश झाला. त्याचवेळी सचिन अहिर यांचे राजकारण सुरू झाले. अरुण गवळी गॅँगला गप्प बसवण्यासाठी अरुण गवळीचा भाचा असलेल्या तरुण सचिन अहिर यांना राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीसपद देण्यात आले. तेथून सचिन अहिर यांचे राजकारण सुरू झाले. 1999 साली काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांना कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय मिल मजदूर संघ आपल्या ताब्यात ठेवायचा होता. त्यामुळे शरद पवार यांनी सचिन अहिर यांना जवळ केले. वरळी मतदारसंघातून तिकीट दिले. त्यानंतर मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपदी दिले. त्यानंतर त्यांना गृहनिर्माण राज्यमंत्रीपदाची संधी दिली. परंतु साम, दाम, दंड, भेद, याचा वापर होत असताना वरळीमधून सुनील शिंदे या सामान्य शिवसैनिकाने त्यांचा 27 हजार मतांनी पराभव केला. कोणत्याही दहशतीला न जुमानता वरळीतील निष्ठावंत शिवसैनिकांनी सुनील शिंदे यांना निवडून आणले. त्याचवेळी सचिन अहिर यांचे संसदीय राजकारण संपले होते. परंतु संपलेल्या विरोधकाला जिवंत करून उद्धव ठाकरे, अर्थात त्यांच्या शिवसेनेने आपल्यावर संकट ओढवून घेतले. त्याचाच धडा नियतीने उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना दिला आहे.

ठाकरे

सचिन अहिर यांच्या जाण्याने वरळीमध्ये फारसा फरक पडणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना पुन्हा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
सचिन अहिर यांना विधान परिषदेवर संधी दिल्यामुळेच त्यांना आता विधानपरिषद उपसभापतीपद मिळाले आहे. राजकारणात आता नैतिकता राहिलेली नाही. पुढे आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी मिळणार नाही हे लक्षात आल्याने सचिन अहिर यांनी शिवसेनेकडे धाव घेतली आहे. यापुढे शिवसेना अहिर यांना विधान परिषदेवर पुन्हा संधी देईलही. परंतु फुटीर म्हणून त्यांच्यावरचा डाग पुसला जाणार नाही. दुसऱ्या बाजूला पुन्हा उपसभापतीपद मिळावे म्हणून मूळ शिवसेना सोडणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची निराशा झाली आहे. शिवसेनेने त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी दिली. मात्र, उपसभापतीपद काढून घेतले आहे. सचिन अहिर यांचा उपसभापतीपदाचा फॉर्म भरताना डॉ. नीलम गोऱ्हे यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला पचका करतील, असे त्यांना वाटले नव्हते. पण, आलीया शिंदेंच्या मना…

(लेखक नितीन सावंत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. संपर्क- 9892514124)

1 COMMENT

Comments are closed.

Continue reading

मोदींसोबत जाण्यास शरद पवार उतावीळ?

सत्तेत जावे असा आग्रह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि आमदार यांनी धरल्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची पंचाईत झाली आहे. खरे म्हणजे राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवारांची वाट सध्या बिकट आहे. त्यामुळे ते कधी पंतप्रधान...

‘गुंगी गुडिया’ ते ‘दुर्गा’- सुनेत्राताई गिरवणार का इंदिराजींचा कित्ता?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची कमान सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 'गुंगी गुडिया' संबोधून काँग्रेसने नव्या वादाला तोंड फोडले आहे. अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर सुनेत्राताईंकडे अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्त्व आले. हे नेतृत्त्व स्वीकारताना त्यांनी कोणतीही बडबड...

देवाभाऊ को गुस्सा क्यों आया?

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुण्यात पहिल्याच पावसाने बोजवारा उडवून दिला. या पावसाने मुंबईतील यंत्रणा कोसळल्या. त्याचबरोबर सहा हजार सातशे कोटी रुपये खर्च करून उभारलेला मुंबई-पुणे मिसिंग लिंक रोड रोडवर दरडी कोसळल्याने सरकारची लक्तरे वेशीवर टांगली गली. वसई, नालासोपारा, विरार...
Skip to content