Homeब्लॅक अँड व्हाईटरागावर नियंत्रण ठेवल्यास...

रागावर नियंत्रण ठेवल्यास मीरा ठरेल सरस!

यंदाच्या वर्षातील दुसऱ्या फ्रेंच ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत टेनिस विश्वाला नवे विजेते मिळाले. पुरुष गटात जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने तर महिला विभागात रशियाच्या मीरा आंद्रेवाने विजेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे या दोघांचे ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतील हे पहिलेच जेतेपद होते. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वरेव्हने अखेर आपल्या चौथ्या प्रयत्नात टेनिस विश्वातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेत आपल्या आजवरच्या कारकिर्दीतील‌ पहिलेवहिले ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम केला. याअगोदर तीनवेळा त्याला ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, अमेरिकन ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेत अंतिम फेरीत हार खावी लागली होती. गेल्याच वर्षी तो फ्रेंच स्पर्धेत कार्लोस अल्कराझकडून अंतिम फेरीत पराभूत झाला होता.

चार ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेपैकी फ्रेंच स्पर्धेत‌ झ्वेरेव्हची कामगिरी‌ नेहमीच चांगली झाली आहे. सलग ११ वर्षे तो फ्रेंच स्पर्धेत‌ थेट पात्र ठरला आहे. गेल्या सलग ‌६‌ फ्रेंच स्पर्धांत त्याने‌ या स्पर्धेची दोनदा अंतिम, दोनदा उपांत्य आणि दोन वेळा उपांत्यापूर्व फेरी गाठली होती. १९३७ साली जर्मनीच्या हेरिक हेनकेलने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर बऱ्याच मोठ्या अवधीनंतर जर्मन टेनिसपटू या ‌स्पर्धेत विजेता ठरला. तब्बल ३० वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेत पुन्हा एकदा जर्मनीच्या खेळाडूला पुरुष गटात जेतेपद मिळवता आले. १९९६ साली त्यांचा नामवंत टेनिसपटू बोरिस बेकरने शेवटची ऑस्ट्रेलियन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती.

२८ वर्षीय झ्वेरेव्ह सध्या विश्व क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. महान टेनिसपटू रॉजर फेडरर त्याचे दैवत. अलेक्झांडरचे आई, वडील दोघेही व्यवसायिक टेनिसपटू. त्यामुळे तो टेनिसकडे वळला नसता तर नवलच म्हणायचे. झ्वेरेव्हचा मोठा भाऊ‌‌‌ मिशादेखील‌ व्यवसायिक टेनिसपटू. या दोघांना सुरूवातीच्या काळात आई, वडिलांचेच प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर जुवान कार्लोस, इवान लेंडल अलेक्झांडरचे काही काळ प्रशिक्षक होते. सध्या डेविड फेरर त्याचा मुख्य प्रशिक्षक आहे. जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक ही त्याची सर्वोतम क्रमवारी होती. २०१४मध्ये ऑस्ट्रेलियन ज्युनियर ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेत जेतेपद ‌मिळवून झ्वेरेव्हचा टेनिस विश्वात उदय झाला. मग त्याची विजयी दौड सुरु झाली. वयाच्या १७व्या वर्षी त्याने एटीपी स्पर्धा जिंकून नवा विक्रम केला. दोन एटीपी स्पर्धा जिंकताना त्याने रॉजर फेडररला नमवण्याचा पराक्रम केला. वयाच्या २०व्या वर्षी जागतिक टेनिस क्रमवारीत २०वे स्थान मिळवून सर्वात तरुण टेनिसपटू होण्याचा मान मिळवला. त्याने नोवाक जोकोविचा अगोदरचा विक्रम मोडीत काढला.

आक्रमक खेळासाठी अलेक्झांडर ओळखला जातो. वेगवान सर्विस आणि फोर हॅन्ड, बॅक हॅन्डचे तुफानी‌ फटके, ही त्याच्या खेळाची खासियत आहे. सहजासहजी तो‌ हार मानत नाही. त्याच्या लढाऊ बाण्यामुळे झ्वेरेव्हने आपल्या कारकिर्दीत काही नाट्यपूर्ण विजय मिळवले. मानाच्या लेवर चषक सांघिक स्पर्धेत त्याने युरोप संघाला दोनवेळा जेतेपद मिळवून दिले. फुटबॉल, गोल्फ, बास्केटबॉल हे त्याचे आवडते खेळ. गोल्फचा आनंद वेळ मिळेल तेव्हा झ्वेरेव्ह घेत असतो. आतापर्यंत त्याने एकूण ‌५६६ सामन्यात विजय मिळवले आहेत. आतापर्यंत झ्वेरेव्हने २५ एटीपी‌, २५ मास्टर्स स्पर्धा जिंकल्या आहेत. जर्मन स्पोर्टस् असोसिएशनने झ्वेरेव्हचा २०२३मध्ये सर्वोतम खेळाडू म्हणून सन्मान केला होता.

फ्रेंच स्पर्धेत‌ महिला गटात एकेरीत काहिशी धक्कादायक विजेतेपदाची नोंद झाली. रशियाच्या अवघ्या १९ वर्षीय मीरा आंद्रेवाने महिला एकेरीत बाजी मारुन स्पर्धेत खळबळ माजवली. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मीरा जेतेपदाचा शर्यतीत कुठेच नव्हती. पण काही स्टार खेळाडू अगोदर पराभूत झाल्याचा फायदा मीराला मिळाला. १९९२ साली मोनिका सेलसने वयाच्या १९व्या वर्षी ही स्पर्धा जिंकून नवा इतिहास रचला होता. आता मोनिकानंतर मीरा ही स्पर्धा जिंकणारी दुसरी तरुण खेळाडू ठरली. मीराने २०२४मध्ये फ्रेंच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. यंदा तिने एक पाऊल पुढे टाकून थेट जेतेपदावर कब्जा केला. २०१४मध्ये रशियाच्या मारिया शारापोवाने येथे आपले दुसरे विजेतेपद मिळवले होते. तिच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारी रशियाची ही केवळ दुसरी खेळाडू ठरली आहे. सध्या विश्व क्रमवारीत ६व्या स्थानावर असलेल्या मीराचे हे अवघे सहावे विजेतेपद होते.

मीराची प्रशिक्षिका कोंचिता मार्टिनेझ आहे. याच स्पर्धेत ती २००८मध्ये अंतिम फेरीत मेरी पिर्यसकडून पराभूत झाली होती. योगायोग म्हणजे त्याच पिर्यसने मीराला विजेतेपदाचा चषक प्रदान केला. अखेर कोंचिताच्या शिष्याने तिचे जेतेपदाचे स्वप्न साकार केले. रशियाच्या सायबेरिया शहरात मीराचा जन्म झाला. सतत टीव्हीवर सुरु असलेल्या टेनिस सामन्यांमुळे तिला टेनिसची आवड निर्माण झाली. तिची मोठी बहिण आंद्रिवादेखील चांगली टेनिस खेळायची. मग या खेळातील दोघींची आवड बघून आधिक चांगल्या प्रशिक्षणासाठी फ्रांसमधील‌ कान शहरात असलेल्या एलिट टेनिस सेंटरमध्ये पाठवले. तिथे योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळाल्यामुळे या दोघी बहिणी पुढे प्रकाशात आल्या. मग ज्युनिअर स्पर्धांत दोघींनी चमक दाखवण्यास सुरूवात केली. विशेष‌‌ म्हणजे आंद्रिवाला मागे टाकून मीरा लवकर पुढे आली.

फ्रान्समध्ये या खेळाचे प्रशिक्षण घेत असल्यामुळे फ्रेंच ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धेबाबत तिला कमालीची उत्सुकता होती. या स्पर्धेत आपण विजेतेपद मिळवायचे हे स्वप्न मीराने लहानपणी बाळगले होते. त्याची खूप लवकर पूर्तता करण्यात तिला यश मिळाले, असेच म्हणावे लागेल. २०२३च्या माद्रिद स्पर्धेत तिने वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी उपांत्यपूर्व फेरी गाठून सर्व टेनिस विश्वाचे लक्ष वेधून घेतले. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत चौथी फेरी, विम्बल्डन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी आणि अमेरिकन ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेत तिसरी फेरी गाठून मीराने इतरदेखील‌ ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेत बऱ्यापैकी कामगिरी‌ करुन दाखवली आहे. बेसलाईनवरुन आक्रमक खेळ करायला तिला आवडते. तिच्या फोर हॅन्ड, बॅक हॅन्ड फटक्यात चांगली ताकद आहे. भविष्यात मात्र‌ तिने सर्व्हिसवर अधिक भर देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रागावरदेखील तेवढेच नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. एक काळ रशियाच्याच मारिया शारापोवाने आपल्या शानदार खेळाच्या जोरावर गाजवला होता. आता तिच्यासारखी कामगिरी‌ करुन मीरा रशियाच्या महिला टेनिसला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देणार का, ते बघायचे. आता टेनिस विश्वातील वर्षातील मानाची समजली जाणारी विम्बल्डन ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धा लवकरच लंडनमध्ये सुरु होत आहे. या स्पर्धेत झ्वेरेव्ह, आंद्रेवा या दोघांची कामगिरी‌ कशी होते याकडे टेनिस जगताचे लक्ष असेल.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

कशी विसरता येईल ‘राजा’ची कारकीर्द?

भारताचे बुजूर्ग आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा समित्यांमध्ये आपल्या कामाचा शानदार ठसा उमटवणाऱ्या रणधीर सिंग यांच्या निधनामुळे भारताने एक नामवंत नेमबाज तसेच एक उत्तम क्रीडा प्रशासक गमावला आहे. "राजा" या टोपण नावाने क्रीडाविश्वात प्रसिद्ध असलेल्या रणधीर सिंग...

बेंगळुरुने पुसला ‘चोकर्स’चा शिक्का!

तब्बल १८ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर बेंगळुरु संघाला गतवर्षी पहिल्यांदाच आयपीएल चषकावर आपले नाव कोरण्यात यश मिळाले होते. त्या विजयाची अपेक्षेप्रमाणे पुनरावृत्ती करण्यात यंदादेखील बेंगळुरु संघ यशस्वी ठरला. जेतेपदाच्या अंतिम सामन्यात काहीशा एकतर्फी लढतीत बेंगळुरुने गुजरातचा ‌५ गडी आणि २...

कबड्डीची पंढरी.. तबेला मैदान.. नव्हे, श्रमिक जिमखाना!

ज्याप्रमाणे मुंबईतील दादर (पश्चिम) येथील शिवाजी पार्क मैदान क्रिकेट खेळाची पंढरी म्हणून ओळखली जाते, तसाच काहीसा प्रकार परळ येथील गिरणगावातील ना. म. जोशी मार्गावर असलेल्या श्रमिक जिमखाना मैदानाबाबत, कबड्डी या अस्सल मराठमोळ्या खेळाबाबत म्हणता येईल. सुरूवातीच्या काळात "तबेला मैदान"...
Skip to content