शांघाय, चीन येथे झालेल्या तिरंदाजीतल्या वर्ल्डकप मालिकेतील दुसऱ्या टप्प्यात भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना “रिर्कव्ह” विभागात सुवर्णपदकावर अचूक निशाणा साधला. या स्पर्धेत भारतीय संघाने आशिया खंडातील बलाढ्य देश दक्षिण कोरियाला उपांत्य फेरीत आणि यजमान चीनला अंतिम फेरीत नमवून मिळवलेल्या यशामुळे भारतीय संघाच्या या विजयाला एक वेगळीच किनार आहे. त्यामुळे भारतीय संघाचे हे यश खूप मोठे आहे, असेच म्हणावे लागेल. ५ वर्षांच्या अवधीनंतर पुन्हां एकदा भारतीय महिला तिरंदाज “रिर्कव्ह” विभागात सुवर्णपदक मिळवण्यात यशस्वी ठरले. याअगोदर भारताने २०२१मध्ये पॉरिस येथे झालेल्या स्पर्धेत “रिर्कव्ह” प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. अंतिम फेरीत भारताने बलवान यजमान चीनला अटीतटीच्या लढतीत ५-४ (२८-२६) असे नमवत सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला. विश्व क्रमवारीत भारत चौथ्या आणि चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

नियमित ४ सेटमध्ये बरोबरी झाल्यानंतर “शूटऑफ”चा अवंलब केला गेला. चीनच्या युवा हुआंग आणि यू की हिला चौथ्या सेटपर्यंत सातत्य राखणे जमले नाही. त्याचा फायदा भारताला मिळाला. शेवटच्या प्रयत्नात यू कीला नऊ गुणांची गरज होती. पण तिला आठच गुण घेता आले. “शूटआऊट”मध्ये पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्राच्या कुमकूम मोहोडने १० गुणांची कमाई केली. मग अंकिता भकतने दुसऱ्या प्रयत्नात ९ गुणांचा वेध घेतला. अखेरच्या प्रयत्नात भारतीय बुजूर्ग महिला नेमबाज दीपिका कुमारीने आपला सारा अनुभव पणाला लावत संयम राखून ९ गुण मिळवून भारताच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघासोबत नियुक्तीच्या तिढ्यामुळे पूर्णवेळ प्रशिक्षक नव्हता. त्यामुळे दीपिकानेच मग खेळाडू आणि प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिका बजावली. तिने आपल्या सहकारी खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला. दबावाखाली त्यांना धीर दिला. त्यामुळे भारतीय विजयात दीपिकाची भूमिका मोठी राहिली.
३१ वर्षीय दीपिकाचे विश्वचषक स्पर्धेतील हे १२वे पदक होते. दीपिकाने आता ज्योती सुरेखाच्या १२ पदकांच्या विक्रमाची बरोबरी केली. सात विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने कुठले ना कुठले पदक जिंकले. त्या सर्व विश्वचषक स्पर्धांत पदकविजेत्या भारतीय संघात दीपिकाचा समावेश होता. आतापर्यंत तिने ४ ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याअगोदर उपांत्य फेरीतील सामन्यात भारताने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या आणि ऑलिंपिक स्पर्धेत तब्बल १० सुवर्णपदकं मिळवणाऱ्या दक्षिण कोरियाच्या संघाला ५-१ असे सहज नमवून स्पर्धेत खळबळ माजवली. दीपिका कुमारी, अंकिता भकत, कुमकूम मोहोड या तिघींचा भारतीय विजयात मोठा वाटा होता. भारतीय तिरंदाजांनी या सामन्यात एकूण ११ वेळा १० गुणांचा अचूक नेम साधला. त्यामध्ये कुमकूमची कामगिरी अधिक सरस होती. तिने ५ वेळा १० गुणांचा वेध घेतला. तिची ९.८३ गुणांची सरासरी भारतीय विजयात महत्त्वपूर्ण ठरली. त्याअगोदर उपांत्यपूर्व फेरीत भारताने उझबेकिस्तानला ६-२ असे आरामात नमवले. उपउपांत्यपूर्व फेरीत मात्र भारताला व्हिएतनामने जोरदार झुंज दिली. अखेर “शूटऑफ”मध्ये भारताने २८-२५ अशी बाजी मारली.

भारताने या स्पर्धेत १ सुवर्ण, १ कांस्यपदकाची कमाई केली. या दोन्ही पदकांत महाराष्ट्राच्या खेळाडूंचे मोठे योगदान होते. महिला संघात कुमकूम मोहोडचा समावेश होता, तर वैयक्तिक कांस्यपदक साताऱ्याच्या साहिल जाधवने पटकावले. “रिर्कव्ह” वैयक्तिक प्रकारात भारताच्या सिमरनजीत सिंग मानचे पदक थोडक्यात हुकले. ती उपांत्य फेरीत पराभूत झाली. मग कांस्यपदकाच्या लढतीत ती “शूटऑफ”मध्ये पराभूत झाली. कुमकूम ही अमरावती येथील प्रतिभावान तिरंदाज आहे. ज्युनिअर गटातील स्पर्धात सहभागी होत असताना तिने भारतीय वरिष्ठ महिला संघात स्थान मिळवले ही गोष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे. बलाढ्य दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात ती डगमगली नाही. या सामन्यात सहा तिरंदाजांमध्ये तिची सरासरी सर्वोतम होती. भावी काळात तिच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगायला हरकत नाही. यंदा आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे हे सुवर्णपदक भारतीय महिला संघाला मोठी उभारी देऊ शकते. खेळाडूंना नवा आत्मविश्वास मिळवून देऊ शकते. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत बहुतेक सामन्यात ५० ते ५५ गुणांचा वेध घेतला. ही मोठी जमेची बाजू होती. कठिण समयी आपला खेळ उंचावला. बुजूर्ग अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारीने आघाडीवर राहून किल्ला लढवला. आपल्या सहकाऱ्यांचा हुरुप वाढवला. भावी काळात भारतीय महिला तिरंदाजी संघ आणखी कोणते नवे विक्रम साजरे करतो ते बघायचे.
(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

