मुंबईतल्या ना. म. जोशी मार्गावरील बंड्या मारूती सेवा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून कबड्डीच्या पंढरीत, श्रमिक जिमखाना मैदानात अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे देखणे, दिमाखादार असे नुकतेच आयोजन केले. रंगतदार, चुरशीच्या, अटीतटीच्या लढतींमुळे गिरणगावातील कबड्डी रसिकांना त्यामुळे या खेळाचा खराखुरा आनंद घेता आला. चाहत्यांची चांगली गर्दी रोजच्या सामन्यांना होती. बऱ्याच मोठ्या अवधीनंतर मुंबईत पुन्हा एकदा अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे बिगुल वाजले. २०१०मध्ये बी. के. फाऊंडेशन आणि महर्षी दयानंद स्पोर्टस् क्लब यांनी संयुक्तपणे काळाचौकी येथे अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबापुरीत अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत कबड्डीचा दम घुमला. श्रमिक जिमखान्यात तर जवळजवळ पाच दशकानंतर पुन्हा एकदा अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले गेले.

महाराष्ट्रातील सात आणि इतर राज्यातील आठ व्यवसायिक कबड्डी संघाना या स्पर्धेत प्रवेश देण्यात आला होता. या संघांची पाच गटात विभागणी करण्यात आली होती. रोख १२ लाख १२ हजार रुपयांची घसघशीत रक्कमेची पारितोषिके स्पर्धेत ठेवण्यात आली होती. बलाढ्य भारतीय नौदल संघाने चढाई, क्षेत्ररक्षण या खेळाच्या दोन्ही अंगात जबरदस्त खेळ करुन जेतेपदावर कब्जा करण्यात यश मिळवले. राष्ट्रीय आणि काही प्रो कबड्डी लिगमधील खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय नौदल संघाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करुन कबड्डीप्रेमींची मने जिंकली. क गटात समावेश असलेल्या भारतीय नौदलाने मुंबई बंदर, तामील थलाईवास यांना सहज नमवून स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्या लढतीत मग दक्षिणमध्य रेल्वेने भारतीय नौदलाला जोरदार झुंज दिली. विश्रांतीला २३-१६ गुणांची आघाडी घेण्यात रेल्वे संघाला यश आले. पण विश्रांतीनंतर नौदलाने सामन्यात टॉप गियर टाकत रेल्वे संघावर ४४-४३ गुणांनी बाजी उलटवली. अतीउत्साह रेल्वेच्या पराभवाला कारणीभूत ठरला. नौदलाच्या रोहित तोमरने तुफानी चढाया करुन रेल्वे संघाचे क्षेत्ररक्षण खिळखिळे करुन टाकले. त्याला सूरजीत, रिंकूने सफाईदार पकडी करुन छान साथ दिली. रेल्वेच्या भारत खत्री, आयन लोचनने विजयासाठी शेवटपर्यत जोरदार प्रयत्न केले. पण दैवाची साथ त्यांना मिळाली नाही.

उपांत्य फेरीत भारतीय नौदलाने युवा पलटन, इंशोअर कोट प्रा. लि.चे आव्हान मात्र ५६-४२ गुणांनी सहज परतवून लावले. निर्णायक लढत जिंकताना नौदलाने युपी योद्धालादेखील ४६-२७ गुणांनी सहज नमवले. दोन्ही संघांनी सुरूवातीला सावध पवित्रा घेतला. पण नंतर नौदलाने सामन्यावर वर्चस्व राखले. नौदलाच्या आक्रमक खेळासमोर युपी योद्धाची मात्रा फारशी चालली नाही. सुरूवातीपासुन आक्रमक खेळ करीत नौदल संघाने गुणांचा धडाका लावला. पहिला लोण देत १६-१० गुणांची आघाडी घेतली. विश्रांतीला त्यांच्याकडे २७-१८ गुणांची आघाडी होती. विश्रांतीनंतर भारतीय नौदलाने झटपट दोन लोण देत सामन्याचा निकाल लावून टाकला. चढाईत भरत हुडाने १५ तर रोहित तोमरने ११ गुण मिळवून युपी योद्धाचा बचाव वांरवार भेदला, तर रिंकूने सुरेख पकडी करुन या दोघांना चांगली साथ दिली. पराभूत संघाच्या मनू, गगनने विजयासाठी जोरदार प्रयत्न केले, पण ते अपुरे ठरले.

विजेत्या भारतीय नौदल संघाला ५ लाख रुपये आणि आर्कषक चषक देऊन गौरविण्यात आले. उपविजेत्या युपी योद्धा संघाला ३ लाख रुपये आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याअगोदर उपांत्य फेरीच्या सामन्यात युपी योद्धाने युनियन बँकेचा आरामात पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी बलाढय़ भारत पेट्रोलियमचादेखील ५४-३६ गुणांनी सहज पराभव केला. तामील थलाईवास, रेड आर्मी, जयपूर पिंक क्लब ,भारत पेटोलियम या काही बड्या संघांनी मात्र निराशा केली. युनियन बँक, युवा पलटन या राज्यातील दोन संघानी मात्र आपल्या शानदार खेळाचा ठसा स्पर्धेवर उमटवला. या दोन्ही संघात युवा खेळाडूंचा मोठा भरणा होता. त्यामुळे ताकद आणि अनुभवात हे दोन्ही संघ कमी पडले. संघाचे प्रशिक्षक त्याकडे लक्ष देतील अशी आशा करुया. नौदलाच्या भरत हुडाची स्पर्धेत सर्वोतम खेळाडू म्हणून निवड केली गेली, तर युपी योद्धाचे गगन गौडा, सचिन अनुक्रमे सर्वोतम चढाई, पकडीचे मानकरी ठरले. एल.आय.सी. आणि बँक ऑफ इंडियाचे मोठे सहकार्य आयोजकांना मिळाले. शिवसेना (उबाठा) युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले, तर माजी खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील शिंदे, राज्याचे माजी मंत्री अनिल परब, सचिन अहिर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला.
(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

