Homeबॅक पेजनर्तकीप्रमाणे कोर्टवर वावरणारा...

नर्तकीप्रमाणे कोर्टवर वावरणारा बॅडमिंटनपटू अखेर निवृत्त!

डेन्मार्कचा दिग्गज बॅडमिंटनपटू ३२ वर्षीय व्हिक्टर अॅक्सेलसेनने अखेर पाठदुखापतीच्या गंभीर आजारामुळे आपल्या १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला विराम देऊन बॅडमिंटनची रॅकेट कायमस्वरुपी खाली ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना नक्कीच धक्का बसला असेल. शरीराची साथ त्याला मिळाली असती तर आणखी दोन-तीन वर्षे तो सहज खेळू शकला असता. आताच्या घडीला तो विश्वातील सर्वोत्तम बॅडमिंटनपटू होता, अशीच त्याची झळाळती कारकीर्द बघितली तर म्हणायला हरकत नाही. बॅडमिंटन विश्वातील बहुतेक सर्व प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धा व्हिक्टरने जिंकल्या. त्यामध्ये दोन वेळा ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण, दोन वेळा जागतिक स्पर्धेत विजेता, जागतिक स्पर्धा मालिकांमध्ये तीन वेळा विजेता, तीन वेळा युरोपियन चषक स्पर्धा आणि ज्युनियर विश्वचषक स्पर्धा विजेता, या काही प्रमुख स्पर्धांचा समावेश आहे. मानाची सांघिक स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी थॉमस चषक स्पर्धा डेन्मार्क संघाला प्रथमच जिंकून देण्याचा पराक्रम त्याने केला.

बॅडमिंटन खेळात आशिया खंडातील खेळाडूंची जास्त मक्तेदारी राहिली आहे. ती मक्तेदारी मोडीत काढण्यात अॅक्सेलसेनने चांगले यश मिळवले. थॉमस लुंडनंतर जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा‌ व्हिक्टर बिगरआशिया देशातील केवळ दुसरा खेळाडू ठरला. तब्बल १८३ आठवडे त्याने जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले. आपल्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ५७२ सामने जिंकले. २०१० साली त्याने पहिल्यांदाच ज्युनिअर विश्वचषक बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. मग त्याने मागे वळून बघितलं नाही. त्याचा विजयाचा आलेख सतत उंचावत गेला आणि यशाची एक एक शिखरे व्हिक्टर पार करत गेला. आक्रमक खेळासाठी त्याची खासियत होती. सामने झटपट संपवण्याकडे त्याचा नेहमी कल राहिला आहे. कोर्टवर त्याचा संचार एखाद्या नर्तकीप्रमाणे असायचा. आपल्या वेगवान सर्विसला तो फोरहॅन्ड, बॅकहॅन्ड फटक्यांची चांगली जोड देत असे. व्हिक्टरचे जोरदार स्मॅश्सचे फटके परतवणे प्रतिस्पर्धी खेळाडूसमोर मोठे आव्हान असायचे. चीनचा महान बॅडमिंटनपटू‌ लीन डॅन हे त्याचे दैवत. लीनने सलग दोन ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली होती. तसाच पराक्रम मग व्हिक्टरनेदेखील करुन दाखवला होता. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाने तीन वेळा अॅक्सेलसेनची वर्षातील सर्वोतम खेळाडू म्हणून निवड केली आहे.

डेन्मार्कमधील ऑडसे शहरात त्याचा जन्म झाला होता. त्याचे वडिल चांगले बॅडमिंटन खेळाडू होते. सहाव्या वर्षी वडिल त्याला घराजवळ असलेल्या ऑडसे बॅडमिंटन क्लबमध्ये घेऊन गेले. घरात या खेळाला पोषक‌‌ असे वातावरण होते. त्यामुळे छोटा व्हिक्टर या खेळाच्या प्रेमात पडला नसता तर नवलच म्हणायचे. सुरूवातीला वडिलच त्याचे प्रशिक्षक होते. नंतर पीटर गेड, हेनरिक रोहॅड यांनी अॅक्सेलसेनच्या खेळात चांगली सुधारणा केली. १६व्या वर्षी त्याची डेन्मार्कचा राष्ट्रीय संघात निवड झाली. मग त्यांनतर सातत्याने दमदार कामगिरी करत त्याने डेन्मार्क संघातील आपले स्थान टिकवून ठेवले. डेन्मार्क संघाला एक बलाढ्य बॅडमिंटन देश बनवण्यात व्हिक्टरचे मोठे योगदान होते. २०१० साली त्याने व्यवसायिक खेळाडू होण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या काळात व्हिक्टरच्या वडिलांनी प्रशिक्षक, व्यवस्थापक अशी दुहेरी भूमिका पार पाडली. २०२५मध्ये त्याने आपल्या कारकिर्दीतील शेवटची इंडिया ओपन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. त्यानंतर पाठदुखीमुळे तो त्रस्त झाला. त्यामुळे नाईलाजाने अखेर व्हिक्टरला आपल्या कारकिर्दीला विराम देण्याचा कटू निर्णय घ्यावा लागला. फुटबॉल, टेनिस, गोल्फ त्याचे इतर आवडते खेळ. चीनी चाहत्यांशी संवाद साधता यावा म्हणून अॅक्सेलसेनने चीनी भाषादेखील शिकून घेतली. आशिया खंडातील हवामानाशी जुळवून घेता यावे म्हणून तो दुबईत स्थायिक झाला. त्याच्या निवृत्तीने या खेळातील एका अध्यायाची समाप्ती झाली. पण या खेळातील व्हिक्टरने दिलेल्या भरीव योगदानासाठी बॅडमिंटन हा खेळ कायम त्याचा ऋणी राहिल, ह्यात शंका नाही.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

Continue reading

मॅटमुळे रया गेली कबड्डीची! कांदळगावकरांची खंत!!

महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनने नुकताच सन‌ २०२५-२६चा श्रमजीवी स्व. रमेश देवाडीकर कबड्डी कार्यकर्ता हा मानाचा पुरस्कार ६७ वर्षीय दीपक कांदळगावकर यांना देऊन कबड्डी खेळातील एका सच्च्या सेवकाचा उचित गौरव केला आहे. जवळजवळ ‌५ दशके दीपक सरांनी या खेळाची निस्पृहपणे...

यंदाच्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेतही भारताची मदार सिंधुवरच!

येत्या १७ ऑगस्टपासून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु होत असलेल्या ३०व्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारताची मोठी मदार पदकाच्यादृष्टीने माजी जग्गजेती पी. व्ही. सिंधु, माजी कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीत माजी कांस्यपदक विजेती जोडी...

क्रिकेट, कुस्तीसारखे खेळ वगळल्यानंतरही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बाजी!

ग्लासगो येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरी‌च्या जोरावर भारताने पदकतालिकेत ऑस्टेलिया, इंग्लंड, कॅनडापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. भारताने या स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य,९ कांस्य, अशी एकूण ३९ पदकांची कमाई केली. १३पैकी ८...
Skip to content