Homeडेली पल्ससतीश लळीत यांना...

सतीश लळीत यांना प्रतिष्ठेचा पं. सेतूमाधवराव पगडी पुरस्कार

गेली २६ वर्षे सातत्याने केलेल्या कातळशिल्प संशोधनकार्याची दखल घेऊन अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेने २०२६चा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ज्येष्ठ इतिहास संशोधक पं. सेतूमाधवराव पगडी पुरस्कार कातळशिल्प संशोधक सतीश लळीत (सिंधुदूर्ग) यांना जाहीर केला आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रा. नामदेव गरड आणि सचिव प्राचार्य डॉ. सोपान जावळे यांनी नुकतीच ही घोषणा केली.

परिषदेच्यावतीने सन २०२३पासून थोर इतिहास संशोधक, विचारवंत, लेखक पं. सेतूमाधवराव पगडी यांच्या नावाने उत्कृष्ट व सातत्यपूर्ण संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जातो. परिषदेच्या कार्यकारी मंडळाची बैठक नुकतीच कोल्हापूर येथे झाली. या बैठकीत लळीत यांच्या कातळशिल्प क्षेत्रातील संशोधन, अर्थान्वयन, संवर्धन आणि प्रसार या कार्याची दखल म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कार्यकारी मंडळाचे कोकण विभाग प्रतिनिधी व सदस्य प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी लळीत यांच्या ओरोस येथील निवासस्थानी सदिच्छाभेट घेऊन परिषदेचे निवडपत्र त्यांना दिले.

परिषदेचे ३४वे राष्ट्रीय अधिवेशन रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय, कर्जत (जि. अहिल्यानगर) येथे ८ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे. या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि रोख सात हजार रुपये असे आहे. पं. सेतूमाधवराव पगडी (२७ ऑगस्ट, १९१०; – १४ ऑक्टोबर १९९४) हे इतिहाससंशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि महाराष्ट्र सरकारच्या ‘गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक होते. त्यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली आहेत. शिवाजी महाराजांवर लिहिलेले त्यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. सेतूमाधव पगडी इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते. इ.स. १९५१ साली औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते हैदराबाद संस्थानमध्ये सनदी अधिकारी होते.

महाराष्ट्र शासनात अनेक उच्च पदांवर काम केलेले निवृत्त अधिकारी सतीश लळीत गेली २६ वर्षे कातळशिल्प संशोधन करीत असून त्यांचा या विषयावरील संशोधनग्रंथ प्रसिद्ध आहे. ६ मे २००१ राजी त्यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील हिवाळे (ता. मालवण) येथील पहिल्या कातळशिल्प ठिकाणाचा शोध लावून त्याला व्यापक प्रसिद्धी दिली. यानंतर कुडोपी, खोटले, मोगरणे धामापूर यासह अनेक ठिकाणी सापडलेली कातळशिल्पे त्यांनी जागतिक नकाशावर आणली. मुंबई, पुणे या शहरांसह कर्नाटक, राजस्थान राज्यात झालेल्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरातत्व परिषदांमध्ये त्यांनी आपले शोधनिबंध सादर केले आहेत. कुडोपी या कातळशिल्प ठिकाणाचा समावेश ‘युनेस्को’ने जागतिक वारसास्थळाच्या तात्पुरत्या यादीत केला आहे. लळीत यांनी शोधलेले कुडोपी व खोटले येथील शोधलेले मातृदेवतेचे कातळशिल्प आणि मोगरणे धामापूर येथील संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरील एकमेव असे शिकारशिल्प विशेष उल्लेखनीय ठरले आहे.

आपण अत्यंत विनम्रतेने हा पुरस्कार स्वीकारत आहे. माझ्या कार्याची दखल घेताना काहीशा उपेक्षित राहिलेल्या कातळशिल्प विषयाला परिषदेने न्याय दिला आहे. हा पुरस्कार जबाबदारी वाढविणारा असून या पुरस्काराबद्दल आपण अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे आभार मानतो, असे लळीत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

नवरात्रीत महाराष्ट्रात होणार आरोग्याचा जागर!

नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात...

राज्य नाट्य स्पर्धेसाठी पत्रकार संघाकडून ‘ही परी अस्मानीची’!

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‘ही परी अस्मानीची’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे. या नाटकाच्या नाट्यसंहितेचे पूजन लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे...

आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीचे घवघवीत यश

मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध वजनी गटांत १४ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांची, अशी एकूण ३५ पदकांची घसघशीत कमाई केली. १४ आणि १७ वर्षांखालील या दोन...
Skip to content