पंजाबच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची चिन्हे असून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खास ‘मास्टरप्लॅन’ तयार केला असून, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर आता सिद्धू यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पंजाबने हरभजनची सुरक्षा काढताच आता केंद्राचे कवच
पंजाब सरकारने माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांची सुरक्षाव्यवस्था काढून घेतली आहे. हरभजन सिंग आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मात्र, पंजाब सरकारने सुरक्षा काढताच केंद्र सरकारने तातडीने हरभजन सिंग यांना सीआरपीएफची सुरक्षा पुरवल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
मध्य प्रदेशात उष्णतेची लाट; भोपाळमधील शाळांना सुट्टी
मध्य प्रदेशात सध्या भीषण उष्णतेने नागरिक हैराण झाले असून अनेक शहरांमध्ये तापमानाने ४४ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या उष्म्याचा धोका लक्षात घेता प्रशासनाने भोपाळमधील आठवीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हवामान खात्याने आगामी काळात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा इशारा दिला असून, नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अजित डोवाल यांची युएई राष्ट्राध्यक्षांशी भेट
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी संयुक्त अरब अमिराती (युएई)चे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर तसेच प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भारत आणि युएई यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
ज्येष्ठ छायाचित्रकार रघु राय यांचे निधन
प्रसिद्ध छायाचित्रकार आणि फोटो जर्नलिस्ट रघु राय यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ८३व्या वर्षी नवी दिल्ली येथे निधन झाले. मनोरंजन आणि पत्रकारिता विश्वात आपल्या वेगळ्या शैलीने ठसा उमटवणाऱ्या राय यांच्या निधनामुळे कला विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी टिपलेली अनेक छायाचित्रे जागतिक स्तरावर गाजली असून, त्यांच्या निधनाने भारतीय छायाचित्रण क्षेत्रातील एक मोठा आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या सोशल मीडिया प्रमुखाला अटक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) राज्य सोशल मीडिया विभागाचे प्रमुख महादेव बालगुडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बालगुडे यांनी सोशल मीडियावर नक्षलवाद्यांचे समर्थन करणारी आणि सामाजिक तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
राजस्थानमधील रिफायनरी दुरुस्तीसाठी महिना जाणार
राजस्थानमधील एचपीसीएल रिफायनरीला गळतीमुळे भीषण आग लागली होती. या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, प्लांट पुन्हा पूर्ववत होण्यासाठी साधारण ३ ते ४ आठवड्यांचा वेळ लागू शकतो, अशी माहिती कंपनी प्रशासनाने दिली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे प्राथमिक वृत्त नाही, मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
दिल्लीत विमानाला हवेतच आग; मोठा अनर्थ टळला
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २२८ प्रवाशांना घेऊन झुरिचला जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनमध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. वैमानिकाने प्रसंगावधान राखत उड्डाण रद्द केले, मात्र या गडबडीत ६ प्रवासी गंभीर जखमी झाले. तातडीने बचावकार्य राबवण्यात आल्यामुळे मोठा अपघात टळला असून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
पाकिस्तानबाबत थरुरांच्या भूमिकेने काँग्रेस अस्वस्थ
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या एका नव्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. थरूर यांनी मांडलेली भूमिका ही काँग्रेसच्या अधिकृत धोरणापेक्षा वेगळी असल्याचे दिसून येत असल्याने पक्षश्रेष्ठींमध्ये आश्चर्याचे वातावरण आहे. भाजप आणि इतर विरोधकांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.
माढयात विजेचा शॉक देऊन पत्नीची हत्त्या
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील ३६ वर्षीय भाग्यश्री क्षीरसागर या महिलेची तिच्या शिक्षक पतीने विजेचा धक्का देऊन निर्घृण हत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. छळाला कंटाळून ही हत्त्या करण्यात आल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला असून, पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पंढरपूर आणि परिसरात संताप व्यक्त होत आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप, टीएमसी कार्यकर्त्यांत राडा
पश्चिम बंगालमधील भवानीपूर येथे निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि टीएमसी (तृणमूल काँग्रेस) कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या हिंसक चकमकीत दोन्ही बाजूचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुण्यात डान्सच्या वादातून तरुणाची हत्त्या; चौघांना अटक
पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरात डान्स करण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान तरुणाच्या हत्त्येत झाले. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत ४ संशयित आरोपींना अटक केली आहे. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रायगड लॉजवर खून प्रकरण; आरोपी ६ दिवसांनंतर जेरबंद
रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील एका लॉजवर शारीरिक छळ करून हत्या करणाऱ्या अनिस खान या आरोपीला पोलिसांनी ६ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अटक केली आहे. ही घटना अत्यंत क्रूर पद्धतीने घडली होती, ज्यानंतर आरोपी पसार झाला होता. रायगड पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार; तिघांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका जिममध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या वादातून भीषण गोळीबार झाला. या रक्तरंजित थरारात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर खुनात झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
यूपी पोलीस परेडमध्ये नेहा यादव ‘स्टार परफॉर्मर’
उत्तर प्रदेश पोलीस पासिंग आऊट परेडमध्ये नेहा यादव या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेहा यादवचे ‘स्टार परफॉर्मर’ म्हणून गौरव करत ‘मिशन शक्ती’च्या यशाचे हे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने यूपी पोलिसांनी घेतलेली ही झेप ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

