Homeचिट चॅटश्री मावळी मंडळ...

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. पाच हजार देऊन सन्मानित करण्यात आले.

ठाणे चरई येथील श्री मावळी मंडळाच्या भव्य मैदानात संपन्न झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्सने पूर्वार्धातील १३-१७ अशा पिछाडीवरून पालघरच्या विवेक स्पोर्ट्सचा प्रतिकार ३७-३३ असा मोडून काढत “श्री मावळी मंडळ चषक” व रोख रु. एकावन्न हजार आपल्याकडे खेचून आणले. हरजीत, स्वीटी, सौंदर्या यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर विवेक स्पोर्ट्सने पूर्वार्धात लोण देत ४ गुणांची आघाडी मिळविली होती. उत्तरार्धात याशिका पुजारी, समृद्धी मोहिते यांनी आपला खेळ गतीमान करीत चढाईत भराभर गुण घेत लोणची परतफेड केली. त्यांना प्रतिक्षा तांडेलने उत्कृष्ट पकडी करीत छान साथ दिली. म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात स्वराज्यला सरशी साधता आली.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाने ठाण्याच्या ग्रीफिन्स जिमचा ३६-३० असा पराभव करत “श्री मावळी मंडळ चषक” व रोख रु. एकावन्न हजार आपल्या खात्यात जमा केले. आक्रमक सुरुवात करीत पहिला लोण देत श्रीराम संघाने पहिल्या डावात २०-१२ अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. दुसऱ्या डावात आणखी एक लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या डावात मात्र ग्रीफिन्सने आपल्या खेळाची गती वाढवीत लोणची परतफेड करीत गुणामधील फरक कमी केला. पण संघाला विजयी करण्यात त्यांचा खेळ कमी पडला. तुषार शिंदे, अंकुश पारले यांच्या संयमी व धूर्त चढाया, त्यांना अमित सिंग, आदित्य पारले यांची मिळालेली बचावाची साथ, यामुळे हा विजय शक्य झाला. सुरज धुंदले, मनीष धनावडे, वेदान्त धामले, आदित्य पिलाणे यांनी दुसऱ्या डावात आपला खेळ उंचावत कडवी लढत दिली.

याअगोदर झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात स्वराज्य स्पोर्ट्सने मिडलाईन अकॅडमी-नांदेडला तर विवेक स्पोर्ट्सने ओम वर्तकनगरला नमवीत अंतिम फेरी गाठली. पुरुषांत श्रीराम क्रीडाने डॉन बॉस्कोला तर ग्रीफिन्स जिमने ५-५ चढायात मिडलाईनला ३२-२९ (७-४) अशी चुरशीची मात करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. महिलांत विवेकची स्वीटी आणि स्वराज्यची समृद्धी मोहिते यांना अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि पकडीचे खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. पुरुषांत ग्रीफिन्सचा मनीष धनावडे आणि श्रीरामचा अमित सिंग यांना अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि पकडीचे खेळाडू म्हणून जाहीर करण्यात आले. या चारही खेळाडूना प्रत्येकी रोख रु. तीन हजार देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ठाणे जिल्हा कबड्डी असो.चे अध्यक्ष व ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील, मंडळाचे विश्वस्त जुगलकिशोर मुंदरा, प्रभाकर सुर्वे, कृष्णा डोंगरे, पॅट्रिक फर्नांडिस, रवींद्र आंग्रे, सुधाकर मोरे, केशव मुकणे आदी मान्यवारांच्या उपस्थित पार पडला.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content