Homeबॅक पेजआदिवासी खेळाडूंना लवकरच...

आदिवासी खेळाडूंना लवकरच येणार ‘अच्छे दिन’!

केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने छत्तीसगढ राज्याच्या सहकार्याने पहिल्यादांच आदिवासी खेळाडूंमधील गुणवत्ता हेरण्याच्या दृष्टीने खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धेचे शानदार आयोजन नुकतेच रायपूर, जगदलपूर, सरगुजा‌ या तीन ठिकाणी करण्यात आले होते. या पहिल्या स्पर्धेला देशभरातील आदिवासी खेळाडूंचा चांगला प्रतिसाद लाभला. ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील‌ ३८००पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. १०६ सुवर्णपदकांसाठी चुरस होती. अॅथलेटिक्स, जलरतण, हॉकी, फुटबॉल, तिरंदाजी, वेटलिफ्टिंग, कुस्ती या खेळांचा समावेश या पहिल्या स्पर्धेत होता. भविष्यात या खेळांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. मल्लखांब आणि कबड्डी, हे दोन खेळ प्रर्दशनीय खेळ म्हणून सामील केले गेले होते.

या पहिल्या स्पर्धेत कर्नाटक, ओडिसा, झारखंड, महाराष्ट्राच्या खेळाडुंचे वर्चस्व राहिले. कर्नाटकाने २३ सुवर्ण, ८ रौप्य, ७ कांस्यपदकांची कमाई करुन पदकतालिकेत अव्वल क्रमांकावर झेप घेतली. ओडिसाने २१ सुवर्ण, १९ रौप्य, २१ कांस्यपदक मिळवून कर्नाटकापाठोपाठ दुसरा क्रमांक मिळवला. झारखंडने ६ सुवर्ण, ८ रौप्य, ११ कांस्यपदके जिंकून तिसरे स्थान प्राप्त केले. महाराष्ट्राने पदकतालिकेत चौथे स्थान मिळवताना ६ सुवर्ण, १० रौप्य‌‌, ४ कांस्यपदके पटकावली. कर्नाटकाने जलतरण स्पर्धेत तब्बल १५ सुवर्णपदके मिळवली. अॅथलेटिक्समध्ये ५ आणि कुस्तीत ३ सुवर्णपदके जिंकली. त्यांचा जलतरणपटू मनिकांता एलने ८ आणि त्याचा सहकारी दिनेश एनने‌ ५ सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांच्याच मेघांजलीने ४ सुवर्ण, २ रौप्यपदके मिळवली. ओडिसाच्या अंजली मुंडाने ५ सुवर्णपदके जिंकून आपल्या शानदार कामगिरीचा ठसा उमटवला. यजमान छत्तीसगढने पदकतालिकेत नववा क्रमांक मिळवताना ३ सुवर्ण, १० रौप्य, ६ कांस्यपदके पटकावली.

छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना रोख रक्कमेची पारितोषिके जाहीर केली. वैयक्तिक पदकविजेत्यांना अनुक्रमे दोन, दिड‌, एक लाखाची तर सांघिक विजेत्या संघाला अनुक्रमे एक लाख, पंचाहत्तर आणि पन्नास हजार रुपयांची पारितोषिके देण्याची घोषणा त्यांनी केली. ओडिसाने हॉकीत आपले वर्चस्व राखताना पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदकांची जोडी मिळवली. पुरुष गटात त्यांनी झारखंडचा ४-१ गोलांनी सहज‌ पराभव केला. महिलांचे सुवर्णपदक मिळवताना त्यांना मिझोरामने जोरदार झुंज दिली. अखेर एकमेव गोलाच्या जोरावर ओडिसा महिला संघाने बाजी मारली. फुटबॉलमध्ये प. बंगालने आपली ताकद दाखवताना यजमान छत्तीसगढला एकमेव गोलाने नमवले. पारंपरिक तिरंदाजीमध्ये झारखंडच्या तिरंदाजांनी आपले अचूक लक्ष्य साधताना सर्वात जास्त पदके पटकावली. यजमान छत्तीसगढने या पहिल्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करुन भारतीय क्रीड़ाविश्वात एका नव्या अध्यायाची नोंद केली. भारतातील आदिवासी खेळाडूंमधील शक्तीला या स्पर्धेच्या निमित्ताने मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. आदिवासी क्रीडा संस्कृतीला, प्रतिभेला योग्य दिशा, संधी यानिमित्ताने मिळेल. प्रत्येक गावातून, खेड्यातुन‌ उद्याचे चॅम्पियन्स तयार करण्याची ही चळवळ सुरू झाली आहे. या पहिल्या स्पर्धेचे भारताच्या आजी-माजी आदिवासी खेळाडूंनी स्वागत केले आहे. या खेळाडूंमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. त्या गुणवतेला योग्यरित्या आकार देणे आवश्यक आहे. या स्पर्धेतुन भविष्यात भारताला नक्कीच चांगले प्रतिभावान खेळाडू मिळतील अशी आशा करायला हरकत नाही.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

Continue reading

मॅटमुळे रया गेली कबड्डीची! कांदळगावकरांची खंत!!

महाराष्ट राज्य कबड्डी असोसिएशनने नुकताच सन‌ २०२५-२६चा श्रमजीवी स्व. रमेश देवाडीकर कबड्डी कार्यकर्ता हा मानाचा पुरस्कार ६७ वर्षीय दीपक कांदळगावकर यांना देऊन कबड्डी खेळातील एका सच्च्या सेवकाचा उचित गौरव केला आहे. जवळजवळ ‌५ दशके दीपक सरांनी या खेळाची निस्पृहपणे...

यंदाच्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेतही भारताची मदार सिंधुवरच!

येत्या १७ ऑगस्टपासून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु होत असलेल्या ३०व्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारताची मोठी मदार पदकाच्यादृष्टीने माजी जग्गजेती पी. व्ही. सिंधु, माजी कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीत माजी कांस्यपदक विजेती जोडी...

क्रिकेट, कुस्तीसारखे खेळ वगळल्यानंतरही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची बाजी!

ग्लासगो येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरी‌च्या जोरावर भारताने पदकतालिकेत ऑस्टेलिया, इंग्लंड, कॅनडापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. भारताने या स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य,९ कांस्य, अशी एकूण ३९ पदकांची कमाई केली. १३पैकी ८...
Skip to content