राज्यशासनाच्या नगरविकास विभागाच्या पुढाकारातून आणि मुंबई महापालिकेच्या सहकार्याने हस्तांतरणीय विकास हक्क (Transferable Development Rights-TDR) व्यवहारांसंदर्भातील भारतातील पहिले एकात्मिक डिजिटल व्यासपीठ म्हणजेच ई टीडीआर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आज, बुधवारपासून ही प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आली आहे. https://etdr.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ही प्रणाली उपलब्ध असेल. या प्रणालीमध्ये खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी नोंदणी अनिवार्य आहे. या माध्यमातून हस्तांतरणीय विकास हक्क व्यवहार अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि जलद पद्धतीने पूर्ण होणार आहेत. महानगरातील आरक्षित भूखंड, मजला क्षेत्र निर्देशांक (Floor Space Index – FSI) संदर्भातील व्यवहारांमध्ये अधिक सुलभता निर्माण होईल.
या प्रणालीचे प्रायोगिक लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी या प्रणालीच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. शासनाने हस्तांतरणीय विकास हक्क हा महत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रम सुरू करून नागरी विकास प्रक्रियेत मोठा टप्पा गाठला आहे. या ऑनलाईन व्यासपिठामुळे हस्तांतरणीय विकास हक्क व्यवहार अधिक पारदर्शक, जलद आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमासाठी मुंबई महापालिकेने समन्वयक संस्थेची भूमिका बजावली आहे. जेव्हा एखाद्या मालकाची जमीन सार्वजनिक कामासाठी (उदा. रस्ता, उद्यान, प्रकल्प) घेतली जाते, तेव्हा त्याला थेट पैसे न देता त्याच्या बदल्यात बांधकामाचा अतिरिक्त हक्क दिला जातो. हा हक्क ज्या प्रमाणपत्रात दिला जातो, त्याला DRC (डेव्हलपमेंट राईट्स सर्टिफिकेट) म्हणतात. संबंधित मालक हा हस्तांतरणीय विकास हक्क (TDR) इतर विकासकाला विकू शकतो किंवा स्वतःच्या प्रकल्पात वापरू शकतो. नोंदणीकृत खरेदीदार व विक्रेते पोर्टलवर लॉग-इन करून आपल्याकडे असलेले हस्तांतरणीय विकास हक्क विक्रीसाठी उपलब्ध करून देवू शकतात. तसेच खरेदीदारही नोंदणी करून विक्रीसाठी उपलब्घ असलेल्या हस्तांतरणीय विकास हक्काबाबत थेट बोली लावू शकतात. बोली लावूनही व्यवहारात वाटाघाटी होवू शकतात. एखाद्या ‘टीडीआर’बाबत खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात व्यवहार निश्चित झाल्यावर संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पेमेंटद्वारे पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित TDR खरेदीदाराच्या खात्यात जमा केला जाणार असून, विक्रेत्यास त्याची योग्य रक्कम अदा केली जाणार आहे. यासाठी खरेदीदार आणि विक्रेता या दोघांसाठी आधी संबंधित पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
हस्तांतरणीय विकास हक्क (TDR) व्यवहार पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण व्यवहाराचा डिजिटल करार (Contract Note) तयार होणार आहे. हा संबंधित व्यवहाराचा तयार होणारा अधिकृत, संगणकीकृत व्यवहार दस्तऐवज राहणार आहे. हा करार खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात झालेल्या व्यवहाराची संपूर्ण नोंद ठेवणार असून, तो कायदेशीरदृष्ट्यादेखील महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी केवायसी आधारित नोंदणी आणि सुरक्षित बँक एकत्रीकरण सुविधा असेल. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित विश्लेषण आणि व्यवहार माहिती संग्रहीत केली जाणार आहे.

