मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्यावतीने मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक तसेच विविध स्पर्धांत पदक पटकावलेल्या आखाड्याच्या कुस्तीगिरांचा गौरव सोहळा उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला. सर्वांना फेटे बांधून, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यावेळी गौरवण्यात आले. महापौर डिंपल मेहता यांचा सत्कार सुनंदा माने आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांचा सत्कार मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, मिलिंद लिमये यांनी केला. नगरसेवक भगवती शर्मा, सुरेश खंडेलवाल, सचिन डोंगरे, दीपक सावंत, नगरसेविका आकांक्षा वीरकर, किमया रकवी, आभा पाटील यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले.

यावेळी आखाड्याचे विविध स्पर्धांत चमकलेले कुस्तीपटू विशाल जाधव, कोमल पटेल, मनीषा शेलार, गणेश शिंदे, सूरज माने, प्रवेश यादव, अनिकेत यादव, डॉली गुप्ता, आदर्श शिंदे, ओम जाधव, समीर बोबडे, स्नेहा मल्ला, देवेंद्र या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद लिमये यांनी केले. महापौर डिंपल मेहता व उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी आपल्या मनोगतात आखाड्याच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत कुस्तीगिरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या समारंभाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक बलराज बागल यांनी केले.

