Homeब्लॅक अँड व्हाईटकाश्मिर खोऱ्यात उजाडली...

काश्मिर खोऱ्यात उजाडली क्रिकेटची नवी पहाट!

भारतीय क्रिकेटमध्ये बलाढ्य मुंबई, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, हरयाणा, हैद्राबाद, राजस्थान, विर्दभ यांचेच वर्चस्व गेली अनेक वर्षे राहिले आहे. पण २०२५-२६च्या नव्या भारतीय क्रिकेट मोसमात जम्मू-काश्मिर संघाने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या, मानाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत‌ बड्याबड्या संघांना पराभवाचे धक्के देत रुबाबात‌ रणजी करंडकावर आपले नाव कोरले. निर्णायक जेतेपदाच्या लढतीत जम्मू-काश्मिर‌ संघाचा मुकाबला माजी विजेत्या बलवान कर्नाटक संघाशी होता. कर्नाटक संघाला आणखी एक “जोरका धक्का” देत जम्मू-काश्मिर‌ संघाने आपले पहिले ऐतिहासिक जेतेपद मिळवले. अंतिम फेरी गाठूनच या संघाने भारतीय क्रिकेटमध्ये मोठी क्रांती घडवून आणली होती, असे म्हंटले तर वावगे ठरू नये. तब्बल ६६ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर आणि ‌ ३३५ रणजी सामने खेळल्यानंतर जम्मू-काश्मिर संघाने ही दैदिप्यमान कामगिरी केली आहे. १९६० साली जम्मू-काश्मिर‌ संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळला होता. एका जमान्यात हा संघ केवळ सहभागी होण्यासाठी खेळतो, अशी टिका या संघावर केली जायची. परंतु यंदाच्या मोसमात जम्मू-काश्मिर संघाने एकापाठोपाठ एक असे शानदार विजय मिळवून‌ भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजवली.

त्यांच्या मोसमाची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीच्या रणजी सामन्यात त्यांना बलवान मुंबई संघाकडून हार खावी लागली. पण या पराभवातुन त्यांनी बोध घेतला. चुका सुधारल्या, सराव वाढवला आणि त्यानंतर पुढच्या सर्व लढतीत त्यांनी पराभव बघितला नाही. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात माजी रणजी स्पर्धा विजेत्या दिल्ली, राजस्थान, हैद्राबाद, मध्य प्रदेश, प. बंगाल या तगड्या संघाना नमवण्याचा पराक्रम जम्मू-काश्मिर‌ संघाने केला. या सर्व संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर जम्मू-काश्मिर‌ संघाने नमवले, हे आणखी एक विशेष म्हणावे‌ लागेल. यंदा अंतिम फेरीत आपली वाटचाल करताना जम्मू-काश्मिर‌ संघाने प्रस्थापित भारतीय सत्ताकेंद्राना धक्का दिला. संघर्ष, जिद्दीचे, मेहनतीचे त्यांना मिळालेले हे फळ आहे. प्रतिकूल परिस्थिती, पायाभूत सुविधांचा अभाव, लहरी हवामान, कडाक्याची थंडी, सराव करण्यासाठी चांगल्या मैदानाची वानवा या सर्व गोष्टींचा जम्मू-काश्मिर‌ संघाने यशस्वी मुकाबला केला. प्रतिभा कोणत्या सीमांमध्ये कैद करता येत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे जम्मू-काश्मिर‌ संघ आहे.

काश्मिर

२०१५-१६च्या रणजी स्पर्धेत ही स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्या ताकदवान मुंबई संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवण्याचा पराक्रम जम्मू-काश्मिर‌ संघाने केला होता. पण तेव्हा त्या विजयाची फारशी दखल भारतीय क्रिकेटमध्ये घेतली गेली नव्हती. यंदा मात्र जम्मू-काश्मिर‌ संघाच्या शानदार कामगिरीची दखल भारतीय क्रिकेटचाहत्यांना घ्यावी लागत आहे. गतवर्षी जम्मू-काश्मिर‌ संघाला उपांत्यपूर्व फेरीत हार खावी लागली होती. यंदा मात्र तो इतिहास जम्मू-काश्मिर‌ संघाने लगेचच पुसून टाकला आणि अंतिम फेरी गाठली. कप्तान पारस डोगरा, तेज गोलंदाज नबी, मध्यमगती गोलंदाज सुनील कुमार, डावखुरा फटकेबाज फलंदाज समद, चिवट फलंदाजी करणारा शुभम खजुरीया या पाच जणांचा जम्मू-काश्मिर‌ संघाच्या विजयात मोठा वाटा आहे. यांनी आपल्या संघाची जबाबदारी खांद्यांवर घेतली. नबी, सुनील कुमारने अत्यंत शिस्तबद्ध मारा करुन प्रतिस्पर्धी संघातील‌ फलंदाजांना चांगले जेरीस‌ आणले. डोगराने वयाची चाळीशी पार केली आहे. गतवर्षी तो निवृत्ती घेणार होता. पण आणखी एक वर्ष खेळण्याची विनंती जम्मू-काश्मिर‌ क्रिकेट संघटनेने डोगराला केली. त्या विनंतीचा मान राखून डोगराने आपली निवृत्ती लांबवली. त्याचा मोठा फायदा जम्मू-काश्मिर‌ संघाला झाला.

काश्मिर

त्याने खेळाडूंमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला. त्यांची मानसिकता बदली. आपण चांगला खेळ केला तर जिंकू शकतो हे खेळाडूंमध्ये बिंबवले. त्याने संघाचे कुशल नेतृत्त्व केले. कठिण समयी तो संघाच्या मदतीला नेहमी धावून आला. यंदा डोगराने ९ सामन्यात ५५१ धावा काढल्या. डोगराने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत‌ आपल्या कारकिर्दीतील दहा हजार धावांचा टप्पादेखील यंदा पार ‌ केला. या स्पर्धेत दहा हजार धावा करणारा तो केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी फक्त वासिम जाफर याने रणजी स्पर्धेत दहा हजार धावा केल्या आहेत. “जम्मू एक्स्प्रेस” या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या नबीने गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली. त्याने यंदा या स्पर्धेत ९ सामन्यांत सर्वाधिक बळी घेतले. त्याने गतवर्षीदेखील या स्पर्धेत बळींचे अर्धशतक गाठले होते. उपांत्यपूर्व फेरीत प. बंगालविरुद्धच्या सामन्यात नबीने १२ बळी घेऊन त्यांच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते. यंदा होणाऱ्या आयपीएलमध्ये दिल्ली संघाने नबीला तब्बल ८ कोटी ४० लाख रुपये देऊन आपल्या संघात सामील करून घेतलेय. सुनील कुमारने ८ सामन्यात २८ बळी घेऊन नबीला चांगली साथ दिली. समदने मधली फळी संभाळताना ९ सामन्यात ६५५ धावा फटकावल्या. बंगालविरुद्धच्या लढतीत त्याच्या ८२ आणि नाबाद २७ धावांच्या खेळी महत्त्वपुर्ण ठरल्या.

दिल्ली रणजी संघाचे माजी कर्णधार आणि पहिल्या दर्जाच्या सामन्यात बरीच वर्षे खेळलेल्या ६१ वर्षीय अजय शर्मा यांनी जम्मू-काश्मिर‌ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेतली आणि त्यांनी जम्मू-काश्मिर‌ संघाचा‌ कायापालट केला. सुरूवातीला ३८ खेळाडू शर्मा यांच्याकडे देण्यात आले. यातूनच संघबांधणीचे मोठे काम शर्मा यांनी केले. सहाय्यक प्रशिक्षक पी. कृष्णकुमार आणि दिशान याज्ञिक यांचीदेखील मोठी मदत शर्मा यांना मिळाली. त्याअगोदर भारताचा माजी डावखुरा तेज गोलंदाज इरफान पठाणची मदतदेखील जम्मू-काश्मिर‌ क्रिकेट संघटनेने घेतली होती. शर्मा यांनी भारतात होणाऱ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेत‌ जम्मू-काश्मिर‌ संघाला जास्तीतजास्त संधी दिली. जम्मू-काश्मिर‌मध्ये चांगल्या खेळपट्ट्या तयार करुन‌ घेतल्या. खेळाडूंकडून जोरदार सराव करुन घेतला. खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला. खेळाडूंना पूर्ण स्वातंत्र्य दिले. त्यांच्या शैलीत बदल केला नाही. शर्मा यांच्या मोठ्या अनुभवाचा फायदा जम्मू-काश्मिर‌ संघाला झाला. आता बीसीसीआय‌ आणि जम्मू-काश्मिर‌ सरकारचे‌ भक्कम पाठबळ संघाला मिळाले तर भविष्यात भारतीय क्रिकेट संघाला चांगले युवा क्रिकेटपटू काश्मिर‌ खोऱ्यातूनदेखील मिळतील यात शंका नाही. नबी, समद यांनी आता होणाऱ्या आयपीएल स्पर्धेतदेखील हाच फॉर्म कायम राखला तर भारतीय संघाचे दार नक्कीच त्यांचासाठी उघडू शकते.

(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

गाईल्स ढाल आंतरशालेय क्रिकेटमध्ये ‘ज्ञानदिप’ उजळला!

नवी मुंबई येथील करावे गावातील ज्ञानदिप‌ सेवा मंडळ शाळेने मुबईच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत‌ प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या १४ वर्षांखालील गाईल्स ढाल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत‌ पहिल्यांदाच जेतेपद पटकावून नवी मुंब‌ईच्या आंतरशालेय क्रिकेटमध्ये नवा अध्याय रचला. ही मानाची स्पर्धा जिंकणारी ज्ञानदिप‌ सेवा...

वैभव सुर्यवंशीच्या स्फोटक खेळाने आठवला कपिल देव!

हरारे येथे झालेल्या १९ वर्षांखालील युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत‌ आयुष म्हात्रेच्या भारतीय संघाने इंग्लंड‌चा १०० धावांनी पराभव करून जेतेपदाचा शानदार षटकार ठोकला. उभय संघात २०२२मध्येदेखील अंतिम फेरीत लढत झाली होती. त्यावेळीदेखील भारतीय युवा संघच सरस ठरला होता. त्याच विजयाची...

लँडो‌ नॉरिस, कार शर्यतीतल्या वेगाचा नवा बादशहा!

विश्वातील कार रेसिंगच्या प्रतिष्ठेच्या फॉम्युला-वन शर्यतीत चालकांचे जग्गजेतेपद ब्रिटनच्या अवघ्या २६ वर्षीय मॅकलारेन संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लँडो नॉरिसने पटकावून‌ "वेगाचा नवा बादशहा" अशी बिदुरावलीदेखील मिळवली आहे. या शर्यतीच्या गेल्या ७५ वर्षांच्या इतिहासात चालकाचे अजिंक्यपद मिळवणारा तो ३५वा चालक ठरला...
Skip to content