Homeब्लॅक अँड व्हाईटगावातल्या मातीतला ओलावा...

गावातल्या मातीतला ओलावा आजही कायम!

शेती परवडत नाही, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा.. वगैरे चर्चा शहरी लोक ऐकत असतात. ऐकून सोडून देतात. गावात बांधावर प्रत्यक्ष जाऊन बघण्याची उत्सुकता असली तरी योग येईल असे नाही. मुद्दाम आणावा लागतो. प्रत्यक्ष शेतात गेल्यानंतर निरीक्षण करता येते आणि विचारांना चालना मिळते. गेल्या आठवड्यात अक्कलकोट येथे जाताना हमरस्त्यावर शेटफळ गावी थांबलो होतो. तिथे सतीश शेंडे, हे माझ्या मित्राचे मित्र आले होते. दिलखुलास गप्पा मारणारा रांगडा माणूस. पण संवेदनशील. चौकात आम्ही थांबलो. शेंडे आल्यानंतर तिथे उसाचा ताजा रस घेतला. शुगर वाढेल वगैरे भीती शहरी भागात असतेच. रस काढताना त्यात एक संत्रे टाकायला सांगितले. नाहीतरी साल फुकट जाणार होते. त्या सालातील कडवटपणा अलगद रसात उतरला. एक वेगळी चव आली. मग शेंडे त्यांच्या मोटारसायकलवर पुढे आणि आम्ही आमच्या मोटारीतून त्यांच्यामागे…

शेंडे साठी पार केलेले. अभियंता म्हणून रिटायर झालेले. बरीच कामे केलेली. शिवाय नवा व्यवसाय करीत असल्याने ओळखी भरपूर. जिल्हा परिषद निवडणुकीची हवा होती. गावातील प्रमुख लोकांना या काळात मागणी असते. आशीर्वाद मिळतात म्हणून. निकाल वेगवेगळे लागतात. विस्तीर्ण शेतीच्या परिसरात आम्ही आलो होतो. ज्वारी, मका, गहू वगैरे लागवड रस्त्याच्या दोनही बाजूला दिसत होती. आणखी काही आठवड्यात कापणी असावी बहुधा. भरपूर शेती दिसत असली तरी माणसांचा वावर तसा कमी दिसत होता. दुपारच्या वेळी एक दिंडी वाजतगाजत निघाली होती. एक माणूस मोटारसायकल चालवत होता आणि बाकीचे चालत होते. भगिनीदेखील होत्या. या पायपीट करणाऱ्या मंडळींच्या तब्येतीच्या तक्रारी तुलनेने कमी असतात.
आम्ही शेतावर आलो. शेंडे यांचा मुलगा आणि मुलगी शिक्षण घेण्यासाठी शहरात आलेले आहेत. पत्नीदेखील जाऊनयेऊन. हे एक प्रातिनिधिक उदाहरण. अनेक कुटुंबातील तरुण आणि तरुणी शिक्षण किंवा विवाहाच्या निमित्ताने गावे सोडून शहराकडे जाणे पसंत करीत आहेत.

गावात

आम्ही मळ्यात आलो. हुरडा तयार करण्यासाठी दोन गावकरी आले होते. गावात एकमेकांच्या मदतीला जाण्याची प्रथा आहेच. मीही मूळचा शेतकरी कुटुंबातील. पण सहा दशकांपूर्वी पुण्यात आलेलो. कोकणातील शेती एकत्रित कुटुंबाची. आता भाताची खाचरे करायलादेखील होत नाही. तिथे राहिलेले लोक थोडीफार करतात. पण मी शेतकरी फक्त नावाला. शेतात हुरडा भाजण्यासाठी दोघांनी झटपट खड्डा केला. ज्वालाग्राही वस्तू टाकल्या आणि आग लावून दिली. मक्याची कणसे छान भाजून काढली. नंतर ज्वारीची भाजली आणि हातावर कुस्करुन समोर आली. मराठमोळी ज्वारीची भाकरी, पिठले, बटाट्याची भाजी आणि शेंगदाणा चटणी. गरज म्हणून बाटलीबंद पाणी होते. दातांना झेपला तेवढा हुरडा खाल्ला. पण खरी मजा कच्चा हुरडा खाण्यात असते. मोकळ्या मैदानात वाऱ्याची मस्त झुळूक येत होते. हुरड्यासाठी पेटवलेल्या आगीच्या झळा बसणार नाहीत इतपत दूर बसलो होतो. धूर थोडा जाणवत होता. दोघे शेतकरी मित्र परिसरात काम करीत होते. हा परिसर बराचसा सपाट आहे. पाण्यासाठी विहिरी आहेत. ऊस असल्यामुळे हमखास विक्री आहे. तरीही शेतकऱ्यांचे गणित पद्धतशीर सुटते असे नाही. पण घसघशीत शेती असलेले शेतकरी श्रीमंत आहेत असे म्हणता येईल.

शेंडे यांच्या शेतीत दगडी बांधकाम असलेले घर बघितले. पण सध्या कोणी राहत नाही. एक शेतकरी जोडपे होते. पण दोघांपैकी एक गेल्यामुळे दुसऱ्याला इथे राहणे अवघड झाले. परिणाम असा झाला की घर हळूहळू ढासळू लागले. एकटेदुकटे शेतात राहणे सोपे नाही. शेंडे जाऊनयेऊन. तरीही इथे शेती होते. शेंडे यांचे अन्य व्यवसाय असल्यामुळे जमते. पण फक्त शेतीवर अवलंबून राहणे आणि अर्थकारण नीट राखणे ही मोठी कसरत. भविष्यात शेतीचे काय होणार वगैरे चर्चा आम्ही शहरी मध्यमवर्गीय करतो. पण वास्तव जाणून घ्यावे असे वाटले तरी वाटून काय करणार? तरीही सकारात्मक गोष्ट म्हणून मी बोलताना म्हणालो की, भविष्यात लोकांना खेड्यात येण्याशिवाय पर्याय राहणार नाही. पुढच्या पिढ्या खाणार काय? विदेशातून आयात करणार की काय? आणि त्यांनी पुरवठा बंद केला तर… पिकते तिथे विकत नाही म्हणतात. आम्ही शेतातून फेरफटका मारला तेव्हा आधी दिसले ते बदामाचे झाड. वर हिरवे जर्दाळू दिसत होते. पण पिकलेले किंवा लाल झालेले दिसत नसल्यामुळे काढण्याचा विषय आला नाही. पण खाली जमिनीवर प्रचंड सडा पडलेला होता. एकच झाड आणि तेही असेच लावलेले असल्यामुळे त्याकडे व्यवसाय म्हणून बघणे होत नाही. बोरे, चिक्कू, याचेही एकेक झाड. चिक्कू चांगले मोठे झालेले. पण पिकलेले नाहीत त्यामुळे खाणे शक्य नाही. बोरेदेखील पिकून गेलेली. पण एकदोन तोंडात टाकणे एवढाच कार्यक्रम. आम्ही म्हातारे, पण तरुणदेखील नकोनको म्हणणारे.

गावात

घर जुने होत पडायला लागलेले. जनावरे सांभाळायला माणसे नाहीत म्हणून अशीच कोणाला तरी दिलेली. त्यामुळे गोठा ओकाबोका. पण बाकी पिकांच्या खुणा होत्या. आणि आपले वय विसरुन शेतीत राबण्याची उमेद मात्र दिसली. यशस्वी शेती करणारी माणसे मला माहिती आहेत. मुख्य म्हणजे सतत जागरुक राहवे लागते आणि दुसरे म्हणजे मनापासून आवड लागते. काय शेती करायची हे शेतकऱ्यांना चांगले समजते, हे खरे असले तरी शेती शास्त्रीय किंवा व्यावसायिक पद्धतीने करण्याचे प्रमाण बरेच कमी आहे. शेतीच्या प्रश्नावर फार मोठे लिखाण करण्यास मी त्यातील अभ्यासक नक्कीच नाही, पण अनुभवी लोक सांगतात, त्यानुसार सरकारी योजनांचा फायदा घेऊन आणि बाजारपेठेचा अभ्यास करुन शेतीत लक्ष घातले तर खूप नफा झाला नाही तरी तोटाच तोटा असे काही होत नाही. शेतकऱ्यांना नेमके काय आणि किती मिळते हा माझा अभ्यासाचा आणि सामाजिक चर्चेचा विषय. म्हणजे मी वीस रुपयांची मेथीची घसघशीत जुडी घेतो त्यात शेतकऱ्याला नेमके किती मिळाले हा माझ्या अभ्यासाचा विषय. शेतीचे अर्थशास्त्र शेतकरी मांडत असावेत का हा विषयदेखील महत्त्वाचा.

कोकणात जिथे आंबा, सुपारी, फणस वगैरे पिके येतात तिथे काटेकोर हिशोब ठेवणारे लोक आहेत. पण अंतिम उत्पादन ज्याच्या हाती विक्रीसाठी जाते तो खरी आणि मोठी कमाई करतो. जमिनींचे तुकडे होत असल्यामुळे जमीनधारणा कमी होत आहे. जमीन प्रकल्पात विकली गेली की भरपाईचे विभाजन होते. जमीन हातची जाते आणि पैसे एकाचवेळी येतात. ते कितीही आले तरी त्याचा नियोजनबद्ध वापर होईल असे नाही. याच सोलापूर जिल्ह्यात एका कुटुंबाला मोक्याची जमीन सरकारने घेतल्यामुळे कोट्यवधी रुपये मिळाले होते. आता आपण श्रीमंत झालो या भ्रमात असलेल्या कुटुंबाने मोठा बंगला बांधला. त्या बंगल्याला साजेशा मोटारी, वस्त्रे, घड्याळे असे सगळे झाले आणि पुढे अंदाजपत्रक कोलमडले. आज शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्या शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रांत जात आहेत. नासामध्येसुद्धा शेतकऱ्यांची मुले दाखल झाली आहेत. ज्यांनी शेती टिकवून धरली त्यांना सधन होण्याची संधी मिळाली आहे. एकदम आलेली श्रीमंती कदाचित माणसाला शोषून घेऊ शकते, पण मेहनतीने आलेली सुबत्ता मात्र दीर्घकाळ टिकून राहते.

एक सकारात्मक बाजू अशी की, नवी पिढी आता तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करु लागलेली आहे. माहितीचे भांडार खुले झाले आहे. व्यावसायिक पद्धतीने शेती कशी करावी यासाठी प्रशिक्षण मिळत आहे. सरकारच्या उत्तम योजना आहेत. शेतकऱ्यांच्या बळावर राजकारण करुन खासदार वगैरे झालेल्या शेतकऱ्यांकडे फायदा कसा मिळवायचा याची गणिते आहेत. पण आपला छोटासा उसाचा मळा आपण मनापासून पिकवला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या उत्पादनाचे योग्य नियोजन केले तर भविष्यात शेतीला मोठी बरकत येणार आहे हे वेगळे सांगायला नको.
महाराष्ट्राचे मोठे शहरीकरण झाले असले तरी ग्रामीण भागातील ओलावा कमी झालेला नाही. एकमेकांच्या शेतीकडे लक्ष ठेवून रक्षण करण्याचे काम आपोआपच होत असते. चोरीमारी होत नाही असे नाही, पण तो आयुष्याचा एक भाग असतो हे लक्षात घ्यायला हवे. गावातील मंदिरे ही एकत्र येण्याची ठिकाणे असतात. गावात धार्मिक कार्यक्रम होतात. गावात येणाऱ्या पालखीबरोबर आलेल्यांना गावात पोटभर भोजन आणि मैत्रीचा ओलावा अनुभवायला मिळतो. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यात मंदिरे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. गावच्या प्रगतीत मंदिरांची मोठी भूमिका असते. आम्ही ज्या शेंडे यांच्याकडे गेलो होतो त्यांच्याकडे नुकतेच वारकरी येऊन गेले होते. अतिथी देवो भव हा मंत्र खेड्यापाड्यात अजून आहे.
आम्ही नंतर अक्कलकोट येथे गेलो. तिथे मंदिराच्या परिसरात निवासाची उत्तम व्यवस्था, रात्री प्रसादाचे भोजन मोफत, सकाळी चहा आणि नाष्टा मोफत. सोलापूर जिल्ह्यात मंदिरांची मांदियाळी आहे. हजारो भाविक नित्यनेमाने येतात. यामुळे व्यापार, व्यवसाय यांना चालना मिळते. अशा परिसरात शेतीसाठी उत्तम असे वातावरण आहे. नव्या पिढ्या नव्या दमाने येतील आणि परिसर सतत सुजलाम सुफलाम राहील या खात्रीने आम्ही पुण्याला परत आलो.

(लेखक मनोहर सप्रे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

नेपाळी उतरवणार आंबे आणि आम्ही पारावर मारणार ‘होर्मूझ’च्या गप्पा!

वर्तमानपत्र वाचण्याची सवय असेल तर एखाद्या वेगळ्या बातमीकडे लक्ष जाते आणि विचारांना वेगळी दिशा मिळते. भारतात शहरीकरण मोठ्या वेगात सुरु आहे, पण तरीही ग्रामीण भागाचे महत्त्व कायम आहे. निवडणुकीच्या संदर्भातील बातमी वाचत असताना भारतीय समाजरचना कशी आहे हे लक्षात...

राजकारणात राबवले जातेय ‘अनुकंपा’ धोरण, तेही ‘बिनविरोध’!

पुण्यात २००९मध्ये मनसेच्या तिकिटावर रमेश वांजळे खडकवासला मतदारसंघात आमदार झाले होते. स्वतः वांजळे वारकरी पंथातले. मनमोकळ्या स्वभावाचे. दाक्षिणात्य चित्रपटातील एका नामवंत कलाकारासारखे व्यक्तिमत्त्व होते. राज ठाकरे यांचा त्या निवडणुकीत बोलबाला होता. त्यांच्या एका सभेने आणि वांजळे यांच्या लोकप्रियतेमुळे खडकवासला...

पालीतला तो एसटी बसस्टँड आणि फाजील अपेक्षा!

एसटी प्रवास हा माझ्या आवडीचा विषय. विशेषतः लाल परी अधिक चांगली. दाणकन आपटल्याशिवाय दरवाजा लागत नाही. अचानक दरवाजा उघडण्याची भीतीदेखील कमी असते. आता लाल परीच्या जागी आरामदायी बस आल्या आहेत. हा एक बदल आहेच. मला मोटारीने प्रवास करणे आवडत...
Skip to content