प्रजासत्ताकदिनाच्या परेडनंतर राजधानी दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर पार पडलेल्या एनसीसी रॅलीत महाराष्ट्राची कन्या तनु भान हिने आपल्या अद्वितीय कर्तृत्त्वाचा झेंडा फडकवला आहे. महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनुने आर्मी विंगमधून (सीनियर विंग) देशात ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’ हा सर्वोच्च बहुमान प्राप्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका दिमाखदार सोहळ्यात तनु भानला सुवर्णपदक आणि मानाची ‘केन’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि एनसीसीचे महासंचालक ले. जनरल वीरेंद्र वत्स उपस्थित होते. देशातल्या १७ संचालनालयांमधल्या २० लाख कॅडेट्सच्या स्पर्धेत, तनुने आपल्या अद्वितीय शिस्तीच्या आणि अष्टपैलू कौशल्याच्या जोरावर हे ऐतिहासिक यश खेचून आणले. ‘राष्ट्र प्रथम – कर्तव्यनिष्ठ युवा’ या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, तिने प्रशिक्षणातले सर्व कठीण टप्पे यशस्वीपणे पार करत देशात पहिला क्रमांक पटकावला.
याप्रसंगी कॅडेट्सना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांच्या राष्ट्रभक्तीचा गौरव केला. समोर असलेले तरुण केवळ गणवेशातील कॅडेट्स नसून, ते ‘विकसित भारत’चे निर्माते आहेत. तुमचे परिश्रम, त्याग आणि अनुशासनच देशाला प्रगतीपथावर नेणारे मुख्य आधारस्तंभ आहेत. ही वचनबद्धता देशाला उज्ज्वल भविष्याकडे नेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

