भारतीय हॉकीने आपले शतक दिमाखात साजरे केले आहे. १९२४ साली आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाची स्थापना झाली आणि अवघ्या एका वर्षात इंडियन हॉकी फेडरेशनची स्थापना ग्वाल्हेर येथे केली गेली. ७ नोव्हेंबर १९२५ साली इंडियन हॉकी फेडरेशनची स्थापना करण्यात आली. विश्वात सर्वात जुना खेळ म्हणून हॉकी ओळखला जातो. त्याची सुरूवात स्कॉटलंडमध्ये १६व्या शतकात झाली. त्यानंतर १९व्या शतकात ब्रिटनमध्ये या खेळाची सुरूवात झाली. तेथील शाळांमध्ये या खेळाला चांगला प्रतिसाद मिळाला. ब्रिटीश आर्मीत असलेले सैनिक या खेळाचा आनंद मोठ्या प्रमाणावर घेऊ लागले. त्यामुळे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेल्या देशांतदेखील हॉकी खेळाने हळुहळू चांगले बाळसे धरले. मोठे मैदान आणि या खेळासाठी फार कमी साधने लागत असल्याने भारतातदेखील हा खेळ लोकप्रिय झाला. १८५५ साली कोलकाता येथे हॉकीचा पहिला क्लब सुरु करण्यात आला. भारतात या खेळाचा श्रीगणेशा प. बंगालमध्ये झाला. पुढे मग हळुहळू हा खेळ भारताच्या इतर राज्यांत जोर धरु लागला.

१९२६ साली भारतीय हॉकी संघाने पहिला विदेश दौरा न्युझीलंडचा केला. या दौऱ्यात भारताने २१पैकी १८ सामन्यांत सहज विजय मिळवला. याच दौऱ्यात भारतीय हॉकीचे जादुगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ध्यानचंद यांचा उदय झाला. त्यांनीच या दौऱ्यात भारतातर्फे सर्वाधिक गोल केले. प्रारंभीच्या काळात, सुरूवातीची तीन-चार दशके भारताने या खेळावर एखाद्या सम्राटाप्रमाणे राज्य केले. भारत आणि विजेतेपद असेच समीकरण होऊन गेले होते. १९२८ ते १९५६दरम्यान भारतीय हॉकी संघाने ऑलिंपिकमध्ये सलग ६ सुवर्णपदके जिंकून दुहेरी हॅटट्रिक साधत आगळा विश्वविक्रम करुन ठेवला जो आजतागायत कायम आहे. या विजयात मेजर ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा होता. आपल्या जादुई खेळाची भारतीय हॉकी खेळाडूंनी साऱ्या विश्वाला मोहिनी घातली होती. १९२८च्या अँमस्टरडॅम येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताने पहिल्यांदा भाग घेतला. भारताने आपल्या पहिल्याच स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. ध्यानचंद यांनी सर्वाधिक १४ गोल या स्पर्धेत केले. पुढील ५ ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपली विजयी दौड कायम राखली.

१९३६ साली जर्मनीत बर्लिन येथे ऑलिंपिक सामने झाले. हॉकीत भारत, जर्मनी अंतिम लढत झाली. त्यावेळी हुकूमशहा हिटलर या सामन्याला उपस्थित होता. कर्णधार ध्यानचंद यांच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने जर्मनीवर सहज विजय मिळवला. त्यामुळे हिटलरची स्वारी नाराज झाली. ध्यानचंद यांच्या खेळावर हिटलर कमालीचा खूष झाला. त्यांनी सामन्यानंतर ध्यानचंद यांच्याशी संवाद साधला. त्यांना जर्मनीच्या सैन्यात मोठ्या हुद्द्यावर आणि मोठ्या पगारावर नोकरीची ऑफर दिली. पण ध्यानचंद यांनी विनम्रपणे ती ऑफर नाकारली. ध्यानचंद यांची चेंडूवर एवढी हुकूमत असायची की अनेकांना तेव्हा वाटायचे की ते हॉकी स्टिकला भरपूर गमवैगेरे लावायचे की काय? प्रतिस्पर्धी संघातील तर अनेक खेळाडू ध्यानचंद यांची स्टिक सारखी तपासायचे. यावरुन ध्यानचंद यांच्या जादुई खेळाची कल्पना येऊ शकते. तेव्हा हॉकी विश्वाने त्यांना या खेळाची जादुगार ही उपाधी उगीचच दिली नव्हती, यात शंभर टक्के तथ्य आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सलग तीन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देण्यात बलबीर सिंग सिनियर यांचा मोठा वाटा होता. ध्यानचंद यांचा वारसा बलबीर सिंग सिनीयर यांनी थोडाफार चालवला. १९४८, ५२, ५६च्या तीन ऑलिंपिक स्पर्धेत भारत सुवर्णाचा मानकरी होता. १९५२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत हाॅलंडविरुध्दच्या अंतिम सामन्यात बलबीर सिंग सिनीयर यांनी तब्बल ५ गोल केले. तो विक्रम आजदेखील कायम आहे. अखेर भारताचा हा विजयी रथ १९६०च्या रोम ऑलिंपिकमध्ये पाकिस्तानने रोखला. ऑलिंपिक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा भारताला निर्णायक सामन्यात हार खावी लागली. १९७०, ८०च्या दशकात आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने या खेळाच्या नियमात बरेच बदल केले, ज्याचा मोठा फटका भारताला बसला आणि भारतीय हॉकीची पडझड सुरु झाली. नवे नियम युरोपियन देशांना जास्त फायदा कसा होईल याकडे लक्ष देऊन तयार केले गेले. त्याचा मोठा फटका आशियाई, आफ्रिकी खंडातील देशांनादेखील बसला. मैदानाची जागा अॅस्ट्रॉटर्फने घेतली. तंत्रात बदल झाला. कलात्मक हॉकीला आधुनिक वेगाची, फिटनेसची आणि ताकदीची जोड युरोपियन देशांनी दिली. त्यामुळे भारतीय हॉकीची पिछेहाट सुरु झाली.

या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी मग हॉकी इंडिया, साईने नवीन योजना राबवण्यास सुरूवात केली. वैज्ञानिक प्रशिक्षण पद्धती, खेळाडू विकास कार्यक्रम, ज्युनियर खेळाडूंवर भर, कृत्रिम अॅस्टोटर्फची जास्तीतजास्त उपलब्धता, हॉकी इंडिया लिग, भक्कम आर्थिक पाठबळ यामुळे हळुहळू भारतीय हॉकीची घसरलेली गाडी रुळावर यायला लागली. गेल्या दोन ऑलिंपिक स्पर्धेत पुरुष संघाने कांस्यपदक पटकावले तर महिलांचे थोडक्यात हुकले. १९८० साली माॅस्को ऑलिंपिकमध्ये भारताने शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर तब्बल ३९ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर भारतीय पुरुष संघाने परत एकदा पदकाला गवसणी घातली. ऑलिंपिकमध्ये भारताने एकूण १३ पदके जिंकून विक्रम केला. त्यात ८ सुवर्णपदकांचा समावेश आहे. १९७५ साली भारताने विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदा जिंकला. त्यानंतर त्याची पुनरावृत्ती करण्यास भारतीय हॉकी संघाला अद्याप यश आले नाही. आशिया, राष्ट्रकुल, अझलन शहा चषक, एशियाडमध्ये भारताने सुवर्णपदकावर कब्जा केला. पण हॉकी विश्वातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदाने मात्र भारताला अद्याप हुलकावणी दिली आहे.

भारताने विश्वचषक हॉकी स्पर्धेपासून ते इतर लहानसहान हॉकी स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. बेटन चषक हॉकी स्पर्धा, आगाखान सुवर्ण चषक हॉकी स्पर्धा, ओबेदुल्ला सुवर्ण चषक हॉकी स्पर्धा, मुरगप्पा सुवर्ण चषक हॉकी स्पर्धा, मुंबई सुवर्ण चषक हॉकी स्पर्धा, गुरु तेगबहादुर हॉकी स्पर्धा, नेहरु चषक हॉकी स्पर्धा, मोहम्मद शहीद हॉकी स्पर्धा, परत राजा सर्वेश्वर दास चषक हॉकी स्पर्धा, एस. एन. वोहरा चषक हॉकी स्पर्धा या भारतातील काही जुन्या आणि प्रतिष्ठेच्या हॉकी स्पर्धा ओळखल्या जातात. १८९५ सालापासून अखिल भारतीय बेटन चषक हॉकी स्पर्धा नियमित सुरु आहे. हाॅकी विश्वातील एक जुनी स्पर्धा म्हणुन ती ओळखली जाते. १९०५मध्ये प. बंगालमध्ये पहिला हाॅकीचा सामना खेळला गेला. क्रिकेटमधील आयपीएलच्या धर्तीवर हॉकी इंडिया लिग सुरु केली गेली. त्यात प्रत्येकी ८-८ पुरुष, महिला संघांना प्रवेश देण्यात येतो. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मेजर ध्यानचंद, के. डी. सिंग बाबू, शंकर लक्ष्मण, बलबीर सिंग ज्युनियर, बलबीर सिंग सिनियर, अशोक कुमार, मुकेश कुमार, धनराज पिल्ले, मोहम्मद शहिद, गुरबक्श सिंग, लेसली क्लालिडियस, उधम सिंग, किशन लाल, रुप सिंग, सुरेंद्र कुमार, सूरजीत सिंग, अजित पाल सिंग, फिलिप्स, डुंगडुंग, हरचरण सिंग, हरेंद्र सिंग, बी. पी. सिंग, अस्लम शेरखान, जफर इक्बाल, बी. पी. गोविंदा, विनित कुमार, रोमियो जेम्स, असुंता लाक्रा, तिर्की, महाराजा कौशिक, बिरेंद्र लाक्रा, विवेक प्रसाद, जुगराज सिंग, एम. पी. सिंग, मर्विन फनाडिंस, गिल्बर्ट लोबो, एम.सौमय्या, पी. श्रीजेश, मनप्रीत सिंग, विवेक प्रसाद,अमित रोहिदास, के. भास्करन यांच्यासारखे एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू भारताने हॉकी विश्वाला दिले. भविष्यात यामध्ये आणखी नव्या खेळाडूंची भर नक्की पडेल ह्यात शंका नाही. प्रतिष्ठेची चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धा भारतीय संघ जिंकेल अशी आशा करुया.

