Homeडेली पल्सनर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत...

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत करिअरची संधी

महाराष्ट्र आणि जर्मनीतल्या बाडेन-वुटेमबर्ग, या राज्यांदरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी संयुक्त करार झाला असून यामुळे महाराष्ट्रातल्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नुकतीच दिली. माधुरी मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात याबाबतच्या संयुक्त जाहीरनाम्यावर सह्या केल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात, यांच्यासह अर्चना बडे, धीरेंद्र रामटेके, तसेच बाडेन-वुटेमबर्ग राज्य येथील सामाजिक व्यवहार, आरोग्य आणि एकात्मता मंत्रालयाचे उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या करारानुसार भाषा प्रशिक्षण, प्रगत कौशल्य विकास, प्रमाणपत्र मान्यतेची प्रक्रिया सुलभ करणे तसेच जर्मनीत नोकरी स्वीकारणाऱ्या नर्सेसच्या सन्मान व संरक्षणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळाची निर्मिती हा या कराराचा केंद्रबिंदू असणार आहे. दोन्ही राज्यांतील नर्सिंग शिक्षण संस्था, विद्यापीठे व प्रशिक्षण केंद्रांदरम्यान विद्यार्थी–प्राध्यापक आदानप्रदान, संयुक्त प्रशिक्षण, अभ्यासदौरे आणि संशोधन उपक्रम राबवून शिक्षणाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा यामागचा हेतू आहे, असे मिसाळ यांनी सांगितले.

मॅनफ्रेड लुखा म्हणाले की, दोन्ही राज्यादरम्यान नर्सिंग व आरोग्यसेवा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. कौशल्यावर आधारित आरोग्यसेवेचा विस्तार करणे, संशोधनाला चालना देणे तसेच परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. या सहकार्यामुळे तरुणांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ अधिक प्रशिक्षित व सक्षम होईल.

बाडेन-वुटेमबर्ग राज्याच्या प्रतिनिधी मंडळाने ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात महाराष्ट्राचा दौरा केला होता. नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य वाढवणे, प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे व कौशल्य विकासासाठी नवीन मार्ग उभारणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश होता.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content