सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित ‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’, या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले.
या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा आढावा घेण्यात आला आहे. संजीवनी खेर यांनी पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित केले तर विजय कुवळेकर यांनी पुस्तकाचे सखोल विश्लेषण केले. जागतिक साहित्यातील अभिजात साहित्याच्या शाश्वत वारशावर भर देत, त्यांच्या लेखकांच्या अनुभवांच्या समृद्धतेने या कलाकृतींना मोठ्या उंचीवर नेले आहे असे त्यांनी सांगितले. पूर्वी समाजात परिवर्तनाचे मोलाचे कार्य साहित्यकृतींनी केले आहे. त्यामुळे या साहित्यकृती आपण या पुस्तकातून समजून घेतल्या पाहिजेत, असे विचार दिनकर गांगल यांनी व्यक्त केले. अजरामर आणि अभिजात साहित्यिककृती उपयुक्त असून तिच्यातील समाजबदलाचे संदर्भ आजही आपल्याला अभ्यासता येतात. त्यामुळे अशा साहित्यकृतींना एकत्रित ठेवण्याची किमया साध्य करणारे हे पुस्तक निश्चितच पुढच्या पिढीसाठीही महत्त्वाचे आहे, असे कुमार केतकर म्हणाले.
वाचनाचा छंद आणि साहित्याची आवड यातून जगभरातील पुस्तकांच्या संपर्कात आलो. वाचन वाढत गेले आणि त्यातूनच मग जगभरातील मान्यवरांच्या पुस्तकांचा आढावा घेणारा हा ग्रंथ निर्माण करता आला, असे विचार लेखक राजीव श्रीखंडे यांनी मांडले. सुदेश हिंगलासपूरकर यांनी प्रास्ताविकात ग्रंथालीविषयी आणि सध्याच्या उपक्रमांविषयीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरुंधती भालेराव यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवर साहित्यिक रसिकांची एक सुरेख मैफल जमली होती.

