Homeमाय व्हॉईसविधान भवनातल्या 'ध्यान...

विधान भवनातल्या ‘ध्यान रंगी’..ने आमदारांचा ‘बेरंग’?

ध्यान रंगी रंगले रे!

आपुले रे हाती आपुले प्राक्तन|

घडवू तैसे ध्यान घडतसे!!

मनोहारी सोहळा!!

आमदार मंडळी हो, रागावू नका. मोहाच्या मागे धावू नका. ही जी ध्यानधारणा आपण करणार आहात ती अतिशय उच्च कोटीची विश्रांत्रीच असते असे आपले यमुना फेम (नदी) श्री श्री रविशंकर नेहमीच बेंगळुरू आणि दिल्ली मुक्कामी सांगत असतात. त्यांनी जेव्हापासून  ध्यानधारणा ही उच्च कोटीची विश्रांती असते असे निरूपण केले, तेव्हापासून सर्वच राजकीय नेत्यांनी निरूपण असते त्या जागेपासून कोसो दूर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.

अहो, उच्च कोटीची विश्रांती म्हणजे आपणच आपल्याला संपवण्यासारखे नाही का? आता राजकीय नेता काय किंवा आमदार काय मोह, मायापासून थोडेच दूर असतात? मोह असतो म्हणून कार्यकर्त्यापासून तो आमदार होतो. आमदार झाल्यावर त्याच्या मोहाला अंकुर फुटू लागतात. किमान राज्यमंत्री तरी, थोडा कालावधी निघून गेल्यानंतर कॅबिनेट मंत्री, त्यानंतर गृह, महसूल किंवा नगरविकास मंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी कोण धडपड करावी लागते.. आणि पक्षश्रेष्ठींच्या कृपाप्रसादाने महत्त्वाचे खाते एकदा मिळाले की एकच लक्ष्य.. जणू अर्जुनासारखे मुख्यमंत्रीपदाचा डोळा.. अचूक फिल्डिंगने पदरात पाडून घेणे.. यात धावपळ किती असते आणि तुमचा एकच जप विश्रांती.. विश्रांती!!

अहो, ध्यान धरून बसलो तर सर्वच हातचे जाईल आणि शेवटी आपल्या मतदारसंघातील कुठल्यातरी देवळात टाळ कुटत बसावे लागेल. अहो, मंत्रिपद नाही तर नाही, किमान महामंडळ तरी हाती नको का? नाहीतर दबदबा कसा राहील?? पुन्हा यमुना फेम रविशंकर म्हणतात- ध्यान म्हणजे गाढ झोपेत जाऊन घेतलेली ‘गहरी विश्रांती’. अरे.. बोंबला.. गहरी विश्रांती म्हणजे राजकारणातील ‘राम नाम सत्य है..’ असेच असते. हे या साधूला कोणीतरी सांगा रे!

आमदार

आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात साक्षात आमदारांचे ‘ध्यान धारणा’ शिबिर! नका हो आमच्या आमदारांवर असा अन्याय करू. मन एकचित्त आणि एकाग्र करून त्यांना राजकारणाच्या शर्यतीतून बाद करण्याचे तर हे षडयंत्र नाही ना? येताजाता मन एकाग्र करायला लागले तर मनात ठरवलेली अनेक कामे मुख्यमंत्र्यांकडून कशी करून घेता येतील? जिल्ह्यातील एसपीना मुंबईत पोस्टिंग, निर्मलाताईंना झेड पीचे तिकीट, सुधाकररावांना जलसिंचनात वरची जागा, शेजारच्या गावातील नळपाणी योजना, अवकाळी आणि दुष्काळी निधी तालुक्याला मिळण्याबाबत, फौजदाराची बदली आणि चांगले पोलीस ठाणे, एक-दोन रस्त्याची कंत्राटे अशी शेकड्याने पडलेली कामे, या ध्यानधारणेच्या फुकटच्या कौतुकापायी कशी करता येतील?

मन एकाग्र करून आम्ही एकच गोष्ट करू शकतो. ती म्हणजे सभागृहाचे कामकाज बंद पाडू शकतो? कोरोनाच्या काळात मन:शांतीसाठी ही ध्यानधारणा असल्याचे वाचनात आले. या काळात मन स्थिर ठेवण्यासाठी ध्यानधारणा महत्त्वाची ठरेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. मन शांत झाले की शरीरात वेगळीच ऊर्जा निर्माण होते अशी पुस्तीही जोडली गेली आहे. पण, आम्हा आमदारांपुढे वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. या वेगळ्या ऊर्जेचे करायचे काय?? आणि संपूर्ण विश्रांती घेतली आणि विरोधी गटातील आमदाराने बाजी मारली तर..? नाही हो.. राजकारणात तरी संपूर्ण विश्रांती आणि ध्यानधारणेला जागा नाही. दिवसातील एक-दोन तास ध्यानधारणेत गेली तर विरोधी पक्षातील आमदार सत्तेत येतील.

या ध्यानधारणेबाबत माहिती घेत असता एका नियमाकडे लक्ष वेधले गेले. तो नियम असा की पोट खूप भरले असेल तर ध्यानधारणा अजिबात करू नये! तसेच ध्यानधारणा करतेवेळी चेहऱ्यावर सुरेख स्मितहास्य ठेवावे. अहो.. हे म्हणजे फारच झाले. आम्ही फक्त मुख्यमंत्री व दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाहून स्मितहास्य करत असतो. समोर कोणीच नसताना मनातल्या मनात का होईना, आम्ही कशाला आमची स्मित रेषा दाखवू?? पुढचा नियम तर सर्वात कठीण आहे. मी कोणीच नाही. माझी काहीच इच्छा नाही.. अहो, साहेब कोणतीच इच्छा नसती तर आम्ही राजकारणात आलो तरी असतो का? काय बावळटासारखे नियम सांगताय??

कळस म्हणजे सहज समाधानाने ध्यानधारणा करावी? आता हा व असा समाधानी कुठे शोधावा? खरे तर एका वेगळ्या अर्थाने विधान भवनाला शांतता हवी होती. सभागृह सुरू असताना ती गेली अनेक वर्षे गायब होती. सभागृहातील चर्चेच्या वेळी भविष्यात काही शांतता निर्माण होणार असेल, तरच हे ध्यानधारणा शिबिर काही कामाचे ठरेल. नाहीतर हर हर शंभो!!

Continue reading

शिवसेनाप्रमुखांची अटक हे पोलीस कर्तव्याचे फलित! संबंध मधुरच!!

पोलीस आयुक्त नियम आणि कायद्याच्या चौकटीतच काम करत असतो, नव्हे त्याला तसे करावेच लागते. म्हणूनच सत्तारूढ राजकीय नेत्यांनी 'आवडता-नावडता' अधिकारी असे शिक्के कुणावरही मारू नयेत, अशी स्पष्टोक्ती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांनी येथे केली. ज्येष्ठ पत्रकार...

दिल्ली पोलिसांचे आता ‘बेटी जरा धीरे से’…

अहो, ऐकलं का, दिल्ली पोलीस म्हणे त्यांची 'प्रतिमा' बदलणार! दरवेळेस 'पिछवाडा' काढणारे आता नमस्ते जी.. बोलणार. हे वाचून चकित झालात ना? आम्ही तर थेट चक्रावूनच गेलो. खरंतर विश्वासच बसेना. इतकी वर्षे 'पिछवाडा', 'मादxxx', 'घुसा देंगे', 'दादीके मय्यतमे नहीं आये...

हेतूपुरस्सर धूळ खात पडलेल्या मिडी बसेस आणा आधी मुंबईच्या रस्त्यांवर!

मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नुकताच 'लोकसवांद'मध्ये प्रथमच विस्तृत संवाद साधत पालिका प्रशासनासमोरील काही आव्हाने व भविष्यातील मोठ्या प्रकल्पांबाबत चर्चा केली. एखाद्या मोठ्या महानगरीचे व्यवस्थापन करणे तसे जिकरीचेच आणि आव्हानत्मक असते यात शंकाच नाही....
Skip to content