Homeटॉप स्टोरीआजही पवारांची मित्रपक्षांवर...

आजही पवारांची मित्रपक्षांवर कुरघोडी! पुन्हा पावसात भिजण्याचा प्रयोग!!

बदलापूर मध्ये घडलेल्या चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेण्यापासून आपल्या मित्रपक्षांवर केलेली कुरघोडी आज शरद पवार यांनी कायम राखली. त्याचप्रमाणे भरपावसात भिजत आंदोलन करून शरद पवार यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत लोकांकडून मिळालेली सहानुभूती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्नही केला.

आज सकाळी अकरा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत, असा एक तास तोंडाला काळी पट्टी लावून तसेच काळे झेंडे घेऊन निषेध करण्याचे आंदोलन काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. हे जाहीर करताना त्यांनी आपण, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी, तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीतर्फे हे आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र आज सकाळी दहा वाजण्याच्या आधीच शरद पवार यांनी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निषेध आंदोलनाला सुरुवात केली. वयोमानानुसार ते खाली बसू शकले नसले तरी खुर्चीवर मात्र ते स्थानापन्न झाले.

त्यांनी तोंडाला काळा मास्क लावला होता. त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्या खासदार सुप्रिया सुळे याही त्यावेळी हजर होत्या. काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकरही शरद पवार यांच्या बाजूला दिसत होते. मात्र मोहन जोशींनी तोंडाला काळी पट्टी लावल्याचे किंवा तसा मास्क लावल्याचे दिसून आले नाही. किंबहुना तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी तोंडाला मास्क लावण्याऐवजी कपाळावर, डोक्यावर काळी रिबीन लावली होती. काही जणांनी दंडाला काळा पट्ट्या लावल्या होत्या. त्यातच पुण्यात पावसाला सुरुवात झाली आणि भर पावसातच पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन पुढे चालू ठेवले. सुप्रिया सुळे यांनीही आपल्या साडीचा काळा पदर डोक्यावरून घेत पावसातच खुर्चीत बसकण मारली होती. कदाचित मागच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये भरपावसात केलेल्या भाषणाने राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचा विजय सोपा केला होता, तसा इम्पॅक्ट यावेळीही होईल का, असा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला असावा, अशी चर्चा तेथे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये होत होती.

शपथपत्राचे वाचन करत शरद पवारांनी ११ वाजून पाच मिनिटांनी आंदोलन संपवले आणि त्यांचा ताफा रवानाही झाला. मात्र, तोपर्यंत ना उद्धव ठाकरे आपल्या आंदोलनस्थळी पोहोचले, ना नाना पटोले. साडेअकरा वाजोपर्यंततरी त्यांच्या नियोजित आंदोलनस्थळी त्यांचे समर्थकच आपल्या नेत्यासाठी ताटकळत होते.

Continue reading

समृद्ध स्वतंत्र भारत, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वप्न

भारतीय संतपरंपरेने अध्यात्मासोबतच समाजप्रबोधन, समता आणि मानवतेची मूल्ये जपली आहेत. या परंपरेला आधुनिक राष्ट्रनिर्मितीची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विसाव्या शतकातले एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्य मिळविणे हे राष्ट्रनिर्मितीचे अंतिम उद्दिष्ट नसून, स्वतंत्र भारताला समताधिष्ठित, स्वावलंबी, एकात्म आणि समृद्ध...

‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ या गाण्यांचे लोकार्पण

मुंबईतल्या बोरीवली येथील स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या वतीने नुकतेच ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले', या दोन मराठी गाण्यांचे लोकार्पण सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधेरी येथील वेदा कुणबा सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना एवढ्या मोठ्या संख्येने गायक कलाकारांना आजिवासनसारख्या...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना किंमत शून्य…

भीमाशंकर-कर्जत येथील टोरंट पॉवरच्या 3000 मेगावॅट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कर्जत पोलीस ग्राउंडवरील सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात काय करायचे, काय नाही, हे सगळे दिल्लीतून ठरते,...
Skip to content