मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यावरच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याधी घसट वाढवण्यास सुरुवात केली होती. अधूनमधून उपमुख्यमंत्री देवेंद्रजीही राज यांच्या भेटी घेत होते. अखेर महायुती सरकारला कुणीतरी चालताबोलता ठाकरे हवाच होता. यावर्षी लोकसभा निवडणुका होणार हे ठरलेलेच होते. शेवटचा हल्लाबोल म्हणून शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडून अजितदादांना बरोबर घेऊन इतकेच नव्हे तर त्यांना उपमुख्यमंत्रीपद तसेच अर्थ खातेही देऊन महायुतीने आपला खुंटा बळकट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पक्षांतर्गत निवडणूक चाचपणी अहवालात काही केल्या पाहिजे तसे फासे पाडत नव्हते. मग काय केंद्रीय नेतृत्त्वाशी संधान बांधण्यात आले. त्यांनी हिरवा सिग्नल दिल्यानंतर राज ठाकरे यांना दिल्लीचे बोलावणे आले. झाले. राज दिल्लीला गेले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. या सर्व भेटी सुफळसंपूर्ण झाल्याची खातरजमा दोन दिवसांपूर्वी शिवतीर्थावर झाली.
दरम्यानच्या काळात ‘पतंगबाज’ लोकसभेची एक जागा, राजपुत्राला विधानपरिषद आदी मनातले मांडे खाऊ लागले. राज ठाकरे यांच्या मनसेशिवाय राज्याचे राजकारण पुढेच सरकणार नाही असा शोध काही माध्यमांनी लावला. काही माध्यमेही इतकी इरसाल आहेत की, गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत अवघ्या काही जागांवर विजयी झालेल्या मनसेशिवाय शिवसेनेचा महापौर होऊच शकत नाही अशी हाकाटी सुरु केली होती. अगदी त्याच धर्तीवर दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी बहाल केली गेली. बिचारे नांदगावकर.. गेल्या अनेक निवडणुकांत ते पराभूत झालेले.. (अपवाद फक्त भुजबळ × नांदगावकर शिवसेनेतील निवडणूक). काही हितशत्रूंनी ‘बाळा, बाळा पडणार कितींदा? एकदा, दोनदा की कायमचाच!’ अशी घोषणाही तयार केली होती, असे लालबाग परिसरात बोलले जात होते.

प्रादेशिक राजकीय पक्षांचे भवितव्य हे बऱ्याचअंशी केंद्रीय सत्ता ज्याच्या हाती असते त्या राजकीय पक्षावर अवलंबून असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गोष्ट वेगळी होती. त्यांच्याकडे अफाट करिष्मा असल्याने ते अनेकवर्षे पराभव पचवू शकले. संकटाशी सामना करून त्यांनी शिवसेनेचे सत्व टिकवले होते. परंतु हल्लीच्या कोणच्याच सेनेत ते सत्व दिसत नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.
राज ठाकरे यांची अनेक धोरणे धरसोडीची असतात हे आता अनेक उदाहरणे देऊन सिद्ध करता येईल. पण त्या तपशीलात जाण्यात आता अर्थ नाही. जाता जाता फक्त उल्लेख परप्रांतीय विरोधाचा करतो. खरंतर या धोरणात खरोखरच ‘दम’ होता. जे उत्तर भारतीय येथे दादागिरी करतात त्यांनी तशीच दादागिरी बिहार, आसाम, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, आदी राज्यांत करून दाखवावी ना? फार काय दिल्लीत तर बिहारी व उत्तर प्रदेश असे शीतयुद्धच गेली अनेक वर्षे सूरू आहे. आसाम तर या दोघांना जवळ उभाच करत नाही. राज्यातील अनेक नोकऱ्या ही मंडळी मराठी तरुणांकडून हिसकावून घेत आहेत. कमी शिकलेल्या मराठी तरुणांचे काम तर या उत्तर भारतीयांनी हिसकावून घेतलेले आहे. शिवाय राज्यातील उद्योगधंदे केंद्र सरकार गुजरात व अन्य राज्यांकडे वळवत आहे त्याबद्दल खरेतर राज यांनी भाजपच्या नेत्यांना खडसवायला पाहिजे होते.

चर्चेत राज यांनी मान डोलावली म्हणजे सर्व त्यांनी मान्य केले असे नाही. मात्र, जे अमित शाह ठाकरेंना जमीन दाखवा असे म्हणाले होते त्यांची पालखी उचलताना काकांना काय वाटले असेल याचा किंचितसुद्धा विचार का केला नाही? गेल्या चार वर्षांत तरी मोदी यांनी महाराष्ट्रासाठी काही भरीव केलंय असं वाटत नाही. गेल्या 10/15 वर्षांत राज ठाकरे यांचे अनेक शिलेदार त्यांना सोडून गेले आहेत. त्याचा त्यांनी कधी गांभीर्याने विचार केला आहे का? “Before you are leader success is all about growing yourself. When you become a leader success is all about growing others” याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुणाला वाढायची परवानगी दिली आहे का? याचा विचार राज यांनी जरूर करावा.
कोण काय आरोप करतो यांच्यावर आमचा विश्वास नाही. कारण गेली 40/42 वर्षे आम्ही राज यांचे राजकारण आणि इतर सांस्कृतिक कार्य जवळून पाहत आहोत. त्यांच्या रोजच्या उठण्याबसण्यात आम्ही नसूही. पण आम्हीही त्यांना जवळून ओळखतो. एकदोन निर्णय वा राजकारणात एक पाऊलही चुकीचे पडले तर होत्याचे नव्हते होते हे मी सांगायला नको. कुसुमाग्रज यांच्या अप्रकाशित साहित्याचे प्रकाशन राज यांच्या हस्ते झाले होते. त्यातील एका कवितेच्या ओळीचा उल्लेख करावासा वाटतो..
“गाठ गोसाव्याची एका
निर्जनात पडे
राजरस्त्यावर आता
पायचाल अंडे..”
भावी वाटचाल सुखकर होऊ नये म्हणून केंद्राने चलाखीने खेळलेली ही खेळी आहे. गेले दोन दिवस मी मनसेच्या अनेक सैनिकांना भेटलो. काहींनी तर मित्र असून बोलायला टाळाटाळ केली. पण जे अनेकजण बोलले ते असेच म्हणाले की, ‘शिवतीर्थावर बोलले ते आमचे राज ठाकरे नव्हतेच!!’
छायाचित्र मांडणीः श्रेया साळसकर

