काल दुपारची सव्वा वाजण्याची वेळ.. अचानक सर्व वाहतूक जिल्हाधिकारी कार्यालयाजिक असलेल्या ‘आनंद पॅलेस’ या इमारतीच्या रस्त्याने वळवण्यात आली. खरे तर या मार्गांवरून लहान गाड्या व बाईक्सच जातात. पण टीएमटीच्या बसेस, ट्रक्स, आदी सर्व वाहतूक या रस्त्यावर वळवण्यात आली होती. पहिल्यांदा असे वाटले की नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा ताफा आला असावा. यात नवल नाही. कारण मुख्यमंत्री स्वतःच ठाणे शहराचे नागरिक असून ते केव्हाही आपल्या शहरात येऊ शकतात. पण आनंद पॅलेसपासून चौकाकडे गेल्यावर बऱ्याच गोष्टी कानावर पडू लागल्या. एक मात्र पक्के झाले की, मुख्यमंत्र्यांचा ताफा नक्कीच नव्हता. हायसे वाटण्याऐवजी कुणीतरी सांगितले की या संपूर्ण विभागाला चाहूबाजूनी पोलिसांनी वेढलेले आहे व कुणालाही जिल्हा रुग्णालय चौकापर्यंत सोडत नाहीत.
पोलीस कुणाला सोडत तर नव्हतेच, पण जमावालाही जमू देत नव्हते. इतक्यात पॅलेस चौकात कुणीतरी उंच व स्मार्ट, गोरटेला तरुण पोलीस सहाय्यकाशी हुज्जत घालताना दिसला. ‘आमच्या साहेबांना तेथपर्यंत जायचंय. तुम्हाला माहित आहे का ते कोण आहेत? तो सहाय्यक म्हणाला. आम्हाला कसे माहित असणार? आम्ही लहान माणसे. पण आमच्या मोठ्या साहेबांनी आम्हाला येथे कुणालाही सोडू नका, असा आदेश दिलेला आहे.’ सहाय्यक बधत नाही हे पाहून त्या युवकाचा तीळपापड झालेला दिसत होता. तितक्यात तेथे अंमलदार आले. तोच त्या आलिशान सफेद रंगाच्या गाडीची काच खाली करून आमदारांनी विचारले (अर्थात अंमलदाराला) ‘काय म्याटर आहे?’ अंमलदाराने त्यांच्या कानात हळूच काहीतरी सांगितले. तोच आमदारांनी त्या स्मार्ट युवकाला गाडीत बसायला सांगितले आणि ती गाडी मुकाट्याने चालती झाली.
चहापेक्षा किटली गरमचा हा प्रकार पाहून मी जिल्हा रुग्णालयाच्या चौकाकडे वळलो. तेथे पाहतो तर सिनेनॉगच्या समोरील इमारतीच्या भोवती बरेचसे पोलीस अधिकारी काही गणवेशात तर काही साध्या वेषात हळू आवाजात चर्चा करत होते. तोपर्यंत काहीतरी संशयास्पद वस्तू तेथे असल्याचा निष्कर्ष सर्वजण सूचित करत होते. काही तर इस्रायल व हमास युद्धाचा संशय व्यक्त करत होते. यात काहीसे नव्हे बरेचसे तथ्य जाणवत होते.

अखेर कुणीतरी अज्ञात इसमाने पोलिसांना इ मेल करून सोलॉमान इमारतीत बॉम्ब ठेवल्याचे पोलिसांना कळवल्याचे चाचारत का होईना पोलिसांनी सूचित केले. चारही रस्त्यांवर मात्र बघ्यांनी एकच गर्दी केलेली होती. तसेच पोलिसांनी चारही बाजूला कठडे लावून ते रस्ते सर्वांसाठी बंद केले होते. तरीसुद्धा अतिउत्साही मंडळी ते कठडे पार करून त्या इमारतीजवळ जाण्याचा नाहक प्रयत्न करत होते. मग पोलिसांचाही आवाज चढत होता. आधीच प्रचंड वाहतूककोंडीने व त्याचे नियंत्रण करताना पोलीस मंडळी काहीशी कावलेलीच होती.
बरोबरच आहे हो.. त्यांच्या जेवण्याच्या वेळेसच हे विघ्न आल्याने त्यांची तारांबळंच उडाली होती. पण तुलनेने सर्वजण शांत होते. तसेच वरिष्ठाच्या आदेशाचे पालन करत होते. जणू त्या एरियाला पोलीस छावणीचे स्वरूपच प्राप्त झालेले दिसले. मात्र त्याचवेळी समस्त ठाणेकर प्रचंड वाहतूककोंडीमुळे त्रस्त झाला होता. सुमारे अडीच-तीन तास ही वाहतूककोंडी होती. सर्व रस्ते बंद केले होते. तरीही काही उभरते हुए नेते गॉगल वगैरे लावून आम्ही साहेबांची माणसे आहोत, असे सांगून शायनिंग मारत होते. या मार्गांवरील दुकानदार मंडळी आपल्या नोकरांसह दरवाजात उभे राहून धावते समलोचन करत होते. अखेर सुमारे साडेतीन तासांनी सर्व रस्ते खुले करण्यात आले व आलेला मेल हा अफवाच ठरला. सर्वांनी निश्वास सोडला तसेच मुख्यमंत्र्यांना ‘ऑल इज वेल’चा संदेश धाडला!
जाता जाता आता अशा अफ़वा आणि असे फेक कॉलची संख्या वाढतच जाईल अशी भीती विशेष शाखा आणि राजकीय निरीक्षकांनी माझ्याजवळ बोलताना केली व कारण दिले आगामी वर्षात होणाऱ्या महत्वाच्या सार्वत्रिक निवडणुकांचे!! आता बोला

