Homeडेली पल्सगोखले उड्डाणपुलावरची अंशतः...

गोखले उड्डाणपुलावरची अंशतः वाहतूक १५ फेब्रुवारीपर्यंत

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने तयार करण्यात येत असलेला पूल म्हणजे अंधेरीच्या गोखले पुलाचा प्रकल्प आहे. त्याचा पहिला गर्डर स्थापन करून, येत्या १५ दिवसात या पुलाची तांत्रिकदृष्ट्या सर्वाधिक आव्हानात्मक कामे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत गोखले पुलाची एक मार्गिका खुली करणे शक्य होईल, असा विश्वास तेथील स्थानिक आमदार अमित साटम यांनी काल व्यक्त केला.

अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या पहिला गर्डर स्थापित करण्याचे काम काल पहाटे या कालावधीत पार पडले. त्यावेळी गर्डर स्थापन करण्याचा शुभारंभ आमदार साटम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या गर्डर स्थापनेवेळी आमदार ऋतुजा लटके, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर तसेच पश्चिम रेल्वेचे अधिकारी, मे. राईट्स लि. व कंत्राटदार ए. बी. इन्फ्राबिल्ट यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

गोखले पुलासाठी गर्डर स्थापित करणे हे अभियंत्रिकीदृष्‍टया अत्यंत आव्हानात्‍मक असे काम आहे. पश्चिम रेल्‍वे प्रशासनाने मंजूर केलेल्‍या आराखड्यानुसार व पश्चिम रेल्‍वेने निर्देश केल्‍याप्रमाणे मे. राईट्स लि. यांच्‍या तांत्रिक पर्यवेक्षणाअंतर्गत हे काम प्रगतिपथावर आहे. रेल्‍वे सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीकोनातून कामाची जोखीम व तांत्रिक बाबी तपासूनच रेल्‍वे वाहतूक व पॉवर ब्लॉकच्या कालावधीत, रेल्वे भूभागात पहिल्‍या टप्‍प्‍यातील गर्डर काल पहाटे रेल्वे भागात यशस्वीपणे स्थापित करण्यात आला. नियोजित ७५ टक्के अंतर कापून तेथे गर्डर स्थापित करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात यश आले. हा टप्पा पार पडल्याने उर्वरीत अंतरावर गर्डर स्थापनाही अल्पावधीत आणि सुलभतेने करता येणार आहे. तर येत्या पंधरवड्यात हा गर्डर १४ मीटर उत्तरेला सरकवणे आणि नंतर तो ७.५ मीटर खाली आणणे ही कामे नियोजित करण्यात आली आहेत.

रेल्वे परिसरातील ७.५ मीटर उंचीवरून पूल खाली आणण्यासाठी पश्चिम रेल्वेने ११ दिवसांचा ब्लॉकचा कालावधी मंजूर केला आहे. पश्चिम रेल्वेच्या विशेष ब्लॉकमध्ये दररोज रात्रीच्या वेळेतील तीन तासात सरासरी ५५० मिमी इतक्या प्रमाणात गर्डर हा खाली आणणे शक्य होईल.

पहिल्‍या टप्‍प्‍यातील रेल्वे भूभागातील गर्डरचे वजन अंदाजे १२०० मेट्रिक टन इतके असून लांबी ९० मीटर, रूंदी १३.५ मीटर इतकी आहे. गर्डरची सुट्या भागांची जोडणी पूर्ण झाल्यानंतर रेल्वे भूभागातील गर्डर स्थापित करण्याआधीची चाचणी १ डिसेंबरला पहाटे पालिकेचे पूल विभागाचे अधिकारी आणि पश्चिम रेल्‍वेचे अधिकारी, मे. राईट्स लि. व कंत्राटदार ए. बी. इन्फ्राबिल्ड यांच्या उपस्थितीत पार पडली होती.

या पुलाबाबतची अधिक माहिती

· पुलाची लांबी– रेल्वे भूभागात– 90 मीटर

· रेल्वेबाहेर– पूर्वेस 210 मीटर, पश्चिमेस– 185 मीटर

· पुलाची रुंदी– (रेल्वे भूभागात)– 13.5 मीटर

· रेल्वेच्या पूर्वेस व पश्चिमेस पोहोच रस्ते, पदपथासह- १२ मीटर (दोन्ही बाजूस)

· एकूण रुंदी– २४ मीटर

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणा-या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये सुमारे १२७५ टन वजनाचे दोन गर्डर (तुळया) स्थापन करण्याचा कामाचा समावेश आहे. या गर्डरच्या भागांची (स्ट्रचरल मेंबर्स) फॅब्रिकेशन अंबाला येथील कारखान्यात करण्यात येत आहे. तयार केलेल्या सुट्या भाग (मेंबर्स)ची जुळवाजुळव (असेंब्ली), सुमारे १३-१४ मीटर उंचीवर, रेल्‍वे रुळाच्‍या पूर्व बाजूस तात्‍पुरत्‍या संरचना व्‍यवस्‍थेवर करण्यात आलेली आहे.

गर्डरची उभारणी करुन रेल्‍वे रुळावर गर्डर लाँचिंग करणे / उत्‍तरेकडील पहिल्‍या टप्‍प्‍यातील नियोजित रेषेत (Alignment) सरकवणे (Side sleeving), त्‍यानंतर सुमारे ७.५ मीटर खाली आणणे (lowering) अशा प्रकारे पहिल्‍या टप्‍प्‍यातील गर्डरची उभारणी करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले होते. त्‍यानंतर, दुसऱ्या टप्‍प्‍यातील गर्डरची त्याच तात्‍पुरत्‍या संरचना व्‍यवस्‍थेवर उभारणी करण्‍यात येईल.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने जुना पूल पूर्णपणे तोडून २८ मार्च २०२३ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे प्रकल्पाची जागा हस्तांतरित केली. पश्चिम रेल्‍वे प्रशासनाद्वारे सदर पुलाची जागा हस्‍तांतरित केल्‍यानंतर १ एप्रिलपासून पुलाच्‍या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्‍यात आले. एखाद्या पुलाच्या कामात ७.५ मीटर उंचीवरून सुमारे १३०० टन वजनी गर्डर खाली विशिष्ट उंचीवर आणणे, अशाप्रकारचा हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. या प्रक्रियेतील सर्व टप्‍पे अतिशय काटकोरपणे करणे, रेल्‍वे सुरक्षेच्‍या निकष इत्‍यादी बाबींमुळे कामाच्‍या प्रगतिपथावर मर्यादा येतात. त्यामुळे सदर तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.

रेल्वेच्या साधारणपणे एक तासाच्या ब्लॉकमध्ये गर्डर फक्त १५ सेंटीमीटर इतकाच खाली आणता येईल. त्यामुळे गोखले पुलाच्या या अवाढव्य १३०० टन वजनी गर्डरकरिता ७.५ मीटर खाली उतरवण्याच्या कामासाठी लागणारा कालावधी अधिक असू शकतो. अशाप्रकारचे अभियंत्रिकी दृष्ट्या आव्हानात्मक काम पश्चिम रेल्‍वे प्रशासनाने मंजूर केलेल्‍या आराखड्यानुसार व पश्चिम रेल्‍वेने निर्देश केल्‍याप्रमाणे मे. राईट्स लि. यांच्‍या तांत्रिक पर्यवेक्षणाखाली प्रगतिपथावर आहे. एकदा गर्डर खाली आणून स्थापन केल्यानंतर त्यावर सळया अंथरून सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरींगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिकचे काम पूर्ण करण्यात येईल.

Continue reading

कॅनडाच्या ‘कॉन्स्टेलेशन’कडून पुण्यातल्या ‘पिओसिट’चे अधिग्रहण

सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक मोठी आणि महत्त्वाची व्यावसायिक घडामोड समोर आली असून, कॅनडातील नामांकित 'कॉन्स्टेलेशन सॉफ्टवेअर' (सीएसआय) या कंपनीने भारतातील 'पिओसिट सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. या महत्त्वपूर्ण करारामुळे जागतिक सॉफ्टवेअर बाजारपेठेत दोन्ही कंपन्यांचे स्थान अधिक...

भोर ईंण्डस्ट्रीजच्या कामगारांना मिळाला न्याय!

कंपनी व मान्यताप्राप्त संघटना यांच्यात झालेल्या समझोत्यामुळे संबधित कामगारांचे हक्क संपुष्टात येत नाहीत, असा निकाल देत औद्योगिक न्यायालय, पुणे यांनी भोर ईंण्डस्ट्रीजने तीन महिन्यांच्या आत कामगारांना नुकसानभरपाई अदा करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याप्रकरणी, कामगारांच्यावतीने उदयोन्मुख वकील...

प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा..

“प्रेम नाम है मेरा.. प्रेम चोपडा..” हा डायलॉग आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर ओळख मानली जाते. अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रेम चोपडा यांनी खलनायकाच्या भूमिका करतानादेखील आपल्या वेगळ्या शैलीने चाहत्यांचे प्रेम मिळवले. पण काळाच्या ओघात...
Skip to content