Homeमाय व्हॉईसआमची ‘बेस्ट’ रसातळाला...

आमची ‘बेस्ट’ रसातळाला जाईल?

गर्दीच्या वेळी मुंबई-ठाण्यातील कुठल्याही रस्त्याच्या चौकात एका बाजूला उभे राहून रस्त्यावर नजर मारा. काय दिसते? बेस्टच्या तुरळक बसेस, खासगी बस कंपन्याच्या बऱ्याच बसेस, त्यामध्येही अनेक प्रकार… सिटी फ्लो, माय फ्लो, समर्थ, दत्तगुरू, साईनाथ वगैरे देवादिकांच्या तर बक्कळ साध्या बसेस. आणखी एक प्रकार राहिला तो म्हणजे कॉलसेंटरच्या बसेस आणि विमान कंपन्याच्या आलिशान बसेस… टॅक्सी, रिक्षा तर हजारोंनी आहेत. आज आपण फक्त बसेस आणि त्यातही बेस्ट बसेसबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही म्हणाल काय वेडा आहे हा! जगात काय चाललंय, देशात निवडणुकांचा बिगुल वाजलाय. जगावर युद्धाचे ढग वावरतायत आणि हा चक्रम बेस्ट बसेसबाबत बोलतोय. ठार वेडा झाला असावा. बोलोत बापडे, बोलणाऱ्याचे तोंड थोडेच धरता येते…

बांद्रा-कुर्ला संकुलातील कुठलाही चौक, दादर टी टी, सायन सर्कल, महापालिका मुख्यालयाजवळील व्ही टीचा चौक, हुतात्मा चौक, हाजी अली चौक तसेच ठाण्यातील तीन हात नाका व माजिवडा चौक आदी प्रत्येक ठिकाणी नजर मारलीत तर लोकहो तुम्हाला खासगी बसेसच्या रांगाच रांगा दिसतील. बेस्ट, टीएमटी वा एसटी बसेस मात्र हातांच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच.. किंबहुना त्याहूनही कमी दिसतील. आता जो किफायतशीर प्रवास आहे तोच काही वर्षांत 100/150 रुपयांच्या घरात जाईल आणि हा संपूर्ण महसूल खासगी कंपन्याच्या घशात जाईल. नव्हे.. जाणार आहेच!

याचे प्रमुख कारण म्हणजे मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या बेस्ट प्रशासनाकडे आताच्या घडीला केवळ 1300 बसगाड्याच उरलेल्या आहेत. कंत्राटदारांकडे 1700 बसेस आहेत. म्हणजे सगळ्या मुंबपुरीला व आसपासच्या भागाला मिळून केवळ 3000 बसगाड्या आहेत. त्यातील सुमारे 800 गाड्या नादुरुस्त होऊन आगारात उभ्या आहेत. त्यांना सुरू करण्यासाठी योग्य मुहूर्त तरी मिळत नाही वा दुरुस्त करण्यासाठी वापरात असणारा तो पाना व कामगार तरी नाहीत. एकूण काय तर राजकारणाच्या साठमारीत बेस्ट प्रशासनाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. परिणामी बसथांब्यांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसते व पाऊण तास ते एका तासाच्या आत बस केव्हाच येत नाही. (व्हीटीजवळील थांबा यात धरू नये.)

बेस्ट प्रशासनाकडील कागदपत्रे पाहिली असता सकृतदर्शनी असे दिसते की, नव्वदच्या दशकात बेस्टची बऱ्याच प्रमाणात चांगली वाढ झाली. बसेसची संख्या, आगारांची संख्या तसेच अधिकारी, कामगार आणि कर्मचाऱ्यांची संख्याही वाढलेली दिसते. स्वाधीन क्षेत्रीय यांच्या कारकिर्दीत बेस्टची चांगलीच प्रगती झालेली दिसते. तेव्हा बेस्टवर नाममात्र 81 कोटी रुपयांचे कर्ज होते. बेस्टचे दुष्टचक्र 2006पासून सुरू झाले, असे म्हटले तर वावगे होणार नाही. याच कालावधीत बेस्टने किंगलॉन्ग बसेस हा पांढरा हत्ती विकत घेतला आणि या हत्तीने बेस्टला जणू धुळीस मिळवले. बेस्ट बसेसचा ताफा 3000 वरून 5000 वर नेण्यात आला. या किंगलॉंन्ग बसेस अगदीच रद्दड निघाल्या. या बसेसमध्ये आगी लागणे, इंजिन मध्येच बंद पडणे, वातानुकूलीत यंत्रणा वारंवार बिघडणे, खड्यात आपटून बसेस बंद पडणे हे तर काहीच नाही, याहीपेक्षा संतापजनक बाब म्हणजे या बसेस दुरुस्त करण्यासाठी प्रशिक्षित कामगारवर्गच नसल्याने सर्व व्यवहारांची बोंब झाली. आठ वर्षांचे आयुर्मानही या बसेस पूर्ण करू शकल्या नाहीत. भंगारातही या गाड्या कोणी घेईना. या सर्वांचा गंभीर परिणाम बेस्टच्या आर्थिक घडीवर बसला व बेस्टवर चार हजार कोटी रुपयांहूनही मोठा कर्जाचा डोंगर उभा राहिला. (या बसेसचा प्रस्ताव समंत करण्यासाठी बेस्ट समिती, तत्कालीन महाव्यवस्थापक, नगरविकास खाते, मुख्यमंत्री कार्यालय, विधि विभाग व परिवहन खात्यातील कुशल असे ‘मुखलेपन’ केले गेले, अशी बेस्ट भवन परिसरात खमंग चर्चा अजूनही ऐकायला मिळते.)

यानंतर बेस्टचा डोलारा सावरण्याचा प्रयत्न करण्यासाठी बेस्टचा ताफा दहा हजार बसेसचा करण्यावर भर दिला गेला. परंतु यातील 7000हुन अधिक बसेस कंत्राटी देण्याचा विचार होता. येथूनच बेस्टला घरघर लागायला सुरुवात झाली. बेस्टचा मालकीचा ताफा आता केवळ 1686 इतका कमी झाला असून कंत्राटी बसेस वाढल्याने तोट्यात दररोज वाढच होत आहे. शिवाय लोकप्रिय धोरण म्हणून प्रवासीभाडे अतिशय कमी आकारून प्रशासनाने स्वतःच्या पायावर धोंडाच मारून घेतला आहे. प्रवासीभाडे कमी ठेवायचे असेल तर राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने सढळ हस्ते अनुदान देणे गरजेचे आहे. नागरी क्षेत्रात वाहतुकीसाठी केंद्र सरकार मोठी रक्कम देत असते. हेही येथे कुणाच्या गावी नाही. कंत्राटी बसेसची देखभाल व दुरुस्तीची कामेही रामभरोसे आहेत. बेस्टच्या एकूणच आर्थिक आणि प्रशासकीय अडचणीकडें लक्ष वेधून घेण्यासाठी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि कार्याध्यक्ष उदयकुमार आंबोणकर येत्या काही दिवसात महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांची भेट घेणार असल्याचे समजते. जाता जाता एक वाक्य आठवलं. “A developed country is not a place where poor have cars, its where the rich ride public transportation.”

Continue reading

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले 'मोहोळ' हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि 'भिडल्या' त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. 'मोहोळ' वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण...
Skip to content