एकीकडे केंद्रीय मंत्री गडकरी महामार्गांबाबत आलटून-पालटून चकचकीत करणार, अशा घोषणा करत असतात. परंतु, त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी त्यांच्या घोषणांना हरताळ फासणारे काम करण्यात आघाडीवर दिसतात. राज्यातील मंत्री दीपक केसरकर हे तर मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील… तरीही या मुंबई-गोवा महामार्गाची आबाळ होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोकण-मुंबई महामार्गाची दुर्दशा झाल्याने अनेक वाहनचालक वैभववाडी मार्गाला प्राधान्य देताना दिसतात. रात्रीच्या वेळेला अवजड वाहनेही येथून जात असतात.

मला तर अनेकांनी वैभववाडीचा हा महामार्ग नेहमीच असा खड्डेमय असतो असे सांगितले. महामार्ग मंडळाचे वरिष्ठ अधिकारी मार्गाची दुरुस्ती झाल्यावर येथे त्याची पाहणी करायला किंवा कंत्राटदाराने कुठली साधनसामुग्री वापरली आहे याची तपासणी करायला कधीच येत नाहीत, अशी पुस्ती जोडली. या रस्त्यासाठी वापरलेल्या साधनसामुग्रीची प्रयोगशाळेत तपासणी केली तर ही साधनसामुग्री निकृष्ट दर्जाची आहे असाच शेरा मिळेल, असे काही ज्येष्ठ नागरिकांनी स्पष्ट केले. गडहिंग्लजपासूनचा हा रस्ता नेहमी असाच असतो, असे येथून नेहमी प्रवास करणाऱ्यांनी सांगून उलट याच्या आसपास कर्नाटक सरकारचे जे रस्ते आहेत ते नेहमीच चांगल्या स्थितीत असतात, असे ठासून सांगितले.

तालेवार नेत्यांनी कणकवली पाहावी
कणकवली रेल्वेस्थानकात रेल्वेच्या प्रतिष्ठित अशा वंदेमातरम् गाडीने आलो आणि स्थानकाबाहेर पडलो की लगेचच भ्रमनिरास होतो. कारण आलीशान गाडीतून आल्यावर रस्त्याकडे पाहताच प्रवासाचा सर्व आनंद रसातळाला जातो. याचे कारण स्थानकाबाहेरील रस्त्यावर तब्बल ७०/७५च्या आसपास खड्डे आहेत. त्यातून वाट काढतच महामार्गावर यावे लागते. महामार्ग मात्र उत्तम आहे. कणकवलीचे लोकप्रतिनिधी तसेच प्रभावशाली अन्य नेते राज्यात तालेवार नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. राजकीय नेत्यांवर ते नेहमीच तोफा डागत असतात. मग हेच नेते नोकरशहांबाबत इतके कनवाळू कसे होतात, असा प्रश्न तेथील जनतेच्या मनात निर्माण होतो. पण ही जनता हा प्रश्न मनातल्या मनातच विचारते कारण उघडपणे विचारले व नेते बिथरले तर… आपल्याच कॉलरला हात घालतील, अशी भीती आहे. पर्यटकांच्या प्रेमापोटीतरी या नेत्यांनी नोकरशहांना फैलावर घेतले पाहिजे, असे जनतेला मनातून वाटत आहे.

दुसरे असे की… पावसाळा सुरू झाला की खड्डे हा विषय जोडीनेच चर्चेला येतो. गेली अनेक वर्षे या खड्ड्याबंत विविध उपाय जाहीर केले गेले. परंतु अंमलात मात्र कोणताच उपाय आणला जात नाही. परिणामी गणपती अखेरपर्यंत या खड्ड्यांतूनच मार्ग काढावा लागतो. पावसात वाहून न जाणारी प्लास्टिकची खडी सांगितली गेली. पण ही खडी अद्यापि कुठेच दिसली नाही. पावसाळा संपेपर्यंत तरी ‘खड्डेच खड्डे सर्वकडे.. गेला रस्ता कुणीकडे?’ असे म्हणण्यावाचून पर्याय नाही. पावसाळा संपण्याच्या आसपास हे खड्डे भरले जातातही. परंतु तेही समतल करुन भरले जात नाहीत. परिणामी ते टेंगळासारखे नको तेथे त्रास देतात. तेव्हा केंद्र व राज्य सरकारने एकमेकांवर जबाबदारी ढकळण्याएवजी कामे मार्गी लावण्यावर भर द्यावा, असे येथील स्थानिक जनतेला मनापासून वाटत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आम्ही विनंती करू इच्छितो की त्यांनी या वर्षापासून या खड्डे भरण्याविषयी अभियंत्यांची एक कार्यशाळा आयोजित करावी की जेणे करुन अभियंते आणि मुकादम मंडळी खड्डे कसे भरावेत याचे शिक्षण तरी घेतील. रवळनाथ सर्वांना सुबुद्धी देवो!


