हे महामानवा! प्रजासत्ताक भारताच्या घटनेच्या शिल्पकारा!! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खरोखरच आम्हाला माफ करा!! आसेतु हिमाचल एक आणि अखंड असलेल्या भारत वर्षावर दीडशे वर्षं फिरंग्यांनी राज्य केलं आणि आमच्या मनामनात दुहीची बीजं रोवली/पेरली. आमच्या देशाचे हिंदुस्तान, पाकिस्तान असे तुकडे केले. भारत स्वतंत्र होऊन 74 वर्षं झाली, पण आमच्यात दुहीची बीजं अजूनही कायम आहेत. भले आम्ही एकविसाव्या शतकात पोहोचलो असलो तरी आमच्यात ती बीजं अजूनही डोकावतच असतात. दुहीचा आम्हाला शापच आहे. कितीही काही झाले तरी आम्ही आमची मानसिकताच बदलायला तयार नाही.
बाबासाहेब, भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि आपण राज्यघटना तयार केली. 26 जानेवारी 1950 ला भारत प्रजासत्ताक झाला. आपण आम्हाला दिशा दिलीत. आपण पुढारलेले आणि मागासवर्गीय यांना एका पातळीवर आणण्यासाठी, सवर्ण आणि दलित यांना एका प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेत दहा वर्षांसाठीची मुदत घालून दिलीत. 1950ला आपण लिहून ठेवलंत की 10 वर्षापर्यंतच आरक्षण ठेवा. पण प्रत्येक 10 वर्षानंतर ते वाढवणे, आपण दाखवून दिलेली मुदत वाढवून घेणे आमची राजकीय मजबुरी झाली आहे. आरक्षण म्हणजे आम्हाला एक मिळालेली मोठी मतपेटी आम्ही समजू लागलो. आज देशात आरक्षणाच्या नावाखाली अराजक माजतं की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

बाबासाहेब, आपण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे सांगून गेलात. पण आम्ही त्यातले काहीही घेऊन शकलो नाही. ना शिकलो, ना संघटीत झालो, ना आमच्यावरील अन्यायाच्या विरोधात संघर्ष केला. फक्त मतांच्या राजकारणासाठी एकमेकांची डोकी फोडण्यासाठी पुढे सरसावलो. मी म्हटले की, बाबासाहेब शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असं सांगून गेले. त्यातला फक्त संघर्ष करा एवढंच आम्ही मनात ठेवलं तर माझी कन्या प्रा. नयना म्हणाली, अहो बाबा, याला आपण संघर्ष तरी कसं म्हणणार? ही तर निव्वळ भांडणं. संघर्ष हा अन्यायासाठी असतो नां?
आज तंत्रज्ञान झपाट्याने वाढले आहे. धीरुभाई अंबानी म्हणाले, कर लो दुनिया मुठ्ठी में. आम्ही एका क्लिकवर जग मुठीत घेण्यासाठी सरसावलो. पण छे, हे तर निव्वळ आधुनिकतेचे बुडबुडेच. अजुनही आम्ही बुरसटल्यासारखेच वागतो? आज आम्हाला समाजमाध्यमाचं शस्त्र मिळालंय. हे शस्त्र दुधारी असल्याचं आम्हाला कळलंच नाही. या सोशल मीडियाच्या दुधारी शस्त्राने आम्ही एकमेकांच्या माना कापायला पुढे निघालोय. दुही वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करू लागलोय.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी चारशे वर्षांपूर्वी लढा दिला. गड किल्ले बांधले. आमच्या नैसर्गिक संपत्तीत भर घातली. आम्हाला युध्दनीति, गनिमी कावा शिकविला. आपल्या मावळ्यांमध्ये सर्व प्रकारचे जातीपातीचे लोक खांद्याला खांदा लाऊन मुघलांच्या साम्राज्याशी लढले. पण त्याच छत्रपतींचा आणि बाबासाहेब, आपलाही आम्ही फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठीच उपयोग करुन घेत आहोत, नव्हे ते करण्यासाठीच धडपडतो आहोत. ज्या शिवरायांची किर्ती विश्वात झाली. ज्या शिवरायांचा आदर्श साता समुद्रापार गेला. अटकेपार त्यागाचा, शौर्याचा भगवा फडकवला त्या शिवाजी राजांना आम्ही `मराठे’ एवढ्यापुरते सीमित करुन ठेवून मागासवर्गीय आरक्षणाच्या चौकटीत बंदिस्त करण्यासाठी धजावलो आहोत?
बाबासाहेब, आपण भारतरत्न आहात, आपण विश्वरत्न आाहात. पण आम्ही आपल्यालाही केवळ दलितांचे म्हणून संकुचित करायला धजावलो आहोत? महात्मा जोतिबा फुले यांना आम्ही केवळ एकाच समाजापुरते सीमित ठेवणार आहोत? जळगाव येथे जैन इरिगेशनचे भंवरलाल जैन यांनी गांधीतीर्थ उभारले आहे. भंवरलाल हे जैन समाजाचे. त्यांनी तीर्थंकर भगवान महावीर यांचे जिनालय किंवा देरासर उभारण्याऐवजी महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘गांधी तीर्थ’ उभारले. हा एक अपवाद म्हणावा लागेल. एरव्ही सारे राष्ट्रपुरुष त्यांच्या त्यांच्या जातीधर्मात बंदिस्त करुन ठेवण्यात धन्यता मानली.

एक जानेवारी 1818 रोजी ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य पुण्यावर चाल करुन आले आणि त्यांचा मुकाबला पेशव्यांच्या 28000 सैनिकांशी होऊन 500/800 महार सैनिकांनी कोरेगाव भिमा तीरावर रोखले. त्या सैन्याला परास्त केले आणि 75 फूट उंच विजयस्तंभ कोरेगावला उभारला. त्या 200 वर्षांपूर्वीच्या विजयस्तंभाला अभिवादन प्रत्येक एक जानेवारीला करायला असंख्य लोक येतात. मग 1 जानेवारी 2018 रोजी तब्बल दोनशे वर्षानंतर हिंसाचार का व्हावा? आम्ही काहीही करू शकतो. अगदी म्यानमारला खुट्ट झाले तरी आम्ही भारतात मोर्चे काढू शकतो. कोरेगावला काय झालं याची काहीही माहिती नसलेल्यांनी 200हून अधिक बसेस जाळल्या. नाही.. बाबासाहेब, आम्ही आपले विचार तंतोतंत अंमलात आणण्याच्या लायकीचेच नाही.
बाबासाहेब, तुम्हाला आठवतंय? 1995 ते 1999 या काळात मनोहर जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार होते आणि त्यावेळी रमाबाई नगरातल्या घटनेने गालबोट लावण्याचा प्रकार घडला. आठवतंय का बाबासाहेब? तीच इतिहासाची पुनरावृत्ती 2018मध्ये घडली असे आपणास वाटत नाही का? सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा जातीपातीच्या राजकारणाचा सहारा घेतला जातोय.

बाबासाहेब, तुम्ही जाणताच ना? काँग्रेसवाल्यांनी तुम्हाला किती त्रास दिला. अगदी लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यातही काँग्रेसवाल्यांनी कसूर केली का? 10 वर्षं केंद्रात आणि 15 वर्षं राज्यात सत्तेवर असताना काँग्रेसी राज्यकर्त्यांनी आपल्या भव्य स्मारकासाठी इंदू मिलची जागाही हस्तांतरीत करण्याचे काम यशस्वी केले नाही. बाबासाहेब, आपण ज्या ठिकाणी लंडनला उच्च शिक्षणासाठी राहात होतात, ते घरसुध्दा मनमोहन-चव्हाण राजवटीत आपल्या ताब्यात येऊ शकले नाही. लंडनचे घर असो, इंदू मिलची जागा व त्यावरचे स्मारक असो, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असो, महू येथील आपली जन्मभूमी असो, रत्नागिरीची वास्तू असो की संविधान दिवस असो, आपल्याशी संबंधित अशा सर्व गोष्टी महाराष्ट्रातल्या महायुती तसेच केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने मार्गी लावल्यात ना?
बाबासाहेब, आपल्याला विश्वरत्न बहुमान प्रत्येक जण बोलण्यातून देत असतो. पण आपल्याला सर्वोच्च असा भारतरत्न किताब देण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाठींब्यावरच्या विश्वनाथ प्रतापसिंह यांना पुढे यावं लागलं. तेही प्रा. अरुण कांबळे या मुंबई विद्यापीठामधल्या मराठी भाषा विभाग प्रमुखाने लिहिलेल्या पत्रामुळे. एका घरात तीन-तीन भारतरत्ने गेली. त्याबद्दल आम्हाला काहीही म्हणायचं नाही. पण आपल्यासारख्या महामानवास भारतरत्न देण्याची इच्छाही काँग्रेसच्या राज्यकर्त्यांना होऊ नये? आपल्या नावाचा केवळ मतांच्या राजकारणासाठी काँग्रेसवाले सदैव धडपडताहेत आणि त्यांना तुमचे अनुयायी म्हणवणारे साथ देताहेत. खरंय नां बाबासाहेब?

बाबासाहेब, खरंच आम्हाला माफ करा! तुम्ही आमच्यासाठी एवढं सर्व करुन गेलात, पण तुमच्या विचारांवर न चालता फक्त आम्ही एकमेकांची माथी भडकावण्याचेच काम करतो आहोत. भीमा-कोरेगांवच्या घटनेनंतर समाजमाध्यमात काही संदेश फिरताहेत ते डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहेत. अर्जून भालेराव यांनी पाठवलेल्या संदेशात म्हटलंय, मी अजूनही त्या दिवसाची वाट बघतोय, जेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान अचानक घोषित करतील की आज रात्री बारापासून भारतात कोणतीच जात किंवा कोणताही धर्म अस्तित्त्वात राहणार नाही. आठ दिवसांची मुदत देऊन जुन्या जाती, धर्म बदलून नवीन जात ‘माणूस’ आणि नवीन धर्म ‘मानवता’ म्हणून सर्वांना बंधनकारक असेल. असे झाले तरच हा आपला ‘देश’ जगावर राज्य करेल. कारण ‘कॅशलेश’पेक्षा आपला देश ‘कास्टलेस’ झाला झाला पाहिजे.
शोभा वाजपेयी यांनी पाठवलेला संदेश काय सांगतो? I crossed my street, they asked my caste. I crossed my district, they asked my religion. I crossed my state, they asked my language. I became Indian only after I crossed my country..! A silent, but very strong message.. think about it..
गुजराती साहित्यिक धर्मेश भट्ट म्हणतात, ‘ना ब्राह्मण जिंकले, ना मराठा, ना दलित.. जिंकले फक्त इंग्रज! 200 वर्षानंतरही फूट पाडण्यात यशस्वी.
असाच एक संदेश फिरतोय की, विश्व 2018मध्ये प्रवेश करत असताना महाराष्ट्र मात्र 1818मध्ये प्रवेश करता झाला.
बाबासाहेब, ही काही प्रातिनिधिक आहेत. पण समाजा समाजात तेढ लावून एकमेकांची डोकी फोडण्यामुळे आम्ही खरोखरच आपल्या स्वप्नातला भारत घडवणार आहोत का? जा जा म्हणूनसुद्धा जी ‘जात’ नाही ती ‘जात’, हीच ‘जात’ अजूनही आडवी येते. इतक्या वर्षांनंतरही ही परिस्थिती असल्यामुळेच अखेर म्हणावेच लागते, बाबासाहेब आम्हाला माफ करा!

