Homeपब्लिक फिगरहा तर महिनाभराचा...

हा तर महिनाभराचा अघोषित लॉकडाऊनच!

राज्यात ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आले, ते पाहता हा एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच आहे. या निर्बंधांमुळे छोटे व्यवसायी आणि जनमानसात तीव्र नाराजी असून, या सर्व घटकांशी पुन्हा नव्याने चर्चा करून निर्बंधांबाबत नव्याने अधिसूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून केली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत आहे आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावावे लागतील, असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांचा लॉकडाऊनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शविली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाऊनसदृश निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करत आहेत, असे ते या पत्रात म्हणाले.

हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजीबात करण्यात आलेला नाही. अनेक क्षेत्रांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत असून, अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे मोठा फटका बसत आहे. ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आले, ते पाहता हा एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर वाहतूक (ट्रान्सपोर्टेशन) खुली ठेवताना गॅरेज आणि स्पेअर पार्टसची दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

त्यामुळे पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधांबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोनाला रोखणे महत्त्वाचे आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. आपण तत्काळ यासंदर्भात पाऊले उचलावी, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

Continue reading

मुंबईत येत्या २० नोव्हेंबरपासून ३ दिवस रसिकांसाठी संगीताची मेजवानी

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा, सुरांची माधुरी आणि स्वरकलेचा अभिजात वारसा जपणाऱ्या मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने यंदाही वार्षिक संगीत महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० ते २२ नोव्हेंबर, या कालावधीत रंगणारा हा त्रिदिवसीय संगीत महोत्सव...

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प होणार व्हेटो अध्यक्ष?

अमेरिकेत नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सपाटून मार खाल्ल्यानंतर ट्रम्प यांचे अध्यक्षपद फक्त नामधारी राहणार आहे. येत्या तीन जानेवारीपर्यंत ट्रम्प यांची सध्याची ध्येयधोरणे अस्तित्त्वात राहतील. मात्र, त्यानंतर त्यांना अमेरिकी काँग्रेस (प्रतिनिधीगृह) तसेच सिनेटमधल्या डेमॉक्रॅटिक...

दहावीतल्या निधी पावसकरचाही दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात

संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते, याचा आदर्श नुकताच मुंबईत पाहायला मिळाला. दहावीत शिकणाऱ्या निधी पावसकर या मुलीने आपल्या पिगी बँकेत साठवलेली १०,००० रुपयांची पुंजी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निधीसाठी नुकतीच सुपूर्द केली. 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी...
Skip to content