Homeटॉप स्टोरीविधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून...

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून थोपटे?

राज्य विधिमंडळाचे संपूर्ण अधिवेशन विधानसभेच्या अध्यक्षाविनाच संपण्याच्या उंबरठ्यावर असताना काँग्रेसकडून आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आग्रह धरला जात असून यासाठी त्यांच्याकडून संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याला आता एका महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अधिवेशनातच घेतली जाते. त्यामुळेच पटोलेंनंतर या पदावर कोण जाणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर तेव्हा  दिल्लीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, हे पद आता रिक्त झाले आहे. त्यामुळे या पदासाठी नव्याने चर्चा केली जाईल, असे सांगत राष्ट्रवादी यावर दावा करू शकते, असे सूचित केले होते. शिवसेनेला अध्यक्षपद देऊन त्याच्या मोबदल्यात उपमुख्यमंत्रीपद घ्यावे, असा प्रयत्न काँग्रेस करेल, अशी शक्यताही राजकीय क्षेत्रात व्यक्त होत होती. मात्र त्यात पुढे फारसे काही झाले नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला एक पत्र पाठवून अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख विचारली होती. परंतु या पत्रावर सरकारने मौन बाळगले. उपाध्यक्षांच्याच अध्यक्षपदाखाली सध्या हे अधिवेशन सुरू असून उद्या त्याची समाप्ती होणार आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही, सरकार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी घाबरते आहे का, असा सवाल करत सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदार फुटण्याचा दावा केला होता. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासाचा दाखला देत यापूर्वी जास्तीतजास्त आठवडाभर हे पद रिक्त राहिल्याचे विधानसभेत दाखवून दिले होते.

काल अचानक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच माजी प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी काँगेसच्या नेत्यांच्या हालचाली वाढल्या. या खलबतांमध्ये अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी ‘बोलून’ ही निवडणूक बिनविरोध करायची. बिनविरोध होत नसल्यास सध्या असलेल्या काठावरच्या बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाने ही निवडणूक पार पाडायची, अशी व्यूहरचना काँग्रेसकडून आखण्यात आली असल्याचे कळते. या पदासाठी काँग्रेसने आपल्या उमेदवाराची चाचपणीही केली असून पुण्यातील भोर मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव जवळजवळ निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

आज सकाळी विधानभवनातल्या काँग्रेसच्या विधिमंडळ कार्यालयात काँग्रेसच्या आमदारांची तसेच काही निमंत्रित नेत्यांच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर औपचारिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यात निवडणुकीची तारीख तसेच उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. आजच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठकही होण्याची शक्यता आहे. त्यात यावर राष्ट्रवादी तसेच शिवसेनेची नेमकी भूमिका काय, हे जाणून घेऊन त्यांच्या गळी अध्यक्षपदाची निवडणूक उतरविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाण्याची शक्यता आहे.

उद्या निवडणूक घ्यायची ठरल्यास आज त्याची घोषणा विधानसभेत केली जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची, अर्जाची छाननी, अर्ज मागे घेण्याची मुदत आदी तांत्रिक बाबींची पूर्तता करून उद्या निवडणूक घेतली जाईल.

Continue reading

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...
Skip to content