शिवसेना कोल्हापूरमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत असून, काही समाजकंटक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर करण्याचा आणि अहमदनगरचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर करण्याचा निर्णय घेतला. मुघलांचे उदात्तीकरण या सरकारने थांबवायचे कार्य केले. त्यामुळे काही मुघलवादी लोकांना हे पटलेले आणि पचलेलेसुद्धा नाही. सगळ्या जातीधर्माच्या महाराष्ट्रवादी जनतेने या निर्णयाचं स्वागत केलं. पण मुघलवादी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी जनसामान्यांच्या भावना दुखावण्याचे काम करत आहेत. अशा समाजकंटकांवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते आमदार किरण पावसकर यांनी एका पत्रकार परिषदेत केली.
काही राजकीय पक्ष आपली संस्कृती आणि निष्ठेला विसरून औरंगजेबप्रेमी असामाजिक तत्वांची भाषा बोलत आहेत. हे असं राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील जनता खपवून घेणार नाही. काही राजकीय पक्ष या समाजकंटकांना छुपा पाठिंबा देतात. ते सहन केलं जाणार नाही. अशा कृतींना पाठिंबा देणं या पक्षांनी थांबवावं, असा इशारा त्यांनी दिला.
कायदा सुव्यवस्था जपणं हे सामान्य नागरिकांचं कर्तव्य आहे. महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्या हिताचे निर्णय सगळ्यांनी शांतपणे स्वीकारायला हवेत. सगळ्या शिवसैनिकांना आमचं आवाहन आहे की कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी त्यांनी सगळ्या जनतेला प्रोत्साहित करावं. काही लोकांना 350वा राज्यभिषेक सोहळा मान्य नाही. आमचा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव गटाला सवाल आहे की तुम्ही औरंगजेबासोबत आहात की महाराष्ट्र राज्यातील जनतेसोबत?, असा सवालही त्यांनी केला.

