Homeमाय व्हॉईसऐसे कैसे साधू...

ऐसे कैसे साधू झाले? भगवी वस्त्रे म्हणजे साधू का??

ऐसे कैसे साधू झाले? भगवी वस्त्रे म्हणजे साधू का?? खरेतर पालघर आणि सिल्व्हासाच्या सीमा रेषेवरील गडचंचली गावात अलीकडेच घडलेल्या दोन साधू व चालकाच्या हत्त्येप्रकरणी पुन्हा लिहायची इच्छा नव्हती. प्रथमच स्पष्ट करतो की, त्या तिन्ही हत्त्येचा निषेध मी पूर्वीच केला आहे. या तिन्ही मृत्यूबाबत दुःखच आहे. वास्तविक सीआईडी चौकशीची घोषणा झाल्यानंतर जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत तरी या दुर्दैवी घटनेचे राजकारण करावयास नको होते. परंतु माध्यमांना कोण सांगणार? त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राखून अन्य काहीजणही  तेच स्वातंत्र्य घेऊ शकतात, याची नम्रपणे आठवण करून देतो व सुरुवात करतो. प्रथमच सर्व मृतांना आदरांजली व्यक्त करतो आणि एका नवीन अध्यायाला हाथ घालतो…

”जाती न पुछो साधुकी, पुछ लिजीए द्यान, मोल करो तरवार का, पडा रहने दो म्यान” या कबीर पंक्तीनुसार नाशिक येथील त्र्यम्बकेश्वरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे कल्पवृक्ष गिरीमहाराज यांच्यासंबंधी काही प्रश्न उपस्थित करू इच्छितो. खरेतर माणूस मरण पावला की काही विचारू नये असे सर्वमान्य संकेत आहेत. हे संकेत शक्यतो पाळले जातात. परंतु गेल्या काही दिवसांत आडवाटेला घडलेल्या या घटनेचे राजकारण करण्याचा विडा काहींनी उचलला असल्याचे कळल्यानंतर ‘जरा पांढऱ्यावरती काळे’ करायचा विचार पक्का झाला. तर हे कल्पवृक्ष गिरीमहाराज राहणार नाशिकच्या त्रंबकेश्वर येथे. पार टेकडीलगत असलेल्या दक्षिणमुखी मंदिरात. तसा त्यांचा उदय गेल्या 10/15 वर्षांतील. या मंदिरात ते पुजारी म्हणून दाखल झाले. हळूहळू मंदिर आणि आजूबाजूच्या ओसाड जमिनीवर त्यांनी हाथपाय पसरायला सुरुवात केली. सुमारे एक, सव्वा एकर जमीन मांडीखाली घेतली. तेथे काही प्रमाणात हिरवळही निर्माण केली. हे पुजारी होते तरी त्यांनी क्रोध काही हनुमानाच्या चरणी ठेवलेला नव्हता. उठसूठ रागे भरणे हा तर त्यांच्या हाथाचा ‘मळ’ होता. ते कधीकधी क्षुब्ध की कायसे होत असत, असे त्यांना ओळखणारे आता खासगीत सांगतात. अर्थातच चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून!

या उठसूठ रागे भरण्याच्या स्वभावामुळे वेशीबाहेर राहणारे नागा साधू आणि आपल्या या महाराजांचे कधी पटलेच नाही. डोक्यात राख घालण्याच्या स्वभावामुळे हे महाराज बाकीच्या नागा साधूंना साधू मानतच नव्हते. जणू त्यांचा सवतासुभाच होता ना! वेशीबाहेर राहणारे नागा साधू आणि आपले महाराज यांच्यात एकच समान गुण होता तो म्हणजे ‘गांजा’ ओढणे! पण आपले हे महाराज मंदिराच्या परिसरातच चिलीमीतून धूर काढत असत. हा धूर अर्थातच गांजामिश्रित असे, हे मी सांगायला हवे असे नाही. आपले हे महाराज दिसायला तसे रुबाबदार होते. बराचसा गौर वर्ण म्हणजे गोरे. हो.. उंचीही बऱ्यापैकी होती. परंतु बाकीची ‘करणी’ मात्र काही खरी नव्हती. ते काळी जादू करत असत अशी कुजबुज मंदिर परिसरात होती. म्हणूनच ते मित्र परिवारात ”चिकना अघोरी” म्हणून नावारूपास आले होते.

त्यांच्या शब्दाला वजन होते. काही भक्तांच्या मते ते कनवाळू व दयाळूही होते. एक गुण होता तो म्हणजे आजूबाजूच्या जमिनीवर ते कोणालाही पाय रोवू देत नसत. आजूबाजूच्या ओसाड जमिनीवर गावातील काही चिल्लर बिल्डरनी आपले बोर्ड लावायचा प्रयत्न केला असता महाराजांनी त्याला कडाडून विरोध केला होता. गंमत पाहा. महाराजांनी जशी जमीन बळकावली होती तशीच आजूबाजूची सुमारे तीन-चार एकर जमीन या बिल्डर्सनी ताब्यात घेतली होती. त्यांच्याकडे खरेदीपत्रही होते. वास्तविक या मंदिराच्या परिसरातील सर्व जमीन ‘वतना’ची जमीन आहे. ती तशी विकता येत नाही आणि समजा सरकारने ती कोणाला दिली तरी नावावर होण्यासाठी अर्धे आयुष्य जाते. मग या बिल्डर्सनी ही जमीन घेतलीच कशी? असा मूलभूत प्रश्न निर्माण होतो.

या टेकडी परिसरात अनेकांनी असे बेकायदा फलक लावलेले आहेत. यात सर्व पक्षांचे लोक आहेत. आपले महाराज येथे नाचणीचे पीक घेत असत. त्या दुर्दैवी दिवशी आपले महाराज, त्यांचे मित्र सुशील गिरी व चालक मुंबईतल्या कांदिवलीहून सिल्व्हासापर्यंत महामार्गाने गेलेच कसे? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. कासा पोलीसठाण्यावर जशी कारवाई झाली तशीच कारवाई महामार्गावरील पोलीस व कांदिवली पोलिसांवरही होणे गरजेचे आहे. सिल्व्हासावरून मागे फिरल्यानंतर आपले दोन्ही महाराज आडवाटेला गेले. हाथी आलेल्या माहितीनुसार त्यांनी संध्याकाळच्या सुमारास नाशिकजवळील एका नाक्यावरून नाशिकला काही मित्रांना फोन केल्याचे कळते. परंतु तेथेही त्यांना मज्जाव करण्यात आला. पुन्हा ते मागे फिरले. गाडीचा वेग वाढवला. यातच त्यांचा घात झाला. सर्वत्र संचारबंदी असताना पाड्यावरील आदिवासी पाहऱ्यावर जमा होत असतात. या जमावानेच त्यांना घेरले आणि त्यांचा घात झाला.

”बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे,

तयांची वचने प्रमाण, मानिती जन”

ही सर्वमान्य साधूंची लक्षणे तेथे होती की नव्हती हे कसे सांगता येईल? हे जरी खरे असले तरी हे भगवे वस्त्रधारी पुरुष पारंपरिक साधू नव्हते हे मात्र कळले आहे.

”तनको जोगी सब करे, मनको बिरला कोई,

सब सिद्धी सहजे पायी, जे मन जोगी होई”

असे कबिरजींनीच सांगितले आहे. आपण कोण अधिक बोलणार?

तीन वर्षांपूर्वी वसई – सिल्व्हासा परिसरात झालेल्या साधूंचे हत्त्याप्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा यापूर्वीच झालेली असली तरी अलीकडेच सीबीआयने संबंधित कागदपत्रे हाती घेतली असल्याचे वृत्त आहे. सीबीआयने याप्रकरणी त्वरित चौकशी करुन अहवाल द्यावा व आरोपींना शिक्षा व्हावी, असे मनापासून वाटत आहे. शिवाय नाशिकच्या या साधू मंडळींकडे नशिकची इतकी जमीन आली कशी, याचाही शोध घेणे जरुरीचे आहे. हत्त्येशी याचा काही संबंध नाही असे सांगितले जाईल. मात्र सर्व धन, मन आणि तन देवाजींच्या चरणी अर्पण केल्यानंतर इतकी जमीन त्यांना हवीच कशाला? ते नेमके कुठून आले, आधार कार्डवरील पत्त्यावर ते कधी सापडले होते का? या किंवा यासारख्या अनेक प्रश्नांची चौकशी झाली तरच या हत्त्येचे गूढ उकलेल. अन्यथा राजकीय ‘राळ’ उठवण्यासाठीच ही चौकशी केली जात आहे असे पक्के मत जनमानसात ठासेल!!

Continue reading

माध्यमांना ठाकरेंच्या शिवसेनेचे का बरे वावडे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली...

‘केइएम’मध्ये मदत कक्षालाच हवी मदत! तपासायला डॉक्टर मिळाला तर उत्तमच!!

मुंबई महापालिकेच्या प्रमुख समजल्या जाणाऱ्या केइएम रुग्णालयात डॉक्टरांसहित कर्मचारी-कामगारांमध्ये सुमारे २० टक्के इतकी मोठी कपात करण्यात आली असून मोडकळीस आलेले स्ट्रेचर्स वगैरे सामान गोदमात ढकलून देण्यासाठीही कामगार नसल्याची संतापजनक माहिती हाती आली आहे. अपघात विभागातील डॉक्टरांची संख्या तर एक-दोन...

मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड अंमली पदार्थांच्या फॅक्टरीमागे?

मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी दिल्यानंतर एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत आहे की, या अमली पदार्थांच्या व्यापार व कारखान्यांमागे मुंबईत...
Skip to content