Homeमुंबई स्पेशल२३ एप्रिलपासून मुंबईतील...

२३ एप्रिलपासून मुंबईतील पाणीकपात रद्द!

मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने नियोजित ३० दिवसांऐवजी अवघ्या १८ दिवसांत पूर्ण केले आहे. हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरुन कार्यान्वित करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार, दिनांक २३ एप्रिल २०२३पासून मुंबई महानगराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे. परिणामी मुंबईतल्या पाणीपुरवठ्यात करण्यात आलेली १५ टक्के पाणीकपात रद्द होणार आहे.

भांडूप संकुल येथील जलशुध्दीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. या जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे (बोअरवेल) खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. ही गळती दुरुस्तीसाठी सदर जलबोगदा दिनांक ३१ मार्च २०२३पासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रात दिनांक ३१ मार्च २०२३पासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्‍तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवसांसाठी १५ टक्‍के कपात जाहीर करण्यात आली होती.

हा जलबोगदा जमिनीपासून सुमारे १०० ते १२५ मीटर खोलवर आहे. हानी पोहोचल्याचे ठिकाण भांडुप संकुल झडप (शाफ्ट) पासून सुमारे ४.२ किलोमीटर अंतरावर होते. सुमारे १२५ मीटर खोल व ४.२ किलोमीटर लांब आतमध्ये शिरुन जलबोगद्याची दुरुस्ती करणे, हे जल अभियंता विभाग आणि पाणीपुरवठा प्रकल्प विभागासमोर जणू आव्हानच होते. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी प्रत्‍यक्ष भेट देत बोगदा दुरुस्ती ठिकाण, दोन्ही झडपांची पाहणी केली. उपायुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्‍प) वसंत गायकवाड, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुधाकर हांडे, सहायक अभियंता शेखर शिंदे, अभियंता (दुय्यम) राहुल चव्हाण यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष दुरुस्ती ठिकाणी अथक प्रयत्न केले आणि अखेर काल (दिनांक १८ एप्रिल २०२३) या जलबोगदा दुरूस्तीचे काम पूर्ण झाले. अंदाजे ३० दिवसांचा कालावधी दुरुस्तीकरीता अपेक्षित असताना प्रत्यक्ष १८ दिवसांमध्येच ही दुरुस्ती पूर्ण करण्यात आली.

असे पूर्ण झाले काम-

जलबोगदा दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी जल अभियंता खात्याने, पर्यायी जुन्या जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुलापर्यंत पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली आणि जलबोगदा बंद करुन त्यातील पाणी उपसण्यात आले. जलवाहिन्या व जल बोगद्यावरील झडपांचे नियंत्रण तातडीने केले. एकूण झडपांपैकी सर्वात मोठ्या ३ हजार ७५० मिलीमीटर व्यासाच्या झडपेचे यशस्वीरित्या नियंत्रण केले. प्रत्यक्ष दुरुस्ती काम दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी सुरू झाले. दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ इत्यादी सर्व गोष्टींची सुसज्जता राखली गेली.

यानंतर, भांडुप व कापूरबावडी येथील झडपेचे (शाफ्ट) पोलादी घूमट (डोम) कापून क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आले. क्रेन व पोलादी पाळण्याच्या सहाय्याने संपूर्ण जल बोगद्याचे निरीक्षण करण्यात आले. भगदाड पडून हानी पोहोचलेल्या ठिकाणी आतमध्ये पॅकर टाकून विशिष्ट अशा ग्राऊटिंगने पाणी गळती बंद करण्‍यात आली. आतील दुरुस्ती पॅकर व पोलादी प्लेटच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली. त्यानंतर वागळे इस्टेट येथील १०० मीटर खोलीच्या कुपनलिकेमध्ये विशिष्ट प्रकारचे सिमेंट व वाळू यांचे मिश्रण टाकून ते बंद करण्यात आले. बोगद्यातील संपूर्ण उभी केलेली यंत्रणा पुन्हा बाहेर काढण्यात आली. यानंतर कापुरबावडी व भांडूप संकुल येथील पोलादी घुमट (डोम) वेल्डींगच्या सहाय्याने पुन्हा बंद करण्यात आले.

पाणी

येत्या ३ ते ४ दिवसांत मुंबईतील पाणीपुरवठा पूर्ववत-

दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर आता हा जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यापूर्वी पाण्याने भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जल अभियंता विभागातर्फे आज दिनांक १९ एप्रिल २०२३पासून आवश्यक त्या झडपांच्‍या प्रचलनास तातडीने सुरूवात करण्यात येणार आहे. जलबोगदा पाण्याने भरून घेण्यासाठी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. असे असले तरी, या अतिरिक्त पाण्याची पूर्तता करताना सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याचीदेखील प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करुन जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. या सर्व बाबी विचारात घेता, मुंबई महानगराचा पाणीपुरवठा रविवार, दिनांक २३ एप्रिल २०२३पासून पूर्ववत होणे अपेक्षित आहे, असे जल अभियंता विभागाने कळविले आहे.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content