Homeमाय व्हॉईसआझाद सर्वकाही उघडणार...

आझाद सर्वकाही उघडणार की फक्त हवा?

दहा दिवसांपूर्वी काँग्रसचे भूतपूर्व नेते गुलाम नबी आझाद यांचे ‘आझाद’ या नावाचे आत्मवृत्त प्रकाशित झाले. रूपा या प्रसिद्ध कंपनीने ते प्रकाशित केले आहे. या प्रकाशनाचे समारंभ दिल्ली आणि मुंबईत झाले. इतर मोठया शहरांतही ते होण्याची शक्यता आहे. गुलाम नबी आझाद हे काँगेस पक्षातील एक बडे प्रस्थ होते. काँगेसमध्येच त्यांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत विविध पदांवर कामे तर केली होतीच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते गांधी परिवाराच्या अत्यंत जवळचे होते. आझाद, या पुस्तकावर सविस्तर लिहिणार आहेच. पण, ३०३ पानांच्या पुस्तकाला हाती घेताच काही प्रतिक्रिया उमटल्या. त्या व्यक्त करण्याशिवाय राहवत नाही म्हणून हा प्रपंच…

२०२२मध्ये राज्यसभेचे तिकीट नाकारल्यानंतर काही दिवसातच गुलाम नबी यांनी काँगेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये एका प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. गेल्या चार-पाच वर्षांपासून काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्त्व विशेषत: राहुल गांधी यांच्याशी त्यांचे शीतयुद्ध सुरू होते. आता तर प्रत्येक मुलाखतीत गुलाम नबी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. परंतु ज्या पक्षाने गुलाम नबी यांना गेल्या पन्नास वर्षांत ज्या उंचीवर पोहोचवले त्या पक्षातून बाहेर पडल्यावर त्या पक्षावर टीका जरुर करावी. परंतु मनात कद्रूपणा नसावा, असे वाटते.

आझाद

ज्या राजकीय पक्षाच्या किचन कॅबिनेटमध्ये स्थान मिळवलेल्या गुलाम नबी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला आपल्या पुस्तकाच्या ब्लर्गवर प्रतिक्रिया छापण्यासाठी एखादा तगडा काँग्रेस नेता मिळू नये यापरते दुर्दैव ते काय असणार? या ब्लर्गवर हरिवंश (उपाध्यक्ष), पियूष गोयल (केंद्रीय मंत्री), कपिल सिब्बल (समाजवादी पक्ष), भूपिंदर यादव (केंद्रीय मंत्री), डेरेक ओब्रियन (तृणमूल काँग्रेस) आणि तिरूची शिवा (द्रमुक) हेच नेते मिळाले. यात नजर मारली तरी भाजपचे नेते जास्त असल्याचे दिसते. कुणाच्या प्रतिक्रिया घ्यायच्या वा न घ्यायच्या हा त्यांचा अधिकार मान्य केला तरी काँग्रेसचा एकही नेता नाही, हे कुठेतरी खटकतेच!

या ब्लर्गमध्ये काँग्रेस का नाही याचे उत्तर गुलाम नबीच देऊ शकतात. दुसरा मनात विचार आला की काँगेस नेत्यांनाच अडचणीचे ठरू नये म्हणून गुलाम यांनीच त्यांना टाळले असावे.  दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आझाद यांचा प्रादेशिक पक्ष आपले उमेदवार उभे करणार हे नक्कीच आणि समजा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यास आझाद भाजपशी हातमिळवणी करू शकतात, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. आझाद यांच्याबाबत कुतूहल इतक्यासाठीच की ते इतकी वर्षे गांधी परिवाराच्या निकटवर्तीय म्हणून गणले जात असत. तसेच त्यांनी आपल्या महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवली होती व जिंकूनही आले होते (वाशिम लोकसभा मतदारसंघ) तेव्हाही त्यांना वाशिम येथून तिकीट दिल्यावरून नागपूरच्या काँग्रेस नेत्यांतही नाराजी होती. परंतु पक्षश्रेष्ठीपुढे या नेत्यांचे काहीच चालले नव्हते. इतके मात्र खरे हे ‘आझाद’ काय काय खुले करुन दाखवते यावरच या पुस्तकाचे यश अवलंबून राहील. हातचे राखून सांगतायत की त्यांना काही सांगायचंच नाही. फक्त हवा निर्माण करायची आहे… ते लवकरच कळेल!

Continue reading

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...

ठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये आहे ५० घमेली धूळ!

ठाणे शहरात संपूर्ण लोकमान्य नगर अगदी जुन्या बस डेपोपासून तो नव्या बस डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या दुचाक्या व रिक्षा यांना चकवत नागरिक कसे चालत असतील याचा विचारच न केलेला बरा. लोकमान्य नगरात तर एका ठिकाणी...
Skip to content