Homeमाय व्हॉईसमुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला नवी...

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला नवी ओळख मिळणार?

प्रथमच स्पष्ट करू इच्छितो की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी ‘ठाणे शहर बदलण्याबाबत केलेल्या’ घोषणेचे ठाणेकर म्हणून मी अभिनंदन आणि स्वागत करत आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिंदेजी दोन दिवसांपूर्वीच ठाण्यात, ठाणे महापालिका मुख्यालयात आले होते. ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानाचा त्यांनी शुभारंभ केला. सोबत अर्थातच ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर होते. आयुक्तांनीही आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच बरीच धावपळ सुरू केली आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांना पळविण्यात ते माहिर आहेत. ज्या वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यालय तसेच प्रभाग कार्यालये सोडली नव्हती, ही सर्व मंडळी हल्ली प्रभागनिहाय भेटींसाठी आपली कार्यालये सोडून चक्क साईटवर जाताना दिसत आहेत (या नेहमीच्या साईट भेटी नाहीत.). १५/ २० अधिकाऱ्यांनी पदोन्नती झाल्यानंतर क्वचितच मुख्यालय सोडले असेल, असे मुख्यालयाचा कानोसा घेतला असता समजले. हे सर्व किस्से पुन्हा कधीतरी तपशिलासह आणि काहीसे तडका मारून मनोहारीही! आज मात्र केवळ मुख्यमंत्री आणि त्यांची घोषणा!!

आमच्या दृष्टीने ठाणे शहरासाठी वेगळे अभियान सुरू झाले हीच मोठी गोष्ट आहे. ठाणे आणि विस्तारीत ठाणे शहरापासून राज्याला नेहमीच उत्तम महसूल मिळत आलेला आहे. परंतु विकासनिधीबाबत मात्र ठाणे शहरावर नेहमीच अन्याय होत आला आहे. गेली सुमारे ३० वर्षे मुख्यमंत्री एकनाथराव हेच जरी ठाण्याचे चालकानुवर्ती होते तरीही आता मुख्यमंत्रीपदावर आरूढ असल्याने त्यांचा घोषणांना वजन प्राप्त झाले आहे. ठाणे शहराची प्रमुख समस्या म्हणजे रस्त्यांवरील खड्डे आणि प्रचंड वाहतूककोंडी…. कचरा आणि पिण्याचे पाणी याही समस्या हात जोडून उभ्या आहेतच.

कचऱ्याबाबत आयुक्त बांगर यांनी काही पावले उचलली आहेत. पण ती अपुरी आहेत. आपल्या प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांनी प्रभागाची पाहणी करणे बंधनकारक करण्याची वेळ आलेली आहे. मुख्य रस्त्यांवरील कचरा गायब झाला असेलही परंतु आतील रस्ते आणि सेवा रस्त्यांवरील कचऱ्याचे ढीग अजुनही दिसतात. ठाणे शहरात मेट्रो रेल्वेचे कामही सुरू आहे. जागोजागी मोठे रस्ते या कामासाठी खोदून ठेवलेले दिसतात. काही ठिकाणी बाजूचे पत्रे काढून टाकले आहेत. परंतु अनेक ठिकाणी ते अजुन तेथेच असल्याने (पत्रे) रस्ता अडून गेलेला आहे.

ठाण्या

ठाणे शहरात चांगल्या रस्त्यांना प्राधान्य मिळणार असल्याने समाधानच आहे. परंतु चांगले रस्ते काही आकाशातून खाली पडत नाहीत. येथील कंत्राटदार आणि पालिकेचे अभियंतेच ही कामे करत असतात. गोकुळ नगर येथील उड्डाणपुलाला जेमतेम दोन वर्षं झाली असतील नसतील, पण सर्व उड्डाणपूल खरवडून काढावा लागलाच ना? कुठल्या अभियांत्याविरूध्द आणि कंत्राटदाराविरूध्द करवाई झाली हेही अजुन जाहीर करण्यात आलेले नाही. दंड आकारला असे सांगण्यात येते, पण रक्कम मात्र सांगितली जात नाही. यात काही गोम आहे का?

आता रस्तापुराण चालू आहे तर माजिवडा चौक कधी चांगला होणार? तो करायचा झाला तर वाहतूक नियंत्रण कसे करणार? याचे आराखडे तयार आहेत का? कारण मुख्यमंत्र्यांनीच सहा महिन्यांचे टार्गेट दिलेले आहे. घाईगर्दीत कामे करायची गरज नाही तसेच ही कामे रेंगाळूही नयेत. “All cities are mad but the madness is gallant. All cities are beautiful, but beautiful is grim” असे निराशेने म्हणण्याची वेळ अनेक शहरांबाबत येते. अशी वेळ येथे येऊ नये असे वाटते. काही खर्चाचे आकडेही जाहीर केले गेले आहेत. या आकड्यांत काही खरे नसते. ते सारखे वाढतच असतात.

“ना शेंडा ना बुडूख अशा गावात

खोडांना पालवीची आकांक्षा आहे

या घरच्या न घाटच्या पक्ष्यांना

सूर्यबिंब चुंबिल्याचा भ्रम आहे

या इकडच्या ना तिकडच्या लोट्यांना

आपण पूजापात्र असल्याची खात्री आहे” (नारायण कुळकर्णी)

या काव्यपंक्तींप्रमाणे जनतेचा भ्रमनिरास न होवो हीच सदिच्छा. कारण, मुंबई-ठाणे परिसराकरीता आतापर्यंत किमान ५०/६० योजना तरी जाहीर झालेल्या असतील. या सर्व योजनांची नगारे वाजवून वर्दी देण्यात आली होती. काही योजना अजुनही सरपटत आहेत तर अनेक योजनांनी आता जीव टाकला आहे. या घोषणांसाठी राजकीय नेत्यांना दोषी धरता येत नाही. कारण नोकरशहांच्या सल्ल्यानुसारच या घोषणा केल्या जातात तसेच त्यांच्या पाठपुराव्याअभावी अनेक योजनांचा गर्भातच मृत्यू होतो हे लक्षात घेतले पाहिजे. ‘बदलते ठाणे शहर’ अभियानाबाबत हे होऊ नये ही अपेक्षा!!

Continue reading

येथे प्रत्येक छायाचित्र बोलते…

"For me the subject of the picture is always important than the picture" हा सुविचार दिवंगत छायाचित्रकार रजनीश काकडे यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनात प्रकर्षाने जाणवत होता. रजनीशला आदरांजली वाहण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या...

‘एशियाटीक’ची निवडणूक जूनमध्ये तरी होणार? दोन्ही बाजूंच्या सदस्यांत घुसखोर!

मुंबईतल्या एशियाटीक लायब्ररी, या प्रतिष्ठित संस्थेची निवडणूक 'घुसखोर' सदस्यांशिवाय जून महिन्यात घेण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला असला तरी ती जूनमध्येच होईल की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. कारण नव्याने निवडल्या जाणाऱ्या कार्यकारिणीची मुदत केवळ सप्टेंबर...

ठाणे पालिकेच्या बेसमेंटमध्ये आहे ५० घमेली धूळ!

ठाणे शहरात संपूर्ण लोकमान्य नगर अगदी जुन्या बस डेपोपासून तो नव्या बस डेपोपर्यंत फेरफटका मारला असता रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेल्या दुचाक्या व रिक्षा यांना चकवत नागरिक कसे चालत असतील याचा विचारच न केलेला बरा. लोकमान्य नगरात तर एका ठिकाणी...
Skip to content