Homeमाय व्हॉईसमुख्यमंत्री महोदय, त्या...

मुख्यमंत्री महोदय, त्या चिठ्ठ्याचपाट्या एकदा उघडाच!!

नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एक चित्र आपण रोज पाहत होतो. महाविकास आघाडीचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. खरं तर यात कुणाचीही बाजू घेण्याचा प्रश्न नाही. सुमारे वीस-पंचवीस वर्षांपासून आपल्या देशातील लोकसभा आणि विधानसभाऺमध्ये सातत्याने असेच चालले आहे. कधी काँगेसप्रणित आघाडी गोंधळ घालते तर कधी भाजपप्रणित राष्ट्रीय आघाडी त्याला प्रत्युत्तर म्हणून जोरदार गोंधळ घालते. हाच प्रकार राज्यातील विधिमंडळात चालत असतो.

दररोज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून विरोधक झिंदाबाद-मुर्दाबाद करत असतील तर ते कुठल्याही मुख्यमंत्र्याला आवडणार नाही. यावर तोडगा म्हणून मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन विरोधकांशी सवांद साधायला हवा होता. पण सध्या कुणीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने मुख्यमंत्री शिंदे या मार्गाने गेले नसावेत. दररोजचा गोंधळ कोणालाही आवडणार नाही हे खरे असले तरी मुख्यमंत्र्यांनी त्रागा करायला नको होता, असे सुचवावेसे वाटते.

या त्राग्याततच मुख्यमंत्र्यांनी तुमच्याही चिठ्या माझ्याकडे आहेत, उगाच गमजा मारू नका, असे म्हणावयास नको होते. टोकाला जाणे मुख्यमंत्र्यांच्या स्वभावात बसत नाही. पण त्रागा झाला की माणूस काहीही करतो याचेच हे उदाहरण असावे… 

“भिंतीना कान असतात

घरंदाज घरांच्यादेखील;

म्हणून मित्रा, सर्व गुपिते

रस्त्यावरच सोडवावित

रस्ते किती मोकळे असतात! 

तरीही नि:शब्द इकडचा शब्द

तिकडे जाऊ देणार नाहीत” (धामणकर)

असे असतानाही मी गुपिते फोडीन, असा धमकीवजा इशाराच मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

मंत्रीपदी असताना सर्वच पक्षातील आमदार आपली छोटी-मोठी कामे घेवून मंत्र्यांकडे येत असतात त्यात वावगेही काही नाही. ज्याप्रमाणे शिवसेनेतून बंड करून बाहेर पडतानाही आमची कामे होत नव्हती, निधी मिळत नव्हता, अशी कारणे देण्यात आली होती. न झालेली कामे कुठली हे एकदा जाहीर झाले पाहिजे. आता मी म्हणतो की शिंदेसाहेब त्या चिठ्या-चपाट्या एकदा उघड करुन टाकाच. कारण, आमचे लोकप्रतिनिधी मंत्र्यांकडे काय-काय मागतात हे जनतेला तरी कळू द्या हो!!

राज्यघटनेनुसार आमदारांचे काम विधिमंडळात बसून चर्चा करून राज्यासमोरील प्रश्न सोडवण्यास मदत करावी असे आहे. परंतु गेली अनेक वर्षे अंदाजपत्रक सादर केले जात असतानाच काही प्रमाणात आमदार शांत राहतात. हल्ली तेसुध्धा पाहणे नशिबी नाही. समाजाला उपयोगी पडणारी कोणती कामे आमदार चिठ्ठी लिहून मंत्र्यांकडे पाठवतात, हाही कुतुहलाचा प्रश्न आहे. अनेक आमदार बदल्या, शाळा, महाविद्यालय, साखर कारखाना, कुणाला एखाद्या कामाचे कंत्राट मिळावे, कुणावर शिस्तभंगाची करवाई होत असेल तर ती थांबावी म्हणून रदबदली, पोलीस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग, असे काय-काय सांगतात हे जनतेला एकदा कळू तर दे!

शिंदेसाहेब आपणही साधे आमदार होतात. तेव्हा आपणही काही चिठ्ठ्या मंत्र्यांकडे पाठवल्या असतीलच. आता तुम्ही जर त्यांच्या चिठ्ठ्या बाहेर काढल्यात तर ही मंडळी तुमच्याही चिठ्ठ्या बाहेर काढणारच. म्हणजे बरेच होईल. त्यातून जनतेला दोन्ही बाजूंचे आमदार काय लिहितात ते तरी समजेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री भावूक झाले असे लिहून आले आहे…

“अस्मानी जाईल 

तर सुलतानी खाईल

तहसिलीतून सुटशिल

तर कोर्टात अडकशिल

जनवरानं सोडलं

तर माणसं फाडतील

टाकांच्या निफानी

तुझी कणसं खुडतील

ढोरांच्या गळ्यात गळा घाल

अन् मनसोक्त रडून घे

तुझ्या पाठीवर चित्र

कोणाकोणाच्या बुटाचं आहे

त्यांनाच विचारून घे..” (कवठेकर)

अशी शेतकऱ्यांची दारुण अवस्था असताना मुख्यमंत्रीसाहेब तुम्हाला चिठ्ठ्या आठवाव्यात याचे मनस्वी दुःख झाले. म्हणूनच आम्ही जनतेच्या वतीने मागणी करत आहोत की त्या चिठ्ठ्या उघड कराच. आम्हाला तरी कळू दे आमच्या आमदारांचा कल्पनाविलास… कुठली कामे आहेत की शैक्षणिक संकुल हवंय… की एसपीला मनपसंत पोस्टिंग?

“विकत घेण्याचे सामर्थ्य जाणतो पुरुष सिंह

तीही त्याच्या पोलादी पंजाची तरबेज ताकद”

असेच जर असेल तर शेकड्यांनी चिठ्ठ्या उघड करून सामान्य जनतेला काय मिळणार?

Continue reading

शिवसेनाप्रमुखांची अटक हे पोलीस कर्तव्याचे फलित! संबंध मधुरच!!

पोलीस आयुक्त नियम आणि कायद्याच्या चौकटीतच काम करत असतो, नव्हे त्याला तसे करावेच लागते. म्हणूनच सत्तारूढ राजकीय नेत्यांनी 'आवडता-नावडता' अधिकारी असे शिक्के कुणावरही मारू नयेत, अशी स्पष्टोक्ती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम. एन. सिंग यांनी येथे केली. ज्येष्ठ पत्रकार...

दिल्ली पोलिसांचे आता ‘बेटी जरा धीरे से’…

अहो, ऐकलं का, दिल्ली पोलीस म्हणे त्यांची 'प्रतिमा' बदलणार! दरवेळेस 'पिछवाडा' काढणारे आता नमस्ते जी.. बोलणार. हे वाचून चकित झालात ना? आम्ही तर थेट चक्रावूनच गेलो. खरंतर विश्वासच बसेना. इतकी वर्षे 'पिछवाडा', 'मादxxx', 'घुसा देंगे', 'दादीके मय्यतमे नहीं आये...

हेतूपुरस्सर धूळ खात पडलेल्या मिडी बसेस आणा आधी मुंबईच्या रस्त्यांवर!

मुंबई महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नुकताच 'लोकसवांद'मध्ये प्रथमच विस्तृत संवाद साधत पालिका प्रशासनासमोरील काही आव्हाने व भविष्यातील मोठ्या प्रकल्पांबाबत चर्चा केली. एखाद्या मोठ्या महानगरीचे व्यवस्थापन करणे तसे जिकरीचेच आणि आव्हानत्मक असते यात शंकाच नाही....
Skip to content