Homeमुंबई स्पेशलमुंबईत होणार २५...

मुंबईत होणार २५ हजार वृक्षांची लागवड!

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून  मुंबई महापालिकेच्या २४ विभागांतील १०६८ भूखंडावरील २२९ उद्याने, ४३२ मैदाने, ३१८ मनोरंजन मैदाने तसेच इतर ८९ ठिकाणी (मियावाकी पद्धत वगळून)  एकूण २५  हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज जाहीर केले.

दरवर्षी ५ जून हा दिवस संपूर्ण जगात पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भायखळा  येथील महापौर निवासस्थानी आज वृक्षारोपण करण्यात आले.  याप्रसंगी  उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या.

मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने मुंबईतील हरीत क्षेत्र वाढविण्यासाठी मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण सुरू केले आहे. मियावाकी पद्धतीने ३ लाख ६४ हजार ८१६ इतकी झाडे लावण्याचे प्रस्तावित असून त्यापैकी आजपर्यंत २ लाख २१ हजार ४०५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले  असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात २०१९च्या वृक्षगणनेनुसार एकूण २९ लाख, ७५ हजार २८३ वृक्ष अस्तित्त्वात  आहेत. त्यापैकी रस्त्यालगतची १ लाख ८५ हजार ३३३ झाडे आणि उद्यानातील १ लाख १ हजार ६७ झाडे आहे, असेही महापौर पेडणेकर म्हणाल्या.

मुंबई देणार देशी वाणांचे वृक्ष लावण्यावर भर!

जमिनीमध्ये खोलवर मुळं घट्ट पकडून ठेवणाऱ्या देशी वाणांचे वृक्ष मुंबईमध्ये लावण्यावर यावर्षी अधिक भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

झाडे, पशुपक्षी ही नैसर्गिक साखळी असून ही साखळी टिकून  ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांचे रोपण होणे आवश्यक आहे. रस्त्याच्या फुटपाथवर झाडे न लावता महापालिका कार्यक्षेत्रातील मोकळी मैदाने व टेकड्या याठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

मुंबईसारख्या अधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये वाढत्या शहरी प्रदूषणामुळे विविध प्रकारच्या जीवघेण्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये  पर्यावरणस्नेही  वातावरण निर्मिती करणे, वृक्षारोपण जतन व संवर्धनाचे काम महापालिकेच्या उद्यान खात्यामार्फत करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.

अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनीही यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आजपासून महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ झाला असून गतवर्षीप्रमाणे या वर्षीही २५ हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चक्रीवादळामुळे विभागनिहाय वृक्षांच्या झालेल्या हानीची नोंद घेऊन या ठिकाणी देशी वाणांचे वृक्ष यावर्षी मोठ्या प्रमाणात लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे वृक्षारोपणाचा संपूर्ण कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्यापद्धतीने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रारंभी, महापौर किशोरी पेडणेकर व अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते सोनचाफा व सीता अशोक या वृक्षांचे रोपण करण्यात आले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content