Homeमाय व्हॉईसकोरोनाच्या धोक्याची तिसरी...

कोरोनाच्या धोक्याची तिसरी घंटा खरंच वाजणार का?

कोरोनाचे संकट कोसळले, त्याला आता दीड वर्ष होत आले आहे. या कळात उठताबसता आपल्याला हाच विषाणू आठवतो, दिसतो. कोरोना हा जणु आपल्या जीवनाचा अविभाज्य भागच बनून गेला आहे. हा विषाणू उपटला व मोठा उत्पात माजवू लागला तेव्हा आधी आपण घाबरून गेलो. सरकारने सांगितले ते ते सारे, लोकांनी न कुरकुरता केले.

घरात बसलो. दरवाजे बंद ठेवले. मास्क वापरायला सुरुवात केली. सारे व्यवहार थंडावले. प्रवास थांबले. मित्र नातलगांच्या भेटी दुरापास्त झाल्या. नंतर कोरोना उणावला. विषाणूचा प्रसार थांबला, असे वाटून जनतेने आणि सरकारे हुश्श केले. सारे व्यवहार सुरू झाले. अगदी पूर्ववत नाही, पण कामधंदे सुरू झाले. नोकरदारांना कार्यालयात पुन्हा जाता येऊ लागले.

आणि अचानक पुन्हा विषाणूचा प्रसार वाढला. ती कोरोनाची दुसरी लाट ठरली. आता पण गेल्या काही आठवड्यांत हळूहळू दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना आपण बघतो आहोत. आपल्याला या विषाणूची भीती व जाणीव दोन्ही अधिकच आहे. कारण देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्य कुठले असेल तर ते आपले महाराष्ट्र आहे. सुरूवात केरळमधून झाली, पण बघताबघता कोरोनाने महाराष्ट्रातच इतकी घट्ट पाळेमुळे रोवली आहेत की आता हा इथून निघायचा कसा? असा प्रश्न पडतो आहे!

सध्या देशातील साडेसातशे जिल्ह्यांपैकी सुमारे साडेपाचशे जिल्ह्यांमध्ये कोरोना बराच उणावला आहे. इथे पॉझिटिव्हिटीचा दर पाच टक्क्यांच्या खाली गेला आहे. रुग्णसंख्याही बऱ्यापैकी कमी झालेली आहे. उरलेल्या सुमारे १६० जिल्ह्यांपैकी ७५ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे आणि उरलेल्या ९५ जिल्ह्यांमध्ये हा दर पाच ते दहा टक्क्यांच्या मध्ये आहे. म्हणजेच भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर देशाच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी भागात सध्या कोरोना थोडा अधिक आहे असे म्हणता येईल. उरललेल्या ९० टक्के क्षेत्रात कोरोना आटोक्यात आहे, अथवा दुसऱ्या लाटेचा जोर संपला आहे असेही म्हणता येईल.

शनिवारी सकाळी हाती आलेलेले आकडे सांगतात की, देशात सध्या कोरोनाचे अक्टिव्ह रुग्ण पाच लाख पंच्याण्णव हजारांच्या खाली आले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी हा आकडा तेरा लाखांच्या पुढे होता. महाराष्ट्राचा क्रमांक मृत्युसंख्येत देशात सर्वात पुढे आहे, तर नवे रुग्ण सापडण्याच्या यादीत आपण दुसरे आहोत. पहिला क्रमांक सध्या केरळ राज्याचा आहे. आपल्याकडे आजही एक लाख वीस हजार अक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोरोना

देशभरातील घटती रुग्णसंख्या व रोजचा मृत्युसंख्येचा आकडाही एक हजारांच्या खाली जाणे ही सारी शुभलक्षणे दिसत असताना आपण पुन्हा तिसऱ्या लाटेची चिंता करत आहोत. ती का, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्याचे प्रमुख कारण आहे ते नव्याने बदललेला विषाणू. कोरोना विषाणू हा सातत्याने स्वतःत बदल करत आहे. कोणताही विषाणू हा त्याच्या विरोधात वापरल्या जणाऱ्या औषधांच्या परिणामांना दाद न देणारी पुढची पीढी तयार करत राहतो. हा सृष्टीचा नियमच आहे. तसा हा कोरोनाचा चौथा व त्याच्या पुढचा पाचवा अवतार सध्या धुमाकूळ घालू शकेल अशी भीती शास्त्रज्ञांनी, तज्ज्ञ वैद्यकांनी व्यक्त केली आहे.

अल्फा म्हणजे प्रथम दिसलेला विषाणू. नंतर बदलला तो झाला क्रमशः बीटा, गॅमा. अलिकडेच त्याचे डेल्टा हे रूप शास्त्रज्ञांना सापडले आणि नंतर त्याच्या पुढची म्हणजे डेल्टा प्लस नावाने ओळखली जाणारी आवृत्ती आल्याचे तज्ज्ञांचे मत बनले आहे. हा डेल्टा प्लस प्रकारचा विषाणू अधिक वेगाने पसरतो, अधिक संख्येने लोकांना ग्रासू शकतो आणि तो औषधांना दाद देत तर नाहीच, पण लसीकरणाचा त्याच्यावर काय परिणाम होतो, म्हणजे लसीकरणानंतर जी प्रतिजैवके लस घेतलेल्यांच्या शरीरात तयार झाली, त्यांच्यावरही हा डेल्टा प्लस मात करू शकले का, अशी भीती तयार झालेली आहे. म्हणून याची धास्ती अधिक.

वाईट म्हणजे देशात डेल्टा प्लसचे चाळीस रुग्ण सापडले. त्यातील एकवीस हे महाराष्ट्रात. रत्नागिरीत डेल्टा प्लस विषाणू असणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. जळगाव, विदर्भ तसेच मुंबईतही त्याचे रुग्ण आहेत. डेल्टा प्लसच शोधण्याची प्रक्रिया किचकट अशी, जेनोमी सिक्वेन्सिंगची आहे. रुग्णाच्या रक्ताचे नमुने वा घशातील स्वॅब घेतल्यानंतर त्यातून सापडलेल्या विषाणूची खरी ओळख पटवणारी गुणसूत्रमांडणी शोधली जाते. त्यासाठी गुंतागुंतीची प्रक्रिया अत्याधुनिक प्रयोगशाळांत करावी लागते. ते काम करणाऱ्या दोन डझन प्रगत प्रयोगशाळा देशात आहेत. त्या सर्वांमध्ये माहितीची देवाणघेवाण सातत्याने केली जाते. आणि त्यामधून हे जेनोमी सिक्वेसिंग पूर्ण करता येते.

असे नमुने गंभीर रुग्णांच्या संदर्भात घेतले जात असतात. खरेतर कोरोना महासाथीला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने विषाणूबाबतचा अभ्यास सतत सुरुच असतो. सातत्याने विषाणूचे बदलते रूप शोधण्याची प्रक्रिया केली जाते. अनेकदा हा सारा जेनोमी सिक्वेन्सिंगचा शोध पूर्ण होईपर्यंत संबंधित रुग्ण बराही होऊन जातो. जसा मुंबईतील ज्या पहिल्या रुग्णाला डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळले होते तो बराही झाला आहे. पण आता डेल्टा प्लस विषाणूमुळे पहिला मृत्यू झाल्यानंतर धोका आणखी वाढला आहे.

सुरुवातीला डेल्टा प्लसला या प्रयोगशाळांनी “व्हायरस ऑफ इंटरेस्ट”, अशी संज्ञा वापरली. म्हणजे ज्याकडे बारीक लक्ष ठेवले पाहिजे असा विषाणूचा प्रकार. गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी त्याच्यासाठी शास्त्रज्ञांनी “व्हायरस ऑफ कन्सर्न”, म्हणजे विषाणूचा अतिगंभीर प्रकार अशी संज्ञा वापरली आहे. तेव्हापासून विशेषतः महाराष्ट्र सरकारमध्ये चिंतेचे ढग जमले आहेत. भारत सरकारने डेल्टा प्लस संदर्भात सावधगिरीच्या ज्या सूचना दिल्या आहेत त्यांना अनुसरूनच महाराष्ट्र सरकारने पुन्हा कडक निर्बंधांची पावले उचलली आहेत.

कोरोना

शास्त्रज्ञ व तज्ज्ञ डॉक्टरांनी असा सल्ला राज्य सरकारला दिलेला आहे की, रुग्णसंख्या व पॉझिटिव्हीटी वाढत आहे असे दिसल्याबरोबर संबंधित जिल्ह्यात वा शहरात तातडीने कडक निर्बंध लावावे लागतील. विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंधांशिवाय सध्या पर्याय नाही. त्यामुळेच राज्य सरकारने कालचा निर्णय केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून कोरोना निर्णयांच्या कटूपणाचेच धनी ठरत आहेत. अशा निर्णयांमुळे जनतेला त्रास सहन करावा लागतो हे निर्विवाद आहे. सहाजिकच त्यांच्या विरोधातील कडवट टीका वाढते आहे. पण, महाराष्ट्रातील दुसऱ्या लाटेची तीव्रता आणि चाळीस लाखांपर्यंत गेलेली रुग्णसंख्या पाहता इथल्या राज्यकर्त्यांना कठोर होऊन निर्बंध घालण्याशिवाय पर्यायच नाही. कोणीही आज सत्तेत असते तरी, जे उद्धव ठाकरेंनी केले, तेच त्यांनाही करावे लागले असते, हे कादचित फडणवीसही मान्य करतील!

कोरोनाची तिसरी खरोखरीच लाट येईल का व आली तर ती किती मोठी असेल, हेही प्रश्न डेल्टा प्लसच्या फैलावाइतकेच महत्त्वाचे आहेत. आसीएमआरने कालच गणिती ठोकताळ्यांवर आधारित अनुमान काढले आहे की तिसरी लाट दुसऱ्याइतकी मोठी नसेल. तीव्रता कमी असेल. पण छातीठोकपणाने कोणीच लाट येणारच नाही, हे आता सांगू शकणार नाही. त्यामुळेच राज्य सरकारनेही कंबर कसली आहे.

धोका मोठा असला तरी एक आशा आहे ती लसीकरणामधून तयार होणाऱ्या सार्वजनिक प्रतिकार क्षमतेची. ज्या विभागात सत्तर टक्क्यांपर्यंत 18 वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल, त्या शहरात, त्या गावात वा त्या जिल्ह्यात सारे व्यवहार सुरळीत सुरू ठेवता येतील, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. महाराष्ट्राने लसीकरणात, देशात आजही आघाडी कायम ठेवलेली आहे. जितके लसीकरण पुढे जाणार आहे तितकाच कोरोना उणवणार आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतराचे भान बाळगणे आणि सतत हात धुणे या त्रिसूत्रीच्या पालनावर भर देतानाच लसीकरणासाठी अधिकाधिक नागरिकांना प्रोत्साहित करणे याकडेही सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळेच तिसऱ्या लाटेची काळजी करतानाच, फार घाबरून जाण्याचेही कारण नाही, इतकेच!

Continue reading

… तर एकनाथरावांच्या जागी दादा असते मुख्यमंत्री!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती नुकतीच साजरी झाली. राजीव गांधींच्या अखेरच्या निवडणुकीच्या स्फोटक धामधुमीच्या काळात अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात अवतरले. दुर्दैवाने दादांच्या राजकारणाची आणि आयुष्याची अखेरही भयंकर स्फोटक स्थितीत झाली. 1991 ते 2026 हा कालावधी मात्र, कायम...

दिल्लीत चर्चा फडणवीसांचीच!

मराठी माणसाला फार वर्षांपासून दिल्लीचे मोठे आकर्षण राहिले आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या दीडशे वर्षांच्या काळात असंख्य मराठी नेत्यांनी, क्रांतीकारकांनी देशाच्या राजकारणाला वेळोवेळी आकार दिला. त्याआधी पेशव्यांनी दिल्लीचे रक्षण केले आणि मुघल बादशहाला गादीवर बसवून राज्य चालवले. दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी पेशव्यांनी अन्...

शिवसेना आणि शिव्यांच्या समीकरणात नवे ते काय?

शिवसेना आणि शिव्या हे काही नवे समीकरण नाही. मूळची ठाकरेंची सेना असेल वा आता एकनाथ शिंदेंची मान्यताप्राप्त खरी शिवसेना असेल, सेनेच्या आजी-माजी मंत्र्यांनी, नेत्यांनी जाहीरपणाने शिवीगाळ केल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता मंत्री असलेल्यांच्याही तोंडी पूर्वी अनेकदा शिव्या आल्याची असंख्य...
Skip to content