मुंबईच्या पूर्व उपनगरातील चुनाभट्टी येथे गुंड पपू येरवणकर याची भर दुपारी गोळ्या झाडून केलेल्या हत्त्येला आज जवळजवळ 50/ 55 दिवस होऊनही चुनाभट्टी पोलीस खासगी दुष्मनीतून ही हत्त्या झाल्याचे दाखवून केस ‘फाईल’ करायच्या विचारात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
पपू गुंड होता असे सांगून पोलीस हे प्रकरण हलक्यात घेत असल्याची माहिती चुनाभट्टी परिसरात फेरफटका मारला असता हाती आली. गेल्या काही वर्षांत चुनाभट्टी परिसरात पद्धतशीरपणे टॉवर्सचे बांधकाम वाढल्यानेच या परिसरावर भू- माफियांचा डोळा गेला व यातूनच ही हत्त्या झाल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. जवळजवळ चारपाच तास त्या परिसरात फिरल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे एकेकाळी दिसणारी चुनाभट्टीची टेकडीच गायब झाली असून त्या टेकडीचे सपाटीकरण करून एक नाही, दोन नाही तर चक्क 50च्या आसपास टॉवर्सचे बांधकाम अनेक नियम धाब्यावर बसवून केले जात असल्याचे निदर्शनास आले.
वास्तविक टेकडीच्या आसपास कोणतेही बांधकाम करायचे असल्यास पर्यावरण खात्याची वा हरित लवादाची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु सध्या सुरू असलेल्या बांधकामांपैकी कुणाकडेही अशी परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. पपूचा मृत्यू हा साधा नसून या टेकडीवर ताबा मिळवण्याच्या रस्सीखेचीतूनच झाला असल्याचे अनेकांनी सूचित केले आहे. म्हणूनच हत्त्येचे हे संपूर्ण प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हा अनव्हेशण खात्याकडे वर्ग करण्यात यावे असे वाटते. ही हत्त्या सुपारी देऊन केली गेली असावी असा दाट संशय आहे. जरी आरोपींना 24 तासांत पोलिसांनी ताब्यात घेतलेले असले तरी गुन्हेगारी जगतात त्याला हजर केले असे म्हणतात. या सर्व आरोपीना ताब्यात घेतल्यानंतर रीतसर त्यांची कोठडी मिळवण्यात आली व त्यांची रवानगी आर्थररोड तुरुंगात केली गेली.
तुरुंगात हल्ला
तुरुंगात गेल्यावर या चार आरोपीवर एका गटाने हल्ला केल्याचे वृत्त आहे. या चाकू व ब्लेडच्या हल्ल्यात तीनजण जखमी झाले होते. त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार करण्यात आले असे समजते. सनी पाटील, सागर सावंत, बलराम पाटील व बाबू गावंड अशी आरोपींची नावे असून ते छोटा राजन टोळीचे असल्याचे सांगण्यात येते. टोळीचे असले तरी मुंबईतील छोट्याच्या प्रमुखाला अंधारात ठेवून हा गेम केला गेल्यानेच तुरुंगात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, असे सूत्रांनी सूचित केले.
खरेतर पपूची हत्त्या सोन्याची पेढी असलेल्या व बिल्डिंगलाईनमध्ये आलेल्या एका बिल्डरनेच केली असावी असा संशय अनेकांनी व्यक्त केला. या नवागत बिल्डरबरोबर पपूचे संबंधही होते. परंतु रायगड जिल्ह्यातील एका जमिनीच्या वादातून त्यांचे संबंध तुटले होते. तसेच अधिकच्या पैशाची मागणीही त्यामागे असल्याचे बोलले जाते. म्हणूनच आरोपींनी जरी हत्यार चालवलेले असले तरी त्यामागे डोके दुसऱ्याचेच आहे हे सांगायला कुणी ज्योतिषी नको.
वर उल्लेख केल्याप्रमाणे येथे टॉवर्सचे बम्पर पीक काढण्याचे सर्वच राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी ठरवले असल्याने व काही महिन्यांवर निवडणुकांचा उरूस आल्याने सर्वच राजकीय पक्ष मूग गिळून गप्प आहेत. या हत्त्येनंतर काही चाळ संघटनानी असल्या विकासाला उघड विरोध करून जाहीर फलक लावले आहेत. काही बिल्डर कंपन्या तर लोक प्रतिनिधींच्या जवळच्या नातेवाईकांच्या आहेत. सर्व ‘राजे’ मंडळी आहेत. अरुंद गल्ल्या, चिंचोळे बोळ, दोन वाहनांसाठी जेमतेम पुरेल इतका रुंद रस्ता आणि हे नियोजित असलेले 50 टॉवर्स.. हे चुनाभट्टी तुझे काय होईल हे फक्त त्या ‘मंगेशला’च ठाऊक!
छायाचित्र मांडणी- श्रेया साळसकर