Homeएनसर्कलदरेमधल्या निसर्गोपचार केंद्राचा...

दरेमधल्या निसर्गोपचार केंद्राचा फायदा नक्की कुणाला?

मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी २०२६-२७चा अर्थसंकल्प शुक्रवारी विधानसभेत सादर केला तेव्हा त्यात राज्यातील जनतेला काय मिळाले, यापेक्षाही जास्त चर्चा रंगली ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे गावाच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या निसर्गोपचार केंद्राची…

विधानभवनाच्या परिसरात शिन्दे यांच्या दरे गावाच्या परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येईल, या घोषणेबद्दल पत्रकार परिषदेच्या वेळीही हास्यकल्लोळ झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पाबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिल्यानंतर उपमुख्यमंत्री शिन्दे यांनीही भाष्य केले. त्यावेळी पत्रकारांनी शिन्दे यांना दरे गावातील निसर्गोपचार केंद्राबद्दल उपप्रश्न विचारले.

निसर्गोपचार

उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधून बाहेर पडून शिवसेना पक्षावरच दावा सांगितल्यानंतर मुख्यमंत्री झालेले शिन्दे यांनी अनेकदा मी कशी शस्त्रक्रिया करतो, हे तुम्हाला माहीत आहे, असे जाहीरपणे सांगितले आहे. त्याचा संदर्भ त्यांनी शुक्रवारच्या पत्रकार परिषदेतही दिला. मात्र, ताणतणाव, जीवनशैलीजन्य आजार, मानसिक आरोग्य आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांसाठी दरे परिसरात हे निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येत आहे. त्यामुळे तेथे शस्त्रक्रिया केली जाणार नाही. पण, तुम्ही (पत्रकार) दरे गावाला, त्या केंद्रात या.. मी तुम्हाला आताच आमंत्रण देतो, असे शिन्दे यांनी सांगताच एकच हास्यकल्लोळ झाला.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी अनेकदा त्यांच्या दरे या मूळ गावाचा दौरा केला आहे. बहुतांश वेळा शिन्दे दरे गावी गेले ते त्यांच्या नाराजीनंतर… त्यामुळे दरे गावचा संदर्भ माध्यमांमध्ये विशेषतः टीव्ही वाहिन्यांवरही एकनाथ शिन्दे नाराज, दरे गावाकडे प्रयाण अशा पद्धतीनेच येतो. त्यामुळे अर्थसंकल्पात दरे गावाच्या परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारून ताणतणाव, जीवनशैलीजन्य आजार, मानसिक आरोग्य आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांसाठी (प्रिव्हेन्टिव्ह मेडिसिन) त्याचा उपयोग केला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केल्याने त्याचा फायदा राज्यातील जनतेला तर होईलच, पण शिन्दे यांनाही तो होईल, अशी चर्चा विधानभवन परिसरात रंगली होती.

(लेखक शैलेंद्र परांजपे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.) 

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content