म्हणे मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषण आणि धुलिकण यांचे प्रमाण वाजवीपेक्षा वाढले आहे. त्वरित उपाययोजना करा असे साक्षात पंतप्रधान कार्यालयातून फर्मान आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासकट सर्वांचीच एकच धावपळ सुरू झालेली आहे. काही प्रमाणात प्रदूषणाचा स्तर कमीही झालेला दिसतो. परंतु पंतप्रधान कार्यालयाने आपल्या अख्त्यारितील मंत्रालयांनाही तशी ताकीद द्यायला हवी.
कालच एका ठिकाणी जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडीने घाटकोपर स्थानकावर उतरलो. फलाट क्रमांक दोनवर गेले अनेक दिवस काही काम चालू आहे. त्या फलाटावर अनेक ठिकाणी रॅबीट व रेतीचे ढीग दिसले. तेही उघडे… त्यावर ताडपत्री टाकण्याची तसदी त्या कंत्राटदाराने घेतलेलीच नव्हती. क्रमांक दोनवरून जलद गाड्या तसेच बाहेरगावी जाण्याऱ्या अतिजलद गाड्याही जात असतात हे मी सांगायला नको. जलद गाड्या जातेवेळी या रेतीचे धुलिकण किती वेगाने हवेत मिसळले जात असतील याचा विचारच केलेला बरा!
गाडी फलाटावर आल्यावर डब्यात शिरायचे की धुळीपासून स्वतःला वाचवायचे हा मोठा प्रश्नच प्रवाशांपुढे पडतो. अनेकवेळा विचार करण्यात गाडी चुकायचीही भीती असते! असेच रेतीचे आणि रॅबीटचे ढीग अनेक रेल्वेस्थानकात गेल्या अनेक दिवसांपासून पडून आहेत. ठाणे रेल्वेस्थानकाबाहेरही (पश्चिम) असा रेतीचा ढीग गेले 10 दिवस पडून आहे आणि तोही उघडाच… आता पंतप्रधान कार्यालयाने थेट रेल्वेमंत्र्यानाच फोन केला पाहिजे, असे अनेक नगरिकांनी या प्रतिनिधीला सांगितले.