हरारे येथे झालेल्या १९ वर्षांखालील युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या भारतीय संघाने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करून जेतेपदाचा शानदार षटकार ठोकला. उभय संघात २०२२मध्येदेखील अंतिम फेरीत लढत झाली होती. त्यावेळीदेखील भारतीय युवा संघच सरस ठरला होता. त्याच विजयाची पुनरावृत्ती भारतीय संघाने ४ वर्षांनतर पुन्हा हरारेत करुन दाखवली. गतवेळचा पराभवाचा बदला इंग्लंड संघाला घेता आला नाही. कारण भारतीय संघाने त्यांना तशी संधीच दिली नाही. सामन्यातील महत्त्वाची नाणेफेक भारताने जिंकून इंग्लंडसमोर विजयासाठी ४१२ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवले. भारताचा युवा धडाकेबाज फलंदाज, अवघ्या १४ वर्षीय वैभव सुर्यवंशीने ८० चेंडुत १५ चौकार आणि १५ षटकारांची तुफानी आतषबाजी करत, १७५ धावांची अविश्वसनीय खेळी केली. त्याने सावध सुरुवात करताना जम बसल्यावर मात्र इंग्लंड गोलंदाजावर तुफानी हल्ला चढवला. त्यामुळे त्यांच्या गोलंदाजांची लय साफ बिघडली. त्यामुळे भारताने ४००पेक्षा जास्त धावांचा हिमालय उभारला.
वैभवचा सलामीचा सहकारी उपांत्य फेरीत शतकी खेळी करणारा अॅरॉन जॉर्ज अवघ्या ९ धावा काढून लवकर बाद झाला. पण नंतर आलेल्या कर्णधार आयुष म्हात्रेने मात्र वैभवला छान साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९० चेंडूत १४२ धावांची भागीदारी करुन भारतीय डाव सावरला. म्हात्रेने ५१ चेंडूत ५३ धावा केल्या. मग वैभवने तिसऱ्या विकेटसाठी वेदांत त्रिवेदीसोबत ३९ चेंडूत ८९ धावांची भागिदारी करुन भारताची स्थिती अधिक भक्कम केली. वेदांतने ३२ चेंडूत ३६ धावा केल्या. नंतर आलेल्या विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू, कनिष्क चौहाननेदेखील चांगली फटकेबाजी केल्यामुळे भारताला ४०० धावांचा टप्पा सहज पार करता आला. वैभवची ही स्फोटक खेळी हाच दोन्ही संघातील जय-पराजयामधील फरक होता. इंग्लंडतर्फे जेम्स मिंटोने ३ तर सेबस्टियन मॉर्गने २ बळी घेतले. वैभवच्या या खेळीने भारतीय माजी कर्णधार कपिल देवने १९८३च्या इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे विश्वचषक स्पर्धेतील महत्त्वाच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेविरुद्धची नाबाद १७५ धावांच्या केलेल्या एका जबरदस्त खेळीला पुन्हा उजाळा दिला.
विजयासाठी षटकामागे ८ धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर होते. भारतीय गोलंदाजांनी पहिली दोन षटके निर्धाव टाकत सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांची सुरूवातदेखील चांगली झाली नाही. इथेच त्यांच्या विजयाच्या आशा मावळल्या. ७ बाद १७७ धावा अशी त्यांची बिकट अवस्था झाली होती. सलामीवीर बेन डॉकिन्स आणि सेलेब फॉकनर यांनी अनुक्रमे अर्धशतकी, शतकी खेळी करुन विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. पण त्यांना इतर फलंदाजांची साथ फारशी मिळाली नाही. त्यामुळे इंग्लंड संघाला पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारतातर्फे अंबरीशने ३ तर दिपेश, कनिष्कने प्रत्येकी २-२ बळी घेतले. या स्पर्धेत अंतिम सामन्यात सामनावीर आणि स्पर्धेत मालिकावीर पुरस्कार पटकावणारा वैभव सुर्यवंशी पहिला खेळाडू ठरला. याअगोदर भारताने २०००मध्ये मोहम्मद कैफच्या, २००८मध्ये विराट कोहलीच्या, २०१२मध्ये उन्मुक्त चंदच्या, २०१८मध्ये पृथ्वी शॉच्या आणि २०२२मध्ये यश धुलच्या नेतृत्त्वाखाली ही स्पर्धा जिंकली होती.

उपांत्य फेरीत भारतासमोर अफगाणिस्तानने विजयासाठी ठेवलेले ३११ धावांचे मोठे लक्ष्य सहज पार केले. सलामीवीर अरॉन जॉर्जने केलेल्या सुरेख शतकी खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला. त्याने वैभवसोबत सलामीत शतकी धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. नंतर कप्तान आयुष म्हात्रेसोबत दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावाची मोठी भागिदारी करुन भारतीय विजय पक्का केला. म्हात्रेने ६२ धावा केल्या. नंतर आलेल्या विहान मल्होत्राने झटपट ३८ धावा फटकावत भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. अफगाणिस्तानच्या उझैरुल्लाह नियाझीची नाबाद शतकी खेळी वाया गेली. अफगाणिस्तानचे क्षेत्ररक्षण अंत्यंत सुमार होते. त्यांनी अनेक झेल सोडले. त्यामुळे त्यांना ही लढत गमवावी लागली. हेच त्यांनी हे झेल टिपले असते तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडने चारवेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला नमवले. अवघ्या २७ धावांनी इंग्लंडने या सामन्यात बाजी मारली. कप्तान थॉमस रेवने काढलेल्या शतकामुळे पहिली फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने ५० षटकात ७ बाद २७७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाचा डाव २५० धावात संपला. त्यांच्या केलेब फॉल्कनरचे शतक ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव टाळू शकले नाही. आणखी एका कोणाची साथ केलेबला मिळाली असती तर ऑस्टेलियन संघ अंतिम फेरी गाठू शकला असता. या स्पर्धेत भारत आणि इंग्लंड या दोन संघानी आपले सर्व सामने जिंकून स्पर्धेच्या अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केला. सलामीच्या लढतीत भारताने अमेरिकेचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ६ गडी आणि ११८ चेंडू राखून दणदणीत पराभव करून आपले विजयी अभियान सुरु केले.
भारतातर्फे वेगवान गोलंदाज हेनिल पटेलने ५ बळी घेतले. अभिग्यान कुंडूने नाबाद ४२ धावांची चिवट खेळी केली. दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशलादेखील डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे नमवले. वैभव सुर्यवंशी, अभिग्यान कुंडू यांनी अर्धशतके काढली. बदली गोलंदाज विहान मल्होत्राने ४ बळी घेऊन बांगलादेशची फलंदाजी मोडीत काढली. तिसऱ्या सामन्यातदेखील भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे न्यूझीलंडला सहज नमवले. कप्तान आयुष म्हात्रेने अर्धशतक फटकावले. अम्बरिशने २९ धावांत ४ बळी घेऊन न्युझीलंडला विजयाची संधीच दिली नाही. हा विजय मिळवून भारताने आपला “सुपर सिक्स”मधील प्रवेश पक्का केला. “सुपर सिक्स”मधील पहिल्या सामन्यात भारताने दुबळ्या झिम्बाब्वेचा २०४ धावांनी सहज पराभव केला. दुसऱ्या लढतीत भारताने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५८ धावांनी पराभव करून या गटात अव्वल क्रमांक मिळवला आणि माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची उपांत्य फेरीतील लढत टाळली. या विजयाबरोबर भारताने आपल्या आशिया स्पर्धेतील अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा बदलादेखील घेतला. सामन्यातील कठीण समयी कप्तान आयुष म्हात्रेचे संयमी नेतृत्त्व कामी आले.

आपल्या जबरदस्त फलंदाजीची छाप वैभव सुर्यवंशीने या स्पर्धेवर पाडली. त्याने अनेक नवनवे विक्रम साजरे केले. भारतीय विजयात त्याचा मोठा वाटा होताच ह्यात शंका नाही. पण इतर खेळाडूंनीदेखील महत्त्वाच्या क्षणी योगदान देऊन भारतीय संघाची नौका सुखरुप किनाऱ्याला लावली. भारतीय विजयात संघाचे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांचेदेखील महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्यांनीदेखील संघाची चांगली तयारी करुन घेतली. खेळाडूंना त्यांचा नैर्सगिक खेळ करण्याचा सल्ला दिला. त्यांच्यामध्ये आपण विश्वचषक जिंकू शकतो हा आत्मविश्वास निर्माण केला. त्याचेच फळ जेतेपदाचा रुपाने भारताला मिळाले. वैभव सुर्यवंशी, आयुष म्हात्रेने गतवर्षी आयपीएल मध्ये आपली चमक दाखवली. आता या विजेत्या संघातील कुंडू, वेदांत, विहान, कनिष्क, अंबरीश, हेनिल पटेल, जॉर्ज या खेळाडूंकडून भविष्यात मोठ्या अपेक्षा आहेत.
भारतीय क्रिकेटला सध्या सुगीचे दिवस आलेत असे म्हंटले तर वावगे ठरू नये. गेल्या २ वर्षांच्या काळात भारतीय क्रिकेट संघाने ४ विश्वचषक स्पर्धा आणि १ आयसीसी मानाची चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धा जिंकून क्रिकेटजगातात आपले निविर्वाद वर्चस्व निर्माण केले आहे. बीसीसीआयच्या गुणवत्ता शोधमोहिमेचा भारतीय क्रिकेटला खूप मोठा फायदा झालाय. युवा खेळाडूंसाठी स्पर्धांची दारे उघडली गेली. त्यामुळे त्यांना आपली गुणवता दाखवता आली. नव्या खेळाडूंत आक्रमकता ठासून भरली आहे. हे खेळाडू कुठलेही दडपण न घेता आपला नैर्सगिक खेळ करतात हे विशेष. पुरुष आणि महिला क्रिकेटपटू आपली चमक दाखवत आहेत. एका जमान्यात हा खेळ शहरी भागापुरता मर्यादित होता. पण आता हा खेळ भारताच्या खेडोपाडी खऱ्या अर्थाने पोहोचला आहे. अनेक प्रतिभावान खेळाडू भारताच्या लहानलहान राज्यांतून पुढे येत आहेत. एका जमान्यात फुटबॉल खेळावर ब्राझीलने, बुद्धिबळावर रशियाने, टेनिसवर अमेरिकेने, टेबल टेनिस, बॅडमिंटनवर चीनने आपले वर्चस्व निर्माण केले होते. आता क्रिकेटमध्ये भारतीय संघाची वाटचाल त्याच दिशेने सुरु झाली आहे!
(लेखक सुहास जोशी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

