मधु कांबीकर आणि माझी ओळख 1976 साली झाली. मी साताऱ्यावरून मुंबईत आले आणि नोकरीच्या शोधात होते. मलाही अभिनयाची आवड असल्यामुळे मी मराठा मंदिर येथे मुकुंद नाईक यांच्या नाट्य शिक्षणाच्या शिबिरामध्ये जाऊ लागले. मुंबई सेंट्रलच्या ब्रिजवरून जाताना हिरव्या इरकलमध्ये मानेवर सैलसा आंबाडा असलेली एक मुलगी माझ्या शेजारून चालत होती. माझी नजर तिच्यावर खिळली. कारण तिचे सौंदर्यच तसे होते. चालता चालता मी तिच्याकडे बघितलं. एक स्मितहास्य केलं आणि चालत चालत मी माझ्या शिबिरासाठी निघून गेले. मी माझ्या क्लासमध्ये गेले आणि थोड्याच वेळात बघितलं तर काय, तीच मुलगी क्लासमध्ये आली होती. तिलाही नाट्य शिबिराची माहिती घ्यायची होती. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ती होती मधु कांबीकर. आता तिच्या जाण्याने तिच्या पहिल्या भेटीची आठवण झर्रकन डोळ्यासमोरून गेली. मधु आता गेली, पण तिचे घुंगरू दशकापूर्वीच अबोल झाले होते…
त्यावेळी माझे काही जास्त बोलणे झाले नाही. कारण ती कोण होती हे मला तोपर्यंत माहित नव्हते. फक्त मी तिचं सौंदर्य बघत होते. विनोदसम्राट दादा कोंडके माझे मित्र होते. त्यांच्या कार्यालयात बसले असताना तिथे मधु कांबीकरचा विषय निघाला, कारण तिने “ह्योच नवरा पाहिजे”, या दादा कोंडकेंच्या चित्रपटात काम केले होते. “मला लागलाय खोकला, मधाचे बोट कोणी पाठवा” हे गाणं तिच्यावर चित्रित केले होते. तिथेही त्या गाण्याची आणि ती पडद्यावर अतिशय सुंदर दिसत असल्याबद्दलच्या गप्पा चालल्या होत्या. फोटो बघितल्यावर मी म्हटलं- मी तिला भेटले आहे, एका शिबिरामध्ये. त्याअगोदर तिने देवमाणूस, या चित्रपटात काम केले होते. चर्चा झाली होती ती दादा कोंडके यांच्या चित्रपटाची. तिची कारकीर्द हळूहळू पुढे जात होती. आमची ओळख वाढू लागली.
पहिल्याच भेटीत आपलीशी वाटणारी मधु मनावर राज्य करू लागली. त्याचवेळी “लावणी भुलली अभंगाला” हे तिचे लावणीप्रधान नाटक चालू होते. मी एकदा भेटले तेव्हा तिला माझी साडी खूप आवडली आणि तिने मला सांगितले की, ही साडी मला एकदा नेसायला पाहिजे. मी लगेच विचारलं- कुठे आणून देऊ? तिचे नाटक दामोदर हॉलमध्ये होणार होते. तिथे ही साडी आणून द्यायला तिने सांगितले. मी साडी नेऊन दिली आणि तिला सांगितलं तुला नेसायची तितक्या वेळा नेस. मग कधीतरी मी तुला भेटेन, तेव्हा तू मला दे. मी तिला परत नाटकाच्या निमित्ताने भेटले तेव्हा तिने मला सांगितले- माझ्या घरी येऊन साडी घेऊन जा. त्यावेळी ती माहीम कोळीवाड्यात राहायला होती. अगदी छोट्याशा घरात. मी साडी घ्यायला घरी गेले. चहा घेतला आणि माझ्या लक्षात आले की, आमची मैत्री वाढू लागली आहे. तिचे पुत्रकामेष्टी नाटक आले होते. त्यातही तिला ॲवॉर्ड मिळाले होते. तिचे पेइंग गेस्ट नावाचे नाटक विक्रम गोखलेबरोबर चालू होते. मी त्या नाटकाला गेले तेव्हा तिने मला सांगितलं की, शापित, पिक्चर मी केला आहे आणि खूप चांगला झाला आहे. बहुतेक मला त्यात आणि कुलदीपलापण अवॉर्ड मिळेल. त्या पिक्चरमध्ये तिला नॅशनल अवॉर्ड मिळाले.

तसं माझं त्या क्षेत्रात काहीच काम नव्हतं, तरीपण आमची मैत्री खूप दृढ होत गेली. माझ्या घरी तिची येजा सुरु होती. नंतर ती मालाडला राहू लागली. तिच्या घरी माझं जाणं सुरू झालं. तिच्या घरातल्यांशी माझे खूप घनिष्ट नाते निर्माण झाले. या नात्यात, या मैत्रीत कुठेही व्यवहार नव्हता. कुठलेही कारण नव्हतं की, ज्या कारणासाठी फक्त मैत्री करावी. फक्त मनं जुळली आणि तिने मनात घर केलं. मला एअर इंडियामध्ये नोकरी लागली. मधु बऱ्याचवेळा मला अवॉर्ड फंक्शनला घेऊन जायची. मला नोकरी लागल्यावर ती नेहमी चिडवायची. तू तर काय बाई हवेतच असतेस आता. पण तसं काही नव्हतं. आमची मैत्री फार वेगळी होती. दुबईला माझे महाराष्ट्र मंडळात कॉन्टॅक्ट असल्यामुळे मी त्यांना मधुचा लावणीचा कार्यक्रम आयोजित करायला सांगितले. एअर इंडियातून मधुसाठी सात तिकिटे कॉम्प्लिमेंटरी घेतली होती. तेथे कलाकारांना कंपनीच्या पब्लिसिटीसाठी तिकिटे देण्याची पद्धत होती.
दुबईमध्ये कधीही लावणीचा शो झाला नव्हता. मधुचा शो पहिला शो ठरला. शेख रशीद ऑडिटोरियममध्ये शो हाऊसफुल्ल झाला होता. शकुंतला नगरकर, आरती नगरकर आणि काहीजणी आणि सोबतीला ढोलकीसाठी पांडूदादा घोटकर होतेच. एका संध्याकाळी काही अरब उद्योगपती़ंसाठी बोटीवर लावणीचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. त्यातल्या खूप जणांची परदेशात जाण्याची पहिलीच वेळ होती. दुबईला जाताना आम्ही विमानात बसलो आणि थोड्या वेळाने तिने फ्लाईट पर्सरला बोलावून सुरी मागितली. तो जरा दचकला. नंतर मला कळलं की, त्या दिवशी माझा वाढदिवस होता हे तिच्या चांगलं लक्षात होतं. ती येतानाच केक घेऊन आली होती, तो तिला विमानात कापायचा होता. अशी होती माझी मैत्रीण मधु. दुबईला मधुच्या साधेपणालाच लोकांनी भरभरून प्रेम दिले.
मधु सातारला आली की जेवायला खाली बसायची. जे पाहिजे ते माझ्या आईकडे हक्काने मागायची. माझी कम्प्लेंट करायची की मी तिच्यावर दादागिरी करते. अनोळखी लोकांना ओळख करून देताना ती तेच सांगायची की, ही माझी दादा आहे. मनातील गोष्टी माझ्याकडे सांगायची. मन मोकळं करायची. काही गोष्टी मी तिला खूप समजून सांगायचे. पण कधीकधी तिचा स्वभाव तिलाच नडायचा. तिचं मधुरंग पुस्तक प्रकाशित झाले. खूप छान लिहिले आहे. त्या पुस्तकातसुद्धा तिने माझा उल्लेख केला आहे. त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी डॉ. श्रीराम लागू, डॉ. जब्बार पटेल, महेश कोठारे अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती. डॉ. लागूंच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झालं. कोणाचाही सत्कार न करण्याचं ठरलं होतं. कोणालाही स्टेजवर बोलवायचं नाही, स्टेजवर बसलेल्या लोकांव्यतिरिक्त कोणाचाही सन्मान करायचा नाही हे ठरलेलं असतानासुद्धा अचानक माझं नाव पुकारलं गेलं आणि सांगण्यात आलं की, 35 वर्षांपासून मधुची मैत्रीण आहे, ती आलेली आहे. तिला आम्ही स्टेजवर आमंत्रित करत आहोत आणि महेश कोठारे यांच्या हस्ते माझा सन्मान केला गेला. खरंतर हे आठवलं तरी डोळ्यातून अश्रू येतात. हा केव्हढा मोठा सन्मान होता माझा. त्या कार्यक्रमासाठी आशा काळेही उपस्थित होत्या. त्यानंतर त्या मला भेटायला आल्या. मी बघायला आले मधुताईंची कोण मैत्रीण आहे 35 वर्षांपासूनची.. असं त्या म्हणाल्या.

ही मैत्री निखळ होती. पुण्याला मधुच्या घरी गेले की ती मला नवीन साड्या दाखवायची. त्यातली मला आवडेल ती घ्यायला सांगायची. पण मी नेहमीच म्हणायचे की माझ्याकडे भरपूर साड्या आहेत आणि ऑफिसला मला युनिफॉर्मच्या साड्या नेसाव्या लागतात तर मला काही साडी देऊ नकोस. पण तिचा हट्ट असायचा. तू एक तरी साडी घेऊन जा यातली. मी फक्त तिची लावणीची एक साडी आणली जी मी मॉरिशसला नेसले होते. मधुच्या कितीतरी आठवणी आहेत. त्या शब्दांत कशा मांडायच्या? तिचं बोलणं, वागणं अगदी काळजाला भिडणारं असायचं. त्यात फक्त प्रेमच असायचे. स्वार्थ नसायचा. ती 19 नोव्हेंबरला पुण्यात माझ्या भाचीच्या लग्नाला आली होती. भाची लग्नानंतर सिंगापूरला जाणार होती. तिला सोडायला माझ्या घरातले सगळेच मुंबईला आले. माझे घर भरलेले होते. मधुचा 26 नोव्हेंबरला मला फोन आला. मी तुझ्याकडे आज राहायला येते. मी तिला सांगितलं- माझं घर पाहुण्यांनी भरलेले आहे. घरात जागा नाही. तिने सांगितलं की, ठीक आहे, मी दुसरीकडे बघते आणि शिल्पा समुद्र यांच्याकडे राहायला गेली.
दुसऱ्या दिवशी तिचा लावणीचा कार्यक्रम होता माटुंगा येथे. तिने मला बोलवलं होतं. परंतु घरात पाहुणे असल्यामुळे मी जाऊ शकले नाही. तो दिवस होता 27 नोव्हेंबर 2016. तो तिच्या आयुष्यातील काळा दिवस ठरला. बारा वर्षांनंतर ती लावणीचा कार्यक्रम करत असल्यामुळे खूपच जोशात ती नाचत होती. पांडूदादा तिला बऱ्याचवेळा खुणवत होते की, बस कर.. पण तिच्या गिरक्या घेणं चालू होतं. कार्यक्रम संपला आणि ती मेकअप रूममध्ये धावल्याबरोबर तिला कळलं तिचा एक हात उचलत नाहीये. तिची बहीण रत्ना तिच्याबरोबर होती. ती तिच्या कुशीतच कोसळली. तिला पॅरेलेसिसचा अटॅक आला होता. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. माझ्या पुण्याच्या न्यूरोसर्जनने स्कॅन बघून सांगितलं होतं ती ती बोलू शकणार नाही. माझ्या पायाखालची जमीन सरकली. पॅरेलिसिसचे लोक एका वर्षात बरे होताना मी पाहिले आहेत. पण मधुच्या बाबतीत असं घडलं नाही. ग्लोबल हॉस्पिटलमध्ये मी जवळजवळ रोजच संध्याकाळी जायचे आणि त्याचवेळेला रोजच डायरेक्टर राजदत्त येऊन बसलेले असायचे. राजदत्त साहेबांची आणि माझी भेट रोजच होत होती. एकदा ते मला म्हणाले की, तुम्ही जवळून गेलात की मला मधु कांबीकरचा भास होतो…
मी पुण्याला जाऊन तिला भेटायचे. तिचा चेहरा कायम हसराच असायचा. ती कधीच त्रासलेली दिसली नाही. तिला जे बोलायचे ते ती बोलू शकत नव्हती. तिला काय वाटतं हे आम्हाला समजू शकत नव्हतं. सुरुवातीला ढोलकीचे तोडे ऐकले की तिचे पाय आपोआप हलत असत. पण काही दिवसांनी तेही बंद झाले. ती फक्त एकटक बघत असायची. आमच्याकडे बघून खूप छान हसायची. पण तिचे हसणे आम्हाला दुःख देऊन जायचं. काय आलं होतं हे तिच्या वाट्याला? तिने कधीच कुणाचे वाईट केलं नव्हतं. कधीच कुणाचं वाईट चिंतलं नव्हतं. मग तिच्या वाट्याला का हे आले. याचे उत्तर तर कोणाकडेच नसेल. तिला झी गौरव पुरस्कार मिळाला. पण ती घ्यायला येऊ शकली नाही. तिचा मुलगा प्रीतम, तिच्या बहिणी रत्ना, छाया यांनी तिची खूप काळजी घेतली. कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यात असं येऊ नये. यानिमित्ताने एव्हढेच म्हणेन- “अबोल झाले घुंगरू”!
(लेखक मीना इंगळे नाईक एअर इंडियातल्या निवृत्त अधिकारी आहेत. संपर्क- 9892631676)

