Homeमाय व्हॉईसतपोवन आंदोलन मुख्यमंत्री...

तपोवन आंदोलन मुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी!

नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी साधूग्राम वसवण्यासाठी तपोवन भागातील वृक्ष तोडणार असल्याच्या चर्चेने आता प्रत्येकजण आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. मुख्य म्हणजे सत्ताधारी महायुतीतच आता ह्यावरून मतभेद निर्माण झाले आहेत. एकीकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्यातील वाद मिटला असून त्यांचे पुंनर्मिलन झाले आहे, अशा बातम्या येत असताना, शिंद्यांच्या शिवसेनेने नाशिक येथील तपोवनतील वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन केले आहे. शिवसैनिकांनी कुर्‍हाडी-कोयते जाळले तर महिलांनी वृक्षांना राख्या बांधल्या. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. कारण ह्या आंदोलनाचे म्होरके अभिनेते सयाजी शिंदे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षात सामील झाले आहेत. गंमत म्हणजे आधी पर्यावरणवादी, मग विरोधी पक्ष, त्यात ठाकरे बंधु, मग कलाकार, त्यानंतर विविध संघटना, अगदी दिव्यांगही ह्या आंदोलनात सामील झाले आहेत. आणि आता सत्ताधारी पक्षाचे भागीदारही ह्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रत्येकजण ह्यामध्ये आपला राजकीय स्वार्थ साधत आहे. आता ह्या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजन काय निर्णय घेतात ह्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा प्रश्न गजण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच गिरीश महाजनांनीही घाईघाईने नाशिकला भेट दिली. तपोवनातील 33 एकर क्षेत्रावर उभारल्या जाणार्‍या प्रदर्शन केंद्राची निविदा रद्द केली आणि ह्या तोडल्या जाणार्‍या झाडांचे पुन्हा रोपण करण्याचे आश्वासन दिले.

खरेतर तपोवनची जमीन ही वनजमीन नाही. ती पडीक जमीन आहे. साधूग्राम दरवेळेस ह्याच जमिनीवर बांधले जाते. पण कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो. मधल्या काळात तिथे वृक्षलागवड केली गेली आणि काही झाडे अशीच उगवली जे ह्या आंदोलनाचे निमित्त झाले. वृक्षांचे सर्वेक्षण करून त्यावर फुल्या मारल्याचे आणि ही सर्व झाडे तोडणार म्हणून पर्यावरणवादी पेटले. स्वत:ला वृक्षमित्र म्हणवणारे सयाजी शिंदे आता राष्ट्रवादी निवासी आहेत. त्यांनी ह्यात लगेच पुढाकार घेतला. त्यांचे झाडाला मिठी मारण्याचे फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाले. लगेच त्यांना कलाकारांनी पाठिंबा दिला आणि बघताबघता ह्या आंदोलनाने मोठे स्वरूप धारण केले. मग ह्यामध्ये काही संघटना हिंदुत्वविरोधीही होत्या. त्यांनी तर कुंभमेळा हवाच कशाला इथपासून ते कुंभमेळ्याची सुरुवात अकबराच्या काळापासून झाली इथपर्यंत समाजमाध्यमात बातम्या पसरविल्या. साधूग्राम दुसरीकडे बांधा इथपासून ते साधू गांजा ओढतात इथपर्यंत कुंभमेळ्यावर टीका

करण्यात आली. खरेतर ह्या संदर्भात प्रशासनाने खुलासा केला आहे की, ह्यामध्ये मोठे वृक्ष तोडण्यात येणार नाहीत. पण खूप मोठी पडीक जमीन आहे, जी प्रत्येक कुंभमेळ्यावेळी साधूग्रामसाठी वापरली जाते. तिथे आता रनमरी, गुळतुरा, बाभळी, कॉसमॉस ह्यासारखी झाडे उगवली आहेत. ही निव्वळ झुडुपे आहेत. त्यावर ना पक्ष्यांची घरटी, ना जमिनीवर सावली, न त्यामुळे जमिनीची धूप कमी होते, अशी झाडे कापली जाणार आहेत. ह्या परिसरात जे डेरेदार वृक्ष आहेत त्यांना हात लावला जाणार नाही. प्रशासनाने हे स्पष्ट केले आहे. तरीसुद्धा हे आंदोलन चिघळत ठेवण्यातच अनेकांना रस आहे. ह्यामध्ये लक्ष्य कुणाला केले जात आहे, हिंदू धर्माला? कुंभमेळ्याला? कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजन ह्यांना? की थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना?

ह्यानिमित्ताने आरे येथील मेट्रोच्या कारशेडला विरोध करून मेट्रोचे काम बंद पाडण्याची आठवण होते. त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी ह्या मेट्रो प्रकल्पालाच स्थगिती दिली होती. सरसकट वृक्षतोड करणे केव्हाही चुकीचेच. मात्र ह्या आंदोलांनाच्या निमित्ताने मनात विचार येतो की, मुम्बई-पुणे हायवेवर अनेक बिल्डरांनी वृक्षतोड करून उंच इमारती बांधल्या. तेव्हा हे आंदोलक कुठे होते? पुण्याजवळ, शेकडो वृक्षांची कत्तल करून, निसर्गाची हानी करून लव्हासा सिटी बांधली, तेव्हा अजितदादा पवार आणि सयाजी शिंदे कुठे होते? सरकार हायवे  बनवताना हजारो झाडे कापते, तेव्हा हे आंदोलक कुठे होते? केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या विविध भागात अनेक ठिकाणी विकासकामांसाठी वृक्षतोड केली जाते. अनेक ठिकाणी रासायनिक कारखान्यातून दूषित पाणी नदीच्या प्रवाहात सोडले जाते, तेव्हा हे आंदोलक कुठे असतात? त्यामुळे ह्या आंदोलनामागे नक्की कुणाचा हात आहे? महाराष्ट्रमध्ये महायुती सरकारच्या स्थापनेला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले आहे. ह्या मुहूर्तावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना अडचणीत आणण्याचे षडयंत्र ह्यामागे दिसत आहे.

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

Continue reading

.. तर शरद पवारांनी ताबा घेतला असता ‘राष्ट्रवादी’चा!

अखेर अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अवघ्या ४ दिवसांत सुनेत्रा अजित पवार ह्यांचा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडला. त्यावरून आता उलटसुलट चर्चा चालू आहेत. म्हणजे राजकीय नेते, कार्यकर्ते, त्यांचे कुटूंबीय ह्यांच्या चर्चां, वहिनींवर टीका हे तर विविध प्रसारमाध्यमातून चालूच आहे. पण, एका...

सुनेत्राताईंच्या रूपाने महिलांचा सन्मान करण्याची संधी घेणार भाजप!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, एक कर्तबदार व्यक्तिमत्व अजित पवार ह्यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूने सगळा महाराष्ट्र हळहळतोय. त्यांचा वक्तशीरपणा, त्यांची करडी शिस्त, त्यांचा कामाचा झपाटा, स्पष्टवक्तेपणा, त्यांची प्रशासनावरील पकड, ह्या सगळ्या गुणांच्या आठवणी कार्यकर्त्यांना, राजकीय नेत्यांना आणि आम जनतेला, विशेषत: बारामतीकरांना येत आहेत. अजितदादांच्या...

सौदा मनसेचा! थयथयाट उबाठाचा!!

महाराष्ट्रातल्या  २९ महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. त्यांचे निकालही जाहीर झाले. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. आणि आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते महापौरपदाचे. अर्थात प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांच्या संख्येप्रमाणे महापौर निवडून येणे ही झाली एक सर्वसामान्य...
Skip to content